ब्रह्मदेशाच्या दक्षिण-मध्य भागातील सु. ४३५ किमी. लांबीची उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली पर्वतरांग. ही पर्वतरांग पश्चिमेकडील इरावती व पूर्वेकडील सितांग या दोन नद्यांच्या दरम्यान सु. २०º ३०’ उ. अक्षवृत्तापासून दक्षिणेकडे १७º २०’ उ. रंगूनपर्यंत पसरलेली आहे. हिची सरासरी उंची ६०० मी. असून या पर्वतराजीच्या उत्तरेकडील भागात काही सुप्त ज्वालामुखी आहेत.
मौंट पोपा (१,५१८ मी.) हा त्यांपैकी एक असून तेच या भागातील सर्वांत उंच शिखर आहे. या पर्वतरांगेमुळे इरावती नदीखोरे सितांग नदीखोऱ्यापासून अलग झाले आहे.
या पर्वतराजीच्या पूर्वेकडील उतारावरून पेगू नदी व सितांग नदीच्या काही उपनद्या उगम पावतात. पेगूयोमाच्या उतारावर सागाची जंगले असून ती बहुतेक सरकारी मालकीची आहेत.
लिमये, दि. ह.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/9/2020
ब्रह्मदेशाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागापैकी दक्षिण...