অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिरेनीज

पिरेनीज

पिरेनीज

फ्रान्स व स्पेन यांच्या सरहद्दीवरील पर्वतश्रेणी. ही भूमध्य समुद्रापासून बिस्केच्या उपसागरापर्यंत पूर्व-पश्चिम पसरली असून तिची लांबी ४३४ किमी. आहे. क्षेत्रफळ ५५,३७४ चौ. किमी., रुंदी पूर्वेस जेमतेम १० किमी. आणि मध्यभागात १६० किमी. असून पश्चिमेस ही श्रेणी कँटेब्रिअन पर्वतात विलीन होते.

या पर्वतश्रेणीत तीन प्रमुख रांगा असून मधली रांग जास्त उंच आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे मध्यभागापर्यंत उंची क्रमाक्रमाने वाढत जाऊन तेथील मालाडेटा भागात ती सर्वांत जास्त आढळते. तेथेच स्पेनच्या हद्दीतील अनेतो हे या श्रेणीतील अत्युच्च शिखर (३,४०४ मी.) आहे. याशिवाय पोसेत्स (३,३७५ मी.), पेर्युपे (३,३५५ मी.) मालाडेटा (३,३०९ मी.), देस्तॅत्स (३,०७० मी.) इ. ३,००० मी. पेक्षा जास्त उंचीची अनेक शिखरे असून ती बहुतेक स्पेनमध्येच आहेत.

या पर्वतश्रेणीमुळे स्पेन व पोर्तुगाल (आयबेरिया द्विपकल्प) भौगोलिक दृष्या ७ यूरोपपासून अलग झालेले आहेत. दक्षिणेकडील उतारापेक्षा उत्तरेकडील उतार अधिक तीव्र आहे. पिरेनीजचा बराचसा भाग स्पेनमध्ये असून त्यात अतिविषम भूरचना व खोल दऱ्या आढळतात.

सतराव्या शतकापर्यंत या पर्वताचे काटेकोर असे शास्रीदकय संशोधन झालेले नव्हते. १५८२ मध्ये याचे पहिले समन्वेषण झाले, तर एकोणिसाव्या शतकात प्रथमच याचे भूशास्रीस्य व भूस्वरुपवर्णनात्मक नकाशे तयार करण्यात आले. तृतीयक कल्पात घड्या पडल्यामुळे ही पर्वतरांग निर्माण झाली असावी. यात तृतीयक कल्पाव्यतिरिक्त कँब्रियन-पूर्व, ग्रॅनाइट व ज्वालामुखी घडणीचेही पुरावे आढळतात. स्तरभंगाचे काही भाग तृतीयक कालानंतरचे असावेत. स्लेट, शिस्ट, संगमरवर, ग्रॅनाइट असे प्राचीन खडकही आढळतात.

स्पेन व फ्रान्स ह्या देशांतून वाहणाऱ्या अनेक नद्या पिरेनीजमध्ये उगम पावतात. फ्रान्समधील गारॉन, ओद, आडूर, आर्येझ व स्पेनमधील अँरागॉन, सींक, सेग्रे या त्या प्रमुख नद्या होत. गारॉन नदी स्पेनमधील व्हाल दारँजवळ उगम पावून पुढे चुनखडी प्रदेशातील ट्रू द टोरो या मोठ्या गुंफेत (२,००० मी.) गुप्त होऊन ग्वेइल झ्वेऊ या गुंफेतून (१,४०२ मी.) बाहेर पडते व उत्तरेकडे फ्रान्समध्ये वाहत जाते.

या सर्व प्रदेशात चुनखडी भूविशेष आढळतात. पिरेनीजमध्ये फारच थोडे प्रदेश सतत बर्फाच्छादित असून हिमरेषा १,८३० मी. वरून जाते. २,९८० मी. उंचीवरील प्रदेशात हिमगव्हर वा लोंबत्या दऱ्या आढळतात. फ्रेंच पिरेनीजमध्ये दॉसो ही प्रमुख हिमनदी असून माँव्हाल्येर व माँकाल्म येथे लहानहिमनद्या आढळतात.

प्लाइस्टोसीन काळात पूर्व व मध्य पिरेनीजमध्ये हिमनद्यांमुळे विस्तृत असे गाळाचे संचयन झाले असून सिर्क द गाव्हार्नी प्रदेशातील संचयन एखाद्यावर्तुळाकार प्रेक्षागारासारखे दिसते. पिरेनीजमध्ये अनेक खनिज – स्रोचेत, उन्हाळे तसेच नैसर्गिक वायू, लोखंड, संगमरवर, अभ्रक, बॉक्साइट, जस्त, कोळसा इत्यांदींचे साठे आढळले आहेत.

प्राकृतिक विभागानुसार येथील हवामान बदलते. पूर्व पिरेनीजमध्ये भूमध्य सामुद्रिक, तर पश्चिमेकडे अटलांटिक प्रकारचे हवामान आढळते. मध्य पिरेनीज हा या दोन्हींच्या सीमेवरील प्रदेश आहे. पर्वताच्या उत्तर व दक्षिण भागांतील आर्र्टतेत फरक असतो. गुहांमध्ये राहणारे लांडगे, रानमांजर इ. प्राणी उंच पर्वतभागात, तर इतर वन्य प्राणी दक्षिण पिरेनीजमध्ये आढळतात. दक्षिणेकडील हे प्राणी यूरोपमधून तेथे आणून सोडले आहेत. वनस्पतींचे प्रकारही पुष्कळ असून त्यांत प्रामुख्याने पाइन, फर, बीच, ओक यांचा समावेश होतो.

जास्त उंचीवरील खिंडींमुळे रस्ते व लोहमार्ग गैरसोयीचे असले, तरी आधुनिक काळात काही रस्ते व लोहमार्गांसाठी बोगदे काढले आहेत. मुख्य पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूंवरील कमी उंचीच्या दोन खिंडीतून दोन व दोन्ही समुद्रकिनाऱ्यांवरुन दोन असे एकूण चार प्रमुख रस्ते व लोहमार्ग असून त्यांद्वारे फ्रान्स व स्पेन यांच्यात वाहतूक चालते.

फ्रान्सला या पर्वतरांगेमुळे नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. उत्तरेकडे सखल प्रदेशाला लागून असलेली अँक्विटेन रांग हळूहळू लहानलहान टेकड्यांनी व मंद उतारांनी सखल प्रदेशापर्यंत गेली आहे. बहुतांशी या पर्वतरांगेच्या जलविभाजक रेषेवरुन स्पेन व फ्रान्स या राष्ट्रांची सीमा गेलेली आहे. याला अपवाद म्हणजे फक्त मालाडेटा हा जास्त उंचीचा प्रदेश होय. अँडोरा हे छोटेसे प्रजासत्ताक पिरेनीज पर्वतश्रेणीच्या दक्षिण उतारावर आहे.

विस्तृत कुरणांमधून मेंढपाळीचा व्यवसाय आणि नद्यांच्या खोऱ्यांत शेती केली जाते. बॅस्क व बेआर्नी जमातींचे लोक येथे असून त्यांची भाषा इतर यूरोपीय भाषांपेक्षा वेगळी आहे. पर्वतीय प्रदेशातील नदीप्रवाहांवर जलविद्युत् प्रकल्प उभारले असून त्यांपासून आसमंतातील कागद, कापड, लोह – पोलाद, विद्युत्-रासायनिक इ. उद्योगांना विद्युतशक्ती पुरविली जाते. पश्चिम भागात उद्योगधंदे, तर पूर्व भागात शेती व्यवसाय महत्त्वाचा आहे. मका, द्राक्षे, बटाटे, बक् व्हीट ही प्रमुख उत्पादने होत.

ही पर्वतराजी म्हणजे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. हिवाळी खेळ, शिकार व मासेमारी या छंदासाठी हा भाग प्रसिध्द आहे. फ्रान्समधील पो, तार्ब, लूर्द, बीअरिट्स, सँ-झां-द-लूझ व स्पेनमधील सॅन सिबॅसचॅन ही प्रमुख पर्यटनकेंद्रे या पर्वतश्रेणीत असून त्यांपैकी पो आणि तार्ब खनिज-स्रोदात आणि वनश्री यांसाठी प्रसिध्द आहेत.

 

संदर्भ : Monkhouse, F. J. A Regional Geography of Western Europe, London, 1959.

खातु, कृ. का.; चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate