অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

न्यू कॅसल

न्यू कॅसल

न्यू कॅसल

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्यातील औद्योगिक शहर आणि दुसऱ्या क्रमांकाचे बंदर. लोकसंख्या ३,६३,०१० (१९७५). हे सिडनीच्या उत्तर ईशान्येस सु. १६१ किमी. पॅसिफिक महासागाराला मिळणाऱ्या हंटर नदीमुखाच्या दक्षिण तीरावर वसले आहे. शहराचे वार्षिक सरासरी किमान व कमाल तपमान अनुक्रमे १२° व २२° से. आणि पर्जन्यमान १२७ ते १४० सेंमी. असते. हवामान दमट व उपोष्ण कटिबंधीय असून, जुलै आणि जानेवारी हे अनुक्रमे अत्यंत थंड व उबदार हवेचे महिने आहेत.

हराची १८०१ मध्ये गुन्हेगार वसाहत म्हणून स्थापना झाली आणि नंतर न्यू कॅसल ते सेस्‌नाक फील्डपर्यंतचा भाग कोळसा उत्पादनासाठी व नदीकाठचा प्रदेश लागवडीसाठी म्हणून विकसित करण्यात आला.

१८५९ मध्ये नगरपालिकेची स्थापना होऊन, १८८५ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. अतिशय विस्तृत सुपीक पृष्ठप्रदेश आणि कोळशाचे प्रचंड साठे ह्यांमुळे न्यू कॅसल पूर्वीपासून कोळसा व शेतमालाच्या निर्यातीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. इंधन, जल, धान्यपुरवठा, व्यापारास पोषक असे स्थान, कच्चा माल आणि लोह, कोळसा, चुनखडी, डोलोमाइट, फ्ल्युओरस्फार यांसारख्या खनिजांचे स्थानिक वैपुल्य ह्या गुणवैशिष्ट्यांमुळे साहजिकच न्यू कॅसलकडे कारखानदारी व उद्योगधंदे हळूहळू आकृष्ट होत गेले आणि ते द. गोलार्धातील महत्त्वाच्या औद्योगिक शहरांपैकी एक बनले.

१९१५ मध्ये ब्रोकन हिल प्रोप्राइटरी कंपनीने येथे उभारलेला लोह-पोलाद उद्योग कोळसा उद्योगाशी स्पर्धा करू लागला. ऑस्ट्रेलियाच्या एकूण वार्षिक कोळसा व लोह-पोलाद उत्पादनाच्या अनुक्रमे ४६ व ४० टक्के उत्पादन न्यू कॅसल येथे होते. कोळसा व लोह-पोलाद उद्योगांनंतर कापड उद्योगाने ह्या भागात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले. धातू उद्योग, अभियांत्रिकी, जहाजबांधणी, दगडी कोळसा व रसायनउद्योग, कापड उद्योग, रासायनिक खते, सिमेंट, तारा, लाकूडकाम, खाद्यपदार्थ तयार करणे हे येथील इतर प्रमुख उद्योगधंदे होत.

न्यू कॅसलचे पोर्ट हंटर हे संरक्षित व अद्ययावत साधनसामग्रीने युक्त असे बंदर आहे. बंदराकडे ४१२–४५६ मी. रुंदीच्या व ९–११ मी. खोलीच्या खाडीने जाता येते. बंदरात १५ हजार टन वजन उचलण्याची क्षमता असलेली तरंगती गोदी आहे. विदेशी व्यापाराच्या दृष्टीने न्यू कॅसल हे ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या व न्यू साउथ वेल्सचे दुसऱ्या क्रमांकाचे बंदर आहे. बंदरातून प्रतिवर्षी अनुक्रमे ४० कोटी व १० कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर किंमतीचा निर्यात व आयात व्यापार चालतो. येथून दगडी कोळसा, कोळसा, कोक, डांबर, लोकर, मांस, दुग्धपदार्थ, अंडी, गहू, इमारती लाकूड, कच्चे लोखंड, पोलादाचे रूळ व पत्रे आणि रासायनिक खते यांची निर्यात केली जाते.

न्यू कॅसल हे सर्व प्रकारच्या दळणवळणाचे प्रमुख केंद्र असून येथे न्यू कॅसल विद्यापीठ, अँग्‍लिकन बिशपचे पीठ, उत्कृष्ट कलाविद्यालय व तंत्रविषयक वस्तुसंग्रहालय आहे. येथील सीमाशुल्क कार्यालय व क्राइस्टचर्च कॅथीड्रल यांच्या वास्तू प्रेक्षणीय आहेत.

 

गद्रे, वि. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate