অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नीस

नीस

नीस - फ्रान्सच्या आल्प्स मॅरिटाइम (डिपार्टमेंट) प्रांताची राजधानी आणि भूमध्य समुद्रावरील पर्यटनकेंद्र व बंदर. हे पॅरिसच्या आग्नेयीस सु. ६७६ किमी. व मार्सेच्या पूर्वईशान्येस १५८ किमी. वर असून पाइआँ नदीमुखाशी अँजेस दे उपसागरावर वसले आहे. लोकसंख्या ३,४४,४८१ (१९७५). इ. स. पू. सु. ३५० मध्ये ग्रीकांनी हे वसविले. इ. स. पहिल्या शतकात हे रोमनांनी जिंकले. सतराव्या व अठराव्या शतकांत फ्रेंचांनी हे अनेक वेळा जिंकले; परंतु यावर फ्रान्सची खरी सत्ता १८६० सालच्या तूरिन तहानंतरच आली. दुसऱ्या महायुद्धात (१९४०) हे इटलीच्या ताब्यात होते. येथील रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व विमानमार्ग यांच्या सोयी उत्कृष्ट आहेत. येथील विमानतळ फ्रान्समधील अत्यंत महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक आहे. येथून कॉर्सिकाशी नियमितपणे जलवाहतूक चालते. हे फ्रेंच रिव्हीएरा किनाऱ्यावरील आल्हाददायक हवामानाचे प्रमुख ठिकाण असल्यामुळे पर्यटन हा येथील वर्षभर चालणारा महत्त्वाचा उद्योग आहे.

औद्योगिक दृष्ट्याही हे सुधारलेले आहे. येथे अन्नप्रक्रिया, ऑलिव्ह तेल, साबण, फर्निचर, सुती व रेशमी कापड, मद्ये, सुवासिक तेले, विद्युत् उपकरणे, तंबाखू, कातडी सामान इ. उद्योगधंदे आहेत. येथे ताज्या फळांची आणि फुलांची बाजारपेठ १९६३ साली सुरू झाली. सांस्कृतिक केंद्र म्हणूनही नीसची वाढ होत आहे. येथे विद्यापीठ (१९६५), आंतरराष्ट्रीय कला विद्यालय (१९७०) व पुराणवस्तुसंग्रहालय असून दरवर्षी अनेक उत्सवही साजरे होतात; त्यांमध्ये १८७३ पासून प्रचलित असलेला ‘कार्निव्हल ऑफ नीस’ हा उत्सव महत्त्वाचा आहे. इटालियन देशभक्त गॅरिबॉल्डी आणि आंद्रे मासेना यांचे नीस हे जन्मस्थळ होय.

 

लेखक: ना. स. गाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate