दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन या नदीची प्रमुख उपनदी. बोलिव्हिया, ब्राझील या देशांतून सामान्यपणे ईशान्य दिशेने वाहणाऱ्या या नदीची लांबी ३,३५० किमी. आहे. बोलिव्हियात उगम पावणाऱ्या मामोरे व बेनी या नद्यांचा बोलिव्हिया-ब्राझील सीमेजवळ व्हीला बेयाच्या ईशान्येस संगम होतो व त्यांच्या या संयुक्त प्रवाहास ‘मादीरा’ असे संबोधले जाते.
ही नदी व्हीला बेयापासून सु. १०० किमी. ब्राझील- बोलिव्हिया सरहद्दीवरून उत्तरेकडे वाहत जाते. पुढे आबूना नदीच्या संगमानंतर ही ईशान्यवाहिनी बनते व ब्राझीलच्या राँदोन्या व ॲमेझॉन या राज्यांतून वाहत जाऊन, मानाऊसच्या पूर्वेस सु. १४५ किमी. अंतरावर ॲमेझॉन नदीस उजव्या बाजूने मिळते. ग्वपूरे, रूझवेल्ट, कानूमा इ. हिच्या प्रमुख उपनद्या आहेत.
ॲमेझॉनच्या संगमाजवळ मादीरा नदीचे पात्र सु. ३ किमी. रुंद आहे. या संगमाजवळ दलदलयुक्त तुपिनाम्बरमा हे बेट तयार झाले आहे. मादीरा नदी उष्ण कटिबंधीय घनदाट अरण्यातून वाहत असल्याने तिच्या खोऱ्यातील बराच भाग जवळजवळ निर्जन आहे, फक्त इंडियन व मेस्टिझो जमातींच्या तुरळक वसाहती या प्रदेशात आढळतात.
या नदीच्या मुखापासून उगमाकडे अँतोन्यू धबधब्यापर्यंत सु. १,३०० किमी. जलवाहतूक चालते. उगमाकडील भागात अनेक धबधबे, द्रुतवाह असल्याने जलवाहतूक शक्य होत नाही. या नदीच्या वरच्या भागाशी संपर्क साधता यावा या दृष्टीने मादीरा-मामोरे या लोहमार्गाची उभारणी केली असून या नदीच्या व तिच्या काठच्या भागाचा जास्तीतजास्त उपयोग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मादीरा नदीखोऱ्याच्या समन्वेषणाबाबत सोळाव्या शतकापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही तिच्या खोऱ्यातील काही भागांचे समन्वेषण झालेले नाही. पोर्तुगीज मोहिमांतील फ्रांथीस्को दे एम्. पाल्हेता (१७२३), होसे गॉन्थालेस दे फोन्सेका (१७४९), होसे आउग्यूस्टाइन पालाथ्यो (१८८४), लार्डनर गिबन (१८५३) इत्यादींनी या नदीच्या समन्वेषणाचे उल्लेखनीय कार्य केले आहे.
गाडे, ना. स.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/28/2020
चिंद्विन नदी : ब्रह्मदेशातील इरावती नदीची प्रमुख...
गंडकी : हल्लीची गंडक–गंगेची हिमालयातून येणारी एक प...
पंचगंगा : कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागातून पूर...
वेण्णा : येण्णा. महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्...