অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंगमन (री, सिंगमान) ऱ्ही

सिंगमन (री, सिंगमान) ऱ्ही

सिंगमन (री, सिंगमान) ऱ्ही : (१८ एप्रिल १८७५-१९ जुलै १९६५). कोरियाच्या प्रजासत्ताकाचा एक संस्थापक आणि पहिला राष्ट्राध्यक्ष. हवांगहे प्रांतात उमराव घराण्यात जन्म. पारंपरिक अभिजात चिनी शिक्षणानंतर त्याने मेथॉडिस्ट शाळेत इंग्रजी व पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण घेतले व संविधानात्मक राजेशाही स्थापण्यासाठी त्याने इंडिपेन्डन्स क्लब ही संस्था १८९६ मध्ये स्थापन केली. त्याच सुमारास इंडिपेन्डन्स हे पहिले वृत्तपत्र तिच्या प्रचारार्थ त्याने सुरू केले. ह्या त्याच्या चळवळीमुळे त्यास १८९७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली; परंतु १९०४ मध्ये तो सर्वक्षमा घोषित होताच मुक्त झाला. तुरुंगात त्याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. येथून पुढे तो अमेरिकेत शिक्षणासाठी गेला व तेथे वॉशिंग्टन (ए.बी), हार्व्हर्ड (एम्.ए.) व प्रिन्स्टन (पीएच्.डी.) ह्या विद्यापीठांतून त्याने शिक्षण घेतले. पुढे १९१० मध्ये कोरियात परतल्यावर त्याने वाय्.एम्.सी.ए. तर्फे जपान्यांविरुद्ध चळवळ सुरू केली. १९१२ मध्ये शिक्षक म्हणून काम करीत असता, त्याने सर्व देशात दौरा काढून आपल्या हेतूचा प्रसार केला. ह्या त्याच्या कारवाईमुळे त्यास १९१२ मध्ये अमेरिकेत जावे लागले. पुढे ३० वर्षे कोरियाच्या स्वातंत्र्याचा प्रसार नि प्रचार त्याने इतरत्र केला. मध्यंतरी १९१९ मध्ये बंडखोरांनी कोरियाचे स्वातंत्र्य जाहीर करून तात्पुरते सरकारही प्रथम सेऊल येथे व नंतर शांघाय येथे स्थापन केले, त्याचा अध्यक्ष म्हणून ऱ्हीचीच नियुक्ती झाली.

दुसऱ्या महायुद्धात १९४५ मध्ये जपानचा पराभव झाल्यानंतर सिंगमन कोरियात आला आणि पुढे ३१ मे १९४८ मध्ये नॅशनल असेंब्लीचा चेअरमन व २० जुलै १९४८ मध्ये प्रजासत्ताकाच्या स्थापनेनंतर त्याचा सिंगमन ऱ्हीराष्ट्राध्यक्ष झाला. १९४५ नंतर कोरियाचे दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया असे दोन भाग झाले. ऱ्ही हा दक्षिण कोरियाचा राष्ट्रपती झाला व याच्याच काळात दक्षिण व उत्तर कोरिया यांमध्ये लढाई झाली. त्या काळात ऱ्ही हा अमेरिकेचा समर्थक होता. कम्युनिस्टांना त्याचा विरोध होता. पुढील अनुक्रमे १९५२, १९५६ व १९६० ह्या निवडणुकांत त्याचीच राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली; तथापि अखेरच्या निवडणुकीच्या वेळी त्याच्यावर पैशाची अफरातफर तसेच सत्तेचा दुरुपयोग करून व लबाडीने मते मिळविल्याचे आरोप करण्यात आले, एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांची उग्र निदर्शने व इतर दंगेधोपे ह्यांमुळे त्यास राजीनामा देऊन देश सोडावा लागला. तत्पूर्वी सर्व सत्ता आपल्या हाती घेऊन तो जवळजवळ हुकूमशहा बनला होता. कोरियन युद्धाचा अमेरिकेने केलेला शांतता तह त्याला मान्य नव्हता, म्हणून त्याने अमेरिकेसही विरोध करण्यास मागेपुढे पाहिले नाही. परागंदा अवस्थेत वयाच्या नव्वदाव्या वर्षी होनोलूलू येथे तो मरण पावला. त्याने स्पिरिट ऑफ इन्डिपेन्डन्स (१८९८) आणि जपान इनसाइड आउट (१९४१) ही पुस्तके लिहिली.

सिगंमन ऱ्ही याने दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या आशियाई नेत्यांच्या एका वर्गाचे प्रतिनिधित्व केले. स्वातंत्र्य चळवळीतील ऱ्हीचे कार्य मोलाचे होते, पण सत्तेवर आल्यानंतर त्याने जनतेच्या लोकशाही आकांक्षा व अधिकार यांना दडपण्याचा प्रयत्न केला; दक्षिण कोरियास अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या व आर्थिक धोरणाच्या नियंत्रणाखाली आणले. परिणामतः त्यास परागंदा व्हावे लागले.

 

संदर्भ : 1. Allen, Richard C, Korea's Syngman Rhee, Rutland, 1960.

2. Oliver, Robert T, Syngman Rhee : The Man Behind the Myth, New York. 1954.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate