অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नायजर नदी

नायजर नदी

नायजर नदी

नाईल व काँगो यांच्या खालोखालची, आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाची नदी. लांबी ४ १८० किमी. जलवाहन क्षेत्र १८,९०,००० चौ. किमी. ही गिनीतील फूटा जालन पठाराच्या पूर्व उतारावर, अटलांटिकपासून अवघ्या २४० किमी. वर सु. ८६३ मी. उंचीवर उगम पावून प्रथम सामान्यतः ईशान्येकडे, मग पूर्वेकडे व नंतर आग्‍नेयीकडे व दक्षिणेकडे जाऊन गिनीच्या आखातास मिळते. ती गिनी, माली व नायजर देश ओलांडून, नायजर व बेनिन प्रजासत्ताक (दाहोमी) यांच्या सीमेवरून आणि पुढे नायजेरियातून वाहते. तिने मुखाशी सु. २४० किमी. लांब, ३२० किमी. रुंद व ३५,२६० चौ. किमी. क्षेत्रफळाचा विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण केला आहे.

उगमापासून तिंबक्तूपर्यंत (काहींच्या मते बामाकोपर्यंतच) वरची नायजर, मग जेबापर्यंत मध्य नायजर व पुढे खालची नायजर असे तिचे तीन भाग मानतात. वास्तविक नायजर ही दोन प्राचीन नद्यां मिळून बनलेली आहे. वरची नायजर जोलिबा नावाने तिंबक्तूनंतर तशीच पुढे सहारातील आता कोरड्या पडलेल्या एल जाऊफ सरोवरास मिळे. खालची नायजर कोरा नावाने सहारातील अहॅग्‍गर पर्वतात उगम पावे. तिने जोलिबाचे जलापहरण केले असावे.

गिनीत नायजरला मॅफाऊ, निआंदन, क्कार येथे मीलो व सीगीरी येथे तिंगकीसो या उपनद्या मिळतात. तिच्यावरील कुरूसा व मीलोवरील कांकान ही येथील इतर महत्त्वाची गावे होत. मालीमध्ये वरच्या नायजरला सांकरानी व मॉप्ती येथे बानी या उपनद्या मिळतात. बामाको, कूलीकोरो, सेगू, सांसांडिंग व तिबक्तूचे बंदर काबारा ही तिच्या काठावरील शहरे होत. बामाकोनंतरच्या सु. ८० किमी. मध्ये नायजर, वाटेवरील द्रुतवाह पार करून सु. ३०५ मी. खाली दरीत उतरते.

सांसांडिंग येथे १९४७ मध्ये बंधारा घालून कालवे काढल्यामुळे १९६९ पर्यंत सु. ५ लाख. हे. क्षेत्रास पाणी मिळून भात, कापूस, ऊस, भाजीपाला यांचे मोठे उत्पन्न येऊ लागले. येथून तिंबक्तूपर्यंत गुंफित प्रवाह,बेटे, दलदली व सरोवरे यांचा विस्तृत प्रदेश आहे. तेथेही विकासाचे प्रयत्‍न जारी आहेत. नंतर एक निदरी पार करून ताउसापर्यंत नायजर सहाराच्या दक्षिण सीमेवरून वाहते. नंतर तिच्यावर गाऊ, आन्साँगो व लॅब्‍बेझेंगा ही शहरे आहेत. नायजरमध्ये तिला गारूआ आणि नायजर – दाहोमी सीमेवर मेक्राऊ या उपनद्या मिळतात. नायजरमध्ये तिच्यावर न्यामे, साय, गाया व मालांव्हिल ही गावे आहेत. आन्साँगो ते सायपर्यंतच्या भागात पुन्हा द्रुतवाह आहेत.

नायजेरियात नायजरला गूंबा येथे केबी, सोकोटो, साकाबा;मूरेजी येथे काडूना आणि लोकोजा येथे सर्वांत मोठी बेन्वे या उपनद्या मिळतात. येल्‌वा, बूसा, काइंजी, जेबा, बारो, ईदा, ओनिचा आणि आबो ही या भागातील मुख्य ठिकाणे आहेत.

बूसानंतरच्या सु. १९० किमी. भागात पुन्हा द्रुतवाह व बूसा धबधबाही आहे. काइंजी येथे १९६९ मध्ये मोठे धरण बांधून पाणीपुरवठा व जलविद्युत् उत्पादन केले जाते. दुसरे धरण बांधून १९८२ पर्यंत आणखी ५०० मेवॉ. जलविद्युत् उत्पादन वाढविण्याची योजना आहे. १९६४ मध्ये जेबाच्या खाली बॅसीटा येथे ओलितावर मोठे ऊसनिर्मितिक्षेत्र सुरू झाले आहे.

त्रिभुज प्रदेशातील प्रवाहांवर बूरूटू व पोर्ट हारकोर्ट ही प्रमुख आणि फोर्काडोस, अकासा, डेग्येमा, वॉरी ही सागरी बंदरे आहेत. तेथून पूर्वी पामतेल निर्यात होत असे, म्हणून या प्रवाहांस तेलनद्या म्हणत. एस्क्राव्हो, फोर्काडोस, नून, ब्रास, न्यू कॅलबार, सोम्ब्रेरो, बानी हे त्रिभुज प्रदेशातील मुख्य प्रवाह होत. त्यांच्या मुखांशी वाळूचे दांडे साचतात.

नायजर नदी

 

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate