रशियाच्या किरगीझिया राज्यातील सरोवर. क्षेत्रफळ ६,२०० चौ. किमी. तिएनशान पर्वतश्रेणीच्या शाखांमध्ये समुद्रसपाटीपासून १,६०९ मी. उंचीवर वसलेले हे सरोवर जगातील पहाडी सरोवरांपैकी दक्षिण अमेरिकेतील तितिकाकाखालोखाल मोठे आहे.
याची लांबी १८२ किमी., जास्तीतजास्त रुंदी ५८ किमी. व कमाल खोली ७०२ मी. आहे.
सरोवराच्या पृष्ठभागावरील पाणी २०० से. इतके उष्ण (इसिककूल म्हणजे उबदार सरोवर) असते. अनेक छोट्या ओढ्यांतून सरोवराला पाणी मिळत असल्याने याची क्षारता हजारी ५ असून कार्प जातीचे मासे विपुल प्रमाणात आढळतात.
सरोवराकाठी अनेक आरोग्यधामे आहेत.
शाह, र. रू.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/17/2020