অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

न्यूपोर्ट न्यूज

न्यूपोर्ट न्यूज

न्यूपोर्ट न्यूज

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी व्हर्जिनिया राज्यातील शहर आणि बंदर. लोकसंख्या १,३८,१७७ (१९७०). हे नॉरफॉकच्या वायव्येस १८ किमी.वर, तर हॅम्प्टन रोड्स बंदराच्या उत्तरेस जेम्स नदीमुखावर वसले आहे. आयर्लंडमधून ५० वसाहतकऱ्यांसह आलेल्या डॅन्येल गूकिन याने १६२१ मध्ये येथे पहिली वसाहत केली.

शहराच्या नावाविषयी जरी निश्चित माहिती नसली, तरी १६०६–१२ यांदरम्यानच्या जेम्सटाउनवरील पाच मोहिमांचा कमांडर क्रिस्टोफर न्यूपोर्ट याच्याशी या नावाचा संबंध जोडला जातो. १८०० पर्यंत हे शेती व मासेमारी करणाऱ्या लोकांचे एक लहानसे खेडेगाव होते. १८८० नंतरच शहराचा जास्तीत जास्त विकास झाला.

दोन्ही महायुद्धांदरम्यान मालाची चढउतार आणि पुरवठा यांसाठी या बंदरास फार महत्त्व होते. १९५२ मध्ये न्यूपोर्ट न्यूजला वॉरिक परगण्यामध्ये स्वतंत्र शहराचा दर्जा मिळाला. त्याच वर्षी वॉरिक परगण्याचे वॉरिक शहरात रूपांतर झाले आणि १९५८ मध्ये न्यूपोर्ट न्यूजमध्येच वॉरिक समाविष्ट करण्यात आले.

येथे १८८६ मध्ये स्थापन झालेली न्यूपोर्ट न्यूज जहाजबांधणी आणि सुकी गोदी कंपनी जगातील एक मोठे व परिपूर्ण असे नौनिर्मितिस्थान समजले जाते. येथे ‘अमेरिका’ व ‘युनायटेड स्टेट्स’ यांसारखी प्रवासी जहाजे, ‘फॉरेस्टल’ आणि ‘एंटरप्राइझ’ यांसारखी विमानवाहू जहाजे आणि पोलरीस क्षेपणास्त्रे टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘रॉबर्ट ई. ली’ सारख्या पाणबुड्यांची निर्मिती केली जाते.

जहाजबांधणी व दुरुस्ती, तेलशुद्धीकरण, माशांवरील प्रक्रिया, वस्त्रनिर्माण, रंग, तंबाखू, कागदनिर्मिती, रडार, इलेक्ट्रॉनीय उपकरणे, अभ्रकाच्या वस्तू तयार करणे तसेच खनिज तेलपदार्थ इत्यादींचे कारखाने शहरात आहेत. कोळसा निर्यातीचे हे एक प्रमुख केंद्र असून बंदरातील आवश्यक सोयींच्या उपलब्धतेमुळे कोळसा, धातुक, द्रवरूप पदार्थ, बारदान इ. प्रकारच्या मालाची वर्षाला सु. ३ कोटी टनांपेक्षा जास्त चढउतार होते.

येथील अवकाशीय प्रारणांच्या परिणामांचा अभ्यास करणारी प्रयोगशाळानॅशनल एअरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅड्‌मिनिस्ट्रेशन (नासा) तर्फे चालविली जाते. येथील मरिनर्स म्यूझीयम हे नाविकशास्त्र व नौसामग्रीविषयक वस्तुसंग्रहालय विशेष प्रसिद्ध आहे.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate