অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

न्यू हेवन

न्यू हेवन

न्यू हेवन

अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांपैकी कनेक्टिकट राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि बंदर. लोकसंख्या १,३७,७०७ (१९७०). लाँग आयलंड सामुद्रधुनीला मिळणाऱ्या क्विनिपिअ‍ॅक नदीच्या मुखावर स.स. पासून १२·२ मी. उंचीवर वसलेले हे शहर न्यूयॉर्कच्या पूर्व ईशान्येस सु. ११३ किमी.वर, तर हार्टफर्डच्या दक्षिण नैर्ऋत्येस ५८ किमी.वर आहे.

जॉन डॅव्हेनपोर्ट व थिऑफिलस ईटन यांच्या नेतृत्वाखालील ५०० इंग्‍लिश प्यूरिटनांनी १६३८ मध्ये येथे पहिली वसाहत केली. सुरुवातीला इंडियन संज्ञा ‘क्विनिपिअ‍ॅक’ (भरपूर पाण्याची भूमी) या नावाने हे शहर ओळखले जात असे; परंतु १६४० मध्ये इंग्‍लिश शहर न्यू हेवनवरून याचे न्यू हेवन असे नामकरण केले.

१६४३ मध्ये न्यू हेवन व शेजारील काही शहरे मिळून झालेल्या कॉलनीचा ईटन हा त्याच्या मृत्यूपर्यंत (१६५८) गव्हर्नर होता. पुढे या कॉलनीला प्यूरिटनांकडून विरोध झाल्यामुळे तिचे कनेक्टिकट कॉलनीत रूपांतर झाले. १७०१ ते १८७५ पर्यंतच्या राज्याच्या दोन राजधान्यांपैकी न्यू हेवन ही एक होय.

१७७९ मध्ये हे इंग्रजांच्या आधिपत्याखालील आले. १७८४ मध्ये याला शहराचा दर्जा प्राप्त झाला. पुढे आयरिश, बव्हेरियन, इटालियन, ज्यू इ. लोक येथे येऊन स्थायिक झाले. अमेरिकेच्या यादवी युद्धाच्या वेळी या शहराला महत्त्वाचे स्थान होते.

येथील बंदूकनिर्मिती उद्योगाच्या स्थापनेपासूनच (१७९८) शहराचा औद्योगिक विकास अधिकाधिक होऊन सांप्रत ते एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते.

जहाजबांधणी, विमानाचे सुटे भाग, युद्धसामग्री, लोखंडी वस्तू, विजेची उपकरणे, शिवणयंत्रे, घड्याळे, रबरी वस्तू, बंदुका, काडतुसे, काँक्रीट नळ, करवतीची पाती, खेळणी, रंग, दोरखंडे, मांस डबाबंदी इ. उद्योगधंदे शहरात चालतात. ठोक व किरकोळ व्यापाराचे हे प्रमुख केंद्र असून मुख्यतः कोळसा, तेल, गॅसोलीन, लाकूड, रंग, शेती उत्पादने यांचा ठोक व्यापार चालतो. ईली व्हिटनी, चार्ल्स गुडईयर, सॅम्युएल एफ्. बी. मॉर्स या येथील रहिवाशांनीच या शहराच्या औद्योगिक विकासात अधिकाधिक भर घातली. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग यांचे हे प्रमुख केंद्र आहे.

शहराजवळच ज्वालामुखी खडकांची खाण आहे. एक शैक्षणिक केंद्र म्हणूनही हे महत्त्वाचे असून येल विद्यापीठ (१७०१), न्यू हेवन विद्यापीठ, कनेक्टिकट कृषी अनुसंधान संस्था तसेच सदर्न कनेक्टिकट स्टेट (१८९३), न्यू हेवन राज्य शिक्षक, स्त्रियांचे अ‍ॅल्बर्ट्स मॅग्नस (१९२५), साउथ सेंट्रल कनेक्टिकट कम्युनिटी (१९६८) इ. महाविद्यालयांशिवाय हॉप्‌किंझ व्याकरण विद्यालय (१६६०), नाटक व संगीत शाळा इ. अनेक शैक्षणिक संस्था येथे आहेत.

ग्रीन, ईस्ट रॉक पार्क व वेस्ट रॉक पार्कसारखी अनेक सुंदर उद्याने, येल कलावीथी, अनेक सार्वजनिक ग्रंथालये, चर्च, सुविख्यात पीबॉडी निसर्गेतिहासविषयक वस्तुसंग्रहालय, न्यायाधीशांची गुहा (पहिल्या चार्ल्सला देहान्त शासन करणाऱ्या एडवर्ड ह्‌वेली व विल्यम गॉफ यांचे वॉरंटाच्या वेळी लपण्याचे ठिकाण) ही लोकांची प्रमुख आकर्षक ठिकाणे होत.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate