चेऊल. कुलाबा जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील एक ऐतिहासिक बंदर. लोकसंख्या ८,१५० (१९७१). शिलाहार राजांच्या राजधानीचे हे ठिकाण कुंडलिका नदीच्या मुखावर (रोहा खाडीवर), मुंबईच्या दक्षिणेस सु. ५६ किमी., अलिबाग—रेवदंडा मोटार रस्त्यावर आहे. टॉलेमी, ह्युएनत्संग, अरबी आणि रशियन प्रवासी इत्यादींच्या वृत्तांतात याचा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आहे. श्रीकृष्णाच्या काळात याला चंपावती (रेवतीक्षेत्र) म्हणत.
हे यादव, आदिलशाह, पोर्तुगीज, मोगल, मराठे आणि शेवटी इंग्रज यांच्या अंमलाखाली होते. सुती व रेशमी कापड विणणे, लाकडाच्या सुबक पेट्या, पलंग वगैरे बनविणे इ. कलांत वाकबगार कारागीर येथे होते. त्यामुळे व्यापाराची खूप भरभराट झाली होती. शिवाजी महाराजांनी येथे आरमाराचे एक ठाणे वसविले होते.
येथील शितळादेवीचे देवस्थान पुरातन आहे. जवळच्या डोंगरातील बौद्ध लेणी व रेवदंडा (पूर्वीचे खालचे चौल) येथील पोर्तुगीज अवशेष लक्षणीय आहेत. अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे येथील कारागिरांना मुंबईस स्थलांतर करणे सोयीचे वाटले. त्यांतील कित्येक चौली म्हणून अद्याप ओळखले जातात.
कांबळे, य. रा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/4/2020
चौल : चेऊल. कुलाबा जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील...