অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गँबिया नदी

गँबिया नदी

गँबिया नदी

पश्चिम आफ्रिकेतील गँबिया देशाचा एकमेव व्यापारी जलमार्ग. लांबी १,१०० किमी. गिनी देशातील फूटा जालन पर्वतप्रदेशात लाबेजवळ समुद्रापासून अवघ्या २४० किमी. वर उगम पावून प्रथम ईशान्येस, मग वायव्येस आणि नेरिको व ग्रे या उपनद्या मिळाल्यावर पश्चिमेकडे वळून ती कोईनाजवळ गँबियात शिरते. बॅराकुंडा द्रुतवाहांवरून खाली येऊन ती बासे, जॉर्जटाउन, कूंता-ऊर, काउ-ऊर इ. गावांवरून एलेफंट बेटाजवळ येते. तेथून तिची १५० किमी.

लांबीची खाडी सुरू होते. तेथे ती १.६ किमी. रुंद आहे. मुखाजवळील सेंट मेरी बेटावरील गँबियाची राजधानी व प्रमुख बंदर बॅथर्स्ट (हल्लीचे बँजुल) येथे ती ५ किमी. रुंद आहे. जून ते नोव्हेंबर पूर येतात, तेव्हा नदीच्या काठी दलदली होतात. खाडीच्या दोन्ही बाजूंस उंच, सलग खारकच्छ वनस्पती आहेत.

वरच्या बाजूस प्रवाहांच्या कडेने अरण्ये व काही ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत, त्यांवर गुरे पाळतात. गँबियाची मुख्य निर्यात भुईमुगाची. त्याशिवाय पामतेल, पामगर, मेण, कातडी, चामडी यांचीही निर्यात होते. त्यासाठी सागरगामी नौका मुखापासून आत २४० किमी.  वरील कूंता-ऊरपर्यंत नियमित ये-जा करतात. कधीकधी त्या जॉर्जटाउनपर्यंतही जातात. नदीनौका बासे व कोईनापर्यंत जातात. नदीतून जाताना सुसरी, हिप्पो, बॅबून व इतर जंगली प्राणी दिसतात.

नदीच्या दक्षिणेकडून मोठी सडक झाल्यापासून प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने तिचे महत्त्व कमी झाले आहे. गँबिया नदीचा शोध पोर्तुगीजांनी लावला. टॉलेमी व अरब भूगोलज्ञ यांस ती माहीत होती. १४५५ मध्ये अलव्हायझे का द मॉस्टॉ याने तिचा थोडा भाग शोधला होता. १७५५ व १८०५ मध्ये मंगो पार्क या नदीमार्गाने गेला. १८१८ मध्ये गास्पार मॉल्यँ याने तिचा उगम संशोधिला.


कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/20/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate