অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टायग्रिस

टायग्रिस

टायग्रिस

नैर्ऋत्य आशियातील युफ्रेटीसच्या जोडीची, तिच्या पूर्वेकडील सुप्रसिद्ध नदी. लांबी सु. १,९०० किमी. ही आग्नेय तुर्कस्तानात कुर्दिस्तानच्या पर्वतातील एका सरोवरातून निघून डिकल नावाने आग्नेयीकडे दियार्बाकरवरून जाऊन चिझ्‌रेहून सु. ५० किमी. सिरियाच्या सीमेवरून जाते.

मग फायश खाबूर येथे ती इराकमध्ये शिरते व टायग्रिस म्हणून मोसूल, अल् फता, तिक्रित, समारा, बगदाद, अल् अमारा यांवरून कुर्ना येथे येते. येथे तिला युफ्रेटीस मिळते. मग त्यांचा संयुक्त प्रवाह शट अल् अरब नावाने बसरा आणि इराणच्या सीमेवरील खुर्रामशहर, आबादान यांवरून जाऊन फाओ येथे इराणच्या आखातास मिळतो.

टायग्रिसला चिझ्‌रेपासून जवळच अल् खाबूर, मोसूल व तिक्रित यांदरम्यान इराकी कुर्दिस्तानातून आलेल्या ग्रेट झॅब व लिटल झॅब, त्यानंतर अधाइम, बगदाद येथे दियाला आणि खुर्रामशहार येथे कारुन या उपनद्या डावीकडून मिळतात. कूटपासून तिचा बांधामुळे जादा पाण्याचा शट अल् घर्राफ फाटा दक्षिणेकडे युफ्रेटीसला मिळतो. तेथे अल् हम्मार हा दलदली प्रदेश आहे. मैदानी प्रदेशात सरोवरे व दलदली पुष्कळच आहेत.

प्राचीन ॲसिरिया, बॅबिलोनिया इ. संस्कृतींच्या निनेव्ह, कालाख, सेल्युशिया, टेसिफॉन, आशुर इ. शहरांचे अवशेष टायग्रिसच्या आणि युफ्रेटीसच्या काठी आढळतात.

पर्वतप्रदेशातील बर्फ उन्हाळ्याच्या सुरुवातीस वितळून नद्यांना मोठे पूर येतात. युफ्रेटीसपेक्षा टायग्रिस पुष्कळच जास्त पाणी आणते व ती वळणावळणांनी व वेगाने वाहते.

डिजला या तिच्या अरबी नावाचा अर्थच बाण असा आहे. टायग्रिस व युफ्रेटीस मिळून पुराचे वेळी १,७५,००० क्युसेक पाणी नेतात व प्रतिदिनी ३,००,००,००० टन गाळ आणून समारानंतरच्या मैदानात पसरतात. या सुपीक प्रदेशात पावसाच्या अल्प प्रमाणामुळे प्राचीन काळापासून कालव्यांनी पाणी पुरवठा होत आहे.

आजही टायग्रिसवर व तिच्या उपनद्यांवर धरणे व कालवे आहेत. अल् फता येथील निदरीतून आणि द्रुतवाहांवरून आल्यापासून ट्रायग्रिसला कालवे काढण्यात आले आहेत. समारा धरणाचे जादा पाणी पश्चिमेकडे थार्थार द्रोणीकडे जाते. तेथे शक्ती, सिंचाई व पूरनियंत्रण यांसाठी मोठा प्रकल्प झाला आहे. बगदादनंतर टायग्रिसच्या काठी पूरतट निर्माण झाले आहेत. त्यांवरून जादा पाणी दालमाज दलदलीला मिळते.

बसरा येथे सुरू झालेल्या विस्तीर्ण त्रिभुज प्रदेशात टायग्रिस, युफ्रेटीस व त्यांचे फाटे कालव्यांनी एकमेकांस जोडलेले आहेत. समारानंतरच्या टायग्रिसचा प्रदेश उन्हाळ्यात फार उष्ण (४९0 से.) व कोरड्या हवेचा असल्यामुळे तेथे सिंचाईला महत्त्व आहे. या प्रदेशात त्यासाठी नद्यांच्या पुरावरच अवलंबून रहावे लागते. येथे खजूर, बार्ली, गहू, भरड धान्ये, तांदूळ, कापूस इ. पिके होतात. मोसूलपर्यंत खजुराचे अमाप पीक येते.

इराक साऱ्‍या जगाला खजूर पुरवितो. या प्रदेशातील जमिनींची लवणता वाढत आहे, हे दीर्घ काळापासूनच लक्षात आलेले आहे. शेतीशिवाय टायग्रिसच्या खोऱ्‍यात शेळ्यामेंढ्या, गुरेढोरे, घोडे, गाढवे, उंट इत्यादींचे कळप बाळगणे हा प्राचीन काळापासूनचा व्यवसाय आहे. अलीकडे या भागात खनिज तेल सापडल्यामुळे देशाचे आर्थिक चित्रच बदलून गेले आहे.

बसरापर्यंत तेलवाहू बोटी येतात. बसरा ते बगदाद टायग्रिसवर उथळ पाण्यात चालणाऱ्‍या नौका येतात. तेथून मोसूलपर्यंत थोड्याच नौका जातात. ‘कलाक’ या स्थानिक तराफ्यांवरून काही वाहतूक होते. बगदादजवळ वीसवीस माणसे नेणाऱ्‍या गोल टोपलीवजा ‘गुंफा’तून अजूनही थोडी वाहतूक होते. बगदाद ते मोसूल लोहमार्ग आहे. घोडा, गाढव व उंट यांचाही स्वारीसाठी व मालवाहतुकीसाठी उपयोग होतो.


कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate