অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऱ्होन

ऱ्होन

ऱ्होन

स्वित्झर्लंड व फ्रान्स या दोन देशांतून दक्षिणेस वाहत जाऊन भूमध्य समुद्रास मिळणारी यूरोपातील एक प्रमुख नदी. लांबी सु. ८१३ किमी.; पैकी ७२ किमी. जिनीव्हा सरोवरातून वाहते. ही स्वित्झर्डच्या दक्षिण सरहद्दीवरील मध्य आल्प्स रांगेत, सस. पासून सु. १,८२५ मी. उंचीवर, फूर्क खिंडीच्या पायथ्याजवळील ऱ्होन हिमनदीतून उगम पावते.

ऱ्होन नदीने स्वित्झर्लंडच्या नैर्ऋत्य भागाचे व फ्रान्सच्या आग्नेय भागाचे मोठ्या प्रमाणात खनन केलेल असून वीज प्रकल्पांमुळे फ्रान्सच्या औद्योगिक विकासात तिला महत्त्वाचे स्थान आहे. तसेच इतिहासकाळापासून सैनिकी हालचाली व व्यापारी मार्गासाठी या नदीचे खोरे (तिसरा टप्प्पा) प्रसिद्ध आहे. तीव्र उतार व अरुंद दऱ्या तसेच नदीपात्रात जागोजागी गाळाचे संचयन यांमुळे ही नदी जलवाहतुकीच्या दृष्टीने फारशी फायदेशीर ठरलेली नाही.

ऱ्होन नदीखोऱ्यातील भूरचनेनुसार उगमाकडील अल्पाईन विभाग, आल्प्स व जुरा पर्वतरांग यांदरम्यानचा खडकाळ प्रदेश व लीआँ शहरापासून मुखापर्यंतचा सपाट व गाळयुक्त प्रदेश, असे तिचे प्रमुख तीन टप्पे मानण्यात येतात. पहिल्या विभागात ही नदी सस. पासून सु. १,२०० ते १,४०० मी. उंचीवरील निदरीतून वाहते. स्वित्झर्लंडमधील ब्रिग शहरापर्यंत तिचा प्रवाह तीव्र उतार व निदऱ्या यांमुळे अत्यंत अवखळ बनला आहे. ब्रिग हे मार्तीन्यी शहरांदरम्यान ही व्हाले या सपाट प्रदेशातून वाहत असून हा भाग सस. पासून सु. ४८७ ते ७०० मी. उंचीचा आहे.

हा पहिला टप्पा बर्नीज ओबरलँड व पेनाइन आल्प्स यांनी व्यापलेला असून स्फटिकी खडकांचा प्रदेश आहे. र्स्यो शहराजवळ कठीण खडकाळ भागामुळे नदीला वेडीवाकडी वळणे प्राप्त झाली आहेत. या टप्प्यात ऱ्होनला येऊन मिळणाऱ्या नद्यांनीही खोल दऱ्या तयार केल्या आहेत. त्यामुळे वाहतूक मार्गांत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.

मार्तीन्यी शहराजवळ दक्षिणेकडून पसरलेल्या माँ ब्लां च्या डोंगररांगांमुळे ऱ्होन नदी एकदम वायव्येस वहात जाते व गाळाच्या संचयनाने बनलेले मैदान ओलांडून जिनीव्हा सरोवरात प्रवेश करते.

जिनीव्हा सरोवरापासून नदीचा दुसरा टप्पा सुरू होतो. या सरोवराच्या निर्मितीपूर्वी ऱ्होन नदी उत्तरेस नशाटेल सरोवरापर्यंत जात असावी, असे तज्ञांचे मत आहे. जिनीव्हा सरोवर ओलांडताना ही नदी नैर्ऋत्यवाहिनी बनते व जिनीव्हा शहराजवळ फ्रान्समध्ये प्रवेश करते. या शहराजवळ आर्व्ह ही प्रमुख उपनदी तिला आग्नेयीकडून मिळते. या टप्प्यात नदी जुरा पर्वतरांगाच्या जटिल प्रदेशातून वाहत असल्याने वेडीवाकडी वळणे घेते व अरुंद घळ्यांतून वाहते.

या घळ्या ‘क्ल्यूझ’ नावाने ओळखल्या जातात. बेल्लेगार्दे शहराजवळ ऱ्होनला उत्तरेकडून व्हॅल्सेरिरे नदी येऊन मिळाल्यावर ही नदी दक्षिणेस वळून एक खोल दरीतून जाते. या ठिकाणीच नदीवर झेनीस्या नावाचा २२.५ किमी. लांबीचा जलाशय निर्माण करण्यात आला आहे. या टप्प्यात तिला उत्तरेकडून मिळणारी अँ व दक्षिणेकडून मिळणाऱ्या यूसेस, फ्येर, ग्येर्स इ. प्रमुख उपनद्या आहेत.

लीआँ शहरापासून पुढे नदीचा तिसरा टप्पा सुरू होतो. या शहराजवळ नदीप्रवाह शांत बनला असून येथे ती नौवहनास अधिकृतपणे योग्य बनली आहे. लीआँ शहराजवळ उत्तरेकडून तिला सोन ही प्रमुख उपनदी येऊन मिळते. या नदीद्वारे ही उत्तरेस ऱ्हाईन नदीशी जोडण्यात आली आहे. ऱ्होनच्या सर्व उपनद्या बर्फाच्छादित डोंगराळ प्रदेशातून वाहत असल्याने तिला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो व त्याबरोबरच नदीपात्रात गाळही खूप साचतो.

आर्देश (उजवीकडून) व ईझेर, द्यूरांस, द्रॉमे (डावीकडून) इ. या टप्प्यातील तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. गाळाच्या संचयनामुळे मोंद्रागोन शहराच्या दक्षिणेस ऱ्होन नदीपात्र रूद व दलदलयुक्त बनले असून पुढील मार्गात नदीला अनेक फाटे फुटले आहेत. मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येत असल्याने मुखाकडील भागात समुद्रापासून सु. २५ किमी. आतपर्यंत (आर्ल शहरापर्यंत) त्रिभुज प्रदेशांचा विस्तार झाला आहे.

आर्ल शहरापासून हिचे ग्रँड ऱ्होन व पेटीट ऱ्होन हे दोन प्रमुख फाटे अनुक्रमे आग्नेयीस व नैर्ऋत्येस वाहत जाऊन लीआँच्या आखातात मिळतात. या फाट्यांमुळे कामार्ग बेटाची निर्मिती झाली आहे. ग्रँड ऱ्होन फाट्यापासोन पूर्वेस मार्से बंदरापर्यंत कालवे काढण्यात आले असून या दोन्ही फाट्यांच्या किनारी भागात विस्तृत कुरणे आहेत.

शेती, वीजनिर्मिती, मासेमारी यांसाठी या नदीचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने खूपच प्रयत्न करावे लागले. सांप्रत जिनीव्हा व बूर्झे या जलाशयांत मोठ्या प्रमाणात मत्स्योद्योग चालतो. खोऱ्यातील मैदाने व बेटे भातशेतीने व्यापलेली असून व्हाले प्रदेश द्राक्षमळे, फळबागा, बागायती पिके यांसाठी प्रसिद्ध आहे. कामार्ग भाग मुख्यत्वे भातशेती व द्राक्षमळ्यांनी व्यापलेला आहे.

तीव्र उतार, गाळाचे मोठ्या प्रमाणात संचयन यांमुळे ही नदी जलवाहतुकीच्या दृष्टीने फारशी उपयुक्त नाही. लीआँपासून समुद्रापर्यंतच्या काही भागात जलवाहतूक चालते. पूर्वी घोड्यांच्या साहाय्याने बोटी नदीपात्रातून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ओढून नेल्या जात असत. प्रवाहाचा वेग कमी करण्याच्या हेतूने विसाव्या शतकात या नदीवर अनेक उपमार्गी कालवे, वीज प्रकल्प व जलपाश बांधण्यात आले आहेत.

झेनीस्था (वीजनिर्मिती), दॉन्झेर-मोंद्रागोन, माँतेलीमार, बाइवसले-लोगीसनेउफ, ब्यूकास्तेल, प्येर बेनीत हे या नदीखोऱ्यातील प्रमुख प्रकल्प आहेत. जलवाहतुकीच्या दृष्टीने जरी या नदीचे गौण स्थान असले, तरी शेती, उद्योगधंदे व प्राचीन अवशेष यांसाठी नदीखोरे प्रसिद्ध आहे.

जिनीव्हा सरोवराकाठची लोझॅन व जिनीव्हा ही शहरे, यूरोपातील प्रमुख मार्गांवर बसलेले लीआँ, ईझेर व द्राक नद्यांच्या संगमावरील ग्रनॉबल तसेच ॲव्हीन्यो, व्ह्येन, आर्ल इ. गॅलो-रोमन शहरे या नदीखोऱ्यात आहेत.

भूमध्य समुद्र व उत्तर यूरोप यांना जोडणारे अनेक लोहमार्ग व रस्ते या नदीखोऱ्यातून गेलेले असून इ. स. पू. पहिल्या शतकात रोमनांनी गॉल प्रदेशावर हल्ला करताना या नदीखोऱ्यातूनच मार्ग काढला होता. इतिहासकाळात ही नदी ‘रॉदनस’ या नावाने ओळखली जात होती.

उगमाजवळच्या सेंट गॉथर्ड बोगद्याद्वारे स्वित्झर्लंडच्या पूर्व भागाशी रस्ते व लोहमार्गानी दळणवळण सांधण्यात आले आहे. यांशिवाय सिप्लॉन, गॉथर्ड इ. आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या खिंडी या नदीच्या पहिल्या टप्प्यात आहेत. तिसरा टप्पा ‘ऱ्होन वाइन’ च्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ऱ्होन व ऱ्हाईन या नद्या जोडण्याच्या दृष्टीने अनेक योजना आखण्यात आल्या आहेत.

त्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यावर उत्तर समुद्र व भूमध्य समुद्र हे जलमार्गाने एकमेकांशी जोडले हाती. ऱ्होन नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिण भागात वर्षातून एकदा यूरोपीय जिप्सींचा मेळावा भरतो.


चोंडे, मा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate