অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालकाश

बालकाश

बालकाश

रशियाच्या कझाकस्तान प्रजासत्ताकातील सरोवर हे अरल सरोवराच्या पूर्वेस ९६० किमी. समुद्रसपाटीपासून ३४० मी. उंचीवर आहे. त्याची पूर्व-पश्चिम लांबी ६०५ किमी., रुंदी २४-८८ किमी. व सरासरी खोली ६ मी. असून कमाल खोली २६.५ मी. आहे.

या सरोवराची व्याप्ती १७,३०० चौ. किमी. आहे; परंतु त्याच्या क्षेत्रफळात पाण्याच्या प्रमाणानुसार बदल होत राहतो. उदा., विसाव्या शतकाच्या आरंभी व १९५८ ते १९६८ या दशकात याने १७,८७० ते १८,९०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले होते, तर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व १९३०-४० या दशकात याचे क्षेत्र १५,५४० किमी. ते १६,३१७ किमी. होते.

सर्यम्सेक द्वीपकल्पामुळे या सरोवराचे पश्चिम व पूर्व असे दोन भाग पडतात. पश्चिम भाग हा रुंद व उथळ, तर पूर्व भाग पश्चिम भागाच्या तुलनेने कमी रुंदीचा व जास्त खोलीचा आहे. हे दोन्ही भाग उझनरल या सु. ६-४ मी. खोलीच्या अरुंद सामुद्रधुनीने जोडलेले आहेत.

या सरोवरास ईली, काराताल, अक्सू, आयगूस ल्येप्स या नद्या मिळत असून सरोवरात येणाऱ्या पाण्याच्या ७५ ते ८० टक्के पाणी ईली नदीद्वारेच येते. ही नदी सरोवरास पश्चिम भागात मिळते, त्यामुळे त्या भागातील पाणी गोड असून तेथील पाण्याची प्रतिलिटर क्षारता ०.७४ ग्रॅम आहे, तर पूर्व भागातील पाण्याची क्षारता ३.५ ग्रॅम आहे. या सरोवरातून पाणी बाहेर जाण्यास एकही निर्गमद्वार नाही. येथे वा. स. वृष्टी ४३ सेंमी. आहे. सरोवरातील पाण्याचे तपमान हिवाळ्यात ००से. व उन्हाळ्यात २७ से. असून नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत सरोवरातील पाणी गोठलेले असते.

येथील प्राणिजीवन समृद्ध असून तारीम नदीखोऱ्यातील प्राणिजीवनाशी याचे साधर्म्य आहे. सरोवरात सु. २० प्रकारचे मासे असून त्यांतील पाइक, पर्च, साझन, स्टर्जन, कार्प हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. यांमुळे येथे मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.

सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर तांब्याचे साठे असून येथील बालकाश शहरात तांबे शुद्धीकरणाचे कारखाने आहेत. तसेच येथे मिठाचा व्यवसायही चालतो. सरोवराचा जलवाहतुकीसाठी उपयोग होत असून बालकाश, बूर्ल्यू-तब्ये, बूर्ल्यू-बायताल ही प्रमुख बंदरे आहेत.


गाडे, ना. स.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate