অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिन नदी

मिन नदी

मिन नदी

(१) आग्नेय चीनमधील फूक्येन प्रांतातील एक प्रमुख नदी. लांबी सु. ५७७ किमी. फूक्येन व ज्यांगशान पर्वतप्रदेशात हिचा उगम असून तेथून ती आग्नेयीकडे वाहत जाऊन दक्षिण चिनी समुद्राला फूचाऊजवळ मिळते. तिचे शीर्षप्रवाह आणि उपनद्यांमुळे बनलेली जाळीदार नदीप्रणाली मिन या नावाने ओळखली जात असली, तरी मुख्यतः नानपिंगच्या नंतरचा प्रवाह मिन नदी म्हणून ओळखला जातो.

नानपिंगच्या वरच्या भागात पूर्वीपासून नदी थोड्याफार प्रमाणात जलवाहतुकीस उपयुक्त आहे. १९५० नंतर तिचा समुद्रापासून फूचाऊपर्यंतचा खालचा प्रवाह लहान बोटींच्या वाहतुकीस खुला करण्यात आला. नानपिंगजवळ नदीतून आणलेला माल रेल्वेने पुढे फूचाऊपर्यंत पाठविण्यात येतो. येथे सागरगामी बोटी येऊ शकतात. मिन नदीचे ज्येन, फूटुन, शा हे प्रमुख शीर्षप्रवाह होत.

(२) मध्य चीनमधील पश्चिम सेचवान प्रांतातील नदी. लांबी सु. ८०० किमी. मिनशान डोंगररांगेच्या दक्षिण उतारावर ही उगम पावते. तेथून ती दक्षिणेस चेन-टू मैदानातून वाहत जाऊन यांगत्सी नदीला मिळते. ताटू (लांबी सु. ६४० किमी.) ही हिची प्रमुख उपनदी होय. इ. स. पू. दुसऱ्या शतकात जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीपासून अनेक कालवे काढण्यात आले असून ते पेंगशानजवळ म्हणजे नदीच्या खालच्या टप्प्यात पुन्हा एकत्रित करण्यात आले आहेत.

 

जाधव, रा. ग.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/25/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate