অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नोरबर्ट वीनर

नोरबर्ट वीनर

नोरबर्ट वीनर : (२६ नोव्हेंबर १८९४-१८ मार्च १९६४). अमेरिकन गणितज्ञ. त्यांनी गणिताप्रमाणे काटेकोर नसलेल्या अर्थशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र वगैरे विषयांत गणितीय पध्दती रूढ करण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या पध्दतीमुळे यांत्रिक साधने व सजीव प्राणी यांच्या संदेशवहन व नियंत्रण या क्रियांच्या अभ्यासास चालना मिळाली. या शास्त्राला त्यांनी नियमन (दिशा नियंत्रण) या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून सायबरनेटिक्स असे नाव दिले. या शास्त्राचा आधुनिक विज्ञान व तंत्रविद्येवर अतिशय परिणाम झाला. तसेच यामुळे स्वयंचलनाकडे वाटचाल करण्याकरिता सैध्दांतिक पार्श्वभूमी तयार झाली.

वीनर यांचा जन्म कोलंबिया (मिसुरी) येथे झाला. त्यांचे वडील (लिओ) हार्व्हर्ड विद्यापीठात स्लाव्हिक भाषा व साहित्याचे प्राध्यापक होते. नोरबर्ट यांनी १९०९ मध्ये टफ्ट्‌स विद्यापीठाची गणित विषयातील बी.ए. पदवी संपादन केली. नंतर त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठात एक वर्ष प्राणिविज्ञानाचे अध्ययन केले. वडिलांनी सुचविल्यावरून त्यांनी तत्त्वज्ञानाचेही अध्ययन केले. १९१३ मध्ये त्यांनी गणितीय तर्कशास्त्रावर प्रबंध लिहून हार्व्हर्ड विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात थोर तत्त्वज्ञ व गणितज्ञ बर्ट्रंड रसेल आणि गटिंगेन विद्यापीठात गणितज्ञ डेव्हिड हिल्बर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली गणितीय तर्कशास्त्राचे अध्ययन केले. रसेल यांच्या सल्ल्यावरून त्यांनी सामान्य गणितात सखोल अध्ययन केले.

वीनर यांनी मेन आणि हार्व्हर्ड विद्यापीठांत काही काळ अध्यापन केले. १९०९ मध्ये त्यांनी मॅसॅचूसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील गणित विभागात प्रशिक्षकाची जागा स्वीकारली. १९३२ मध्ये ते प्राध्यापक झाले. १९६० मध्ये निवृत्त होईपर्यंत ते एमआयटी विद्याशाखेचे नामांकित सदस्य होते.

इ. स. १९२० मध्ये वीनर यांनी ब्राउनीय गतीसंबंधी गणितीय सिध्दांत सूत्ररूपाने मांडला. १९२५ मध्ये ते  हरात्मक विश्लेषण सिध्दांताकडे वळले व त्यांनी तरंगासह होणाऱ्या संदेशवहनाविषयी महत्त्वाचे संशोधन प्रसिध्द केले. त्यांचे सर्वांत महत्त्वाचे संशोधन म्हणजे विश्लेषणामध्ये संतत प्रतिसंभरणाचा उपयोग करण्याच्या पध्दती या होत. १९३२ मध्ये त्यांनी मेक्सिकन शरीरक्रियावैज्ञानिक ए. रोझेनब्लूएथ यांच्याबरोबर गणितीय शरीरक्रियाविज्ञानामध्ये संशोधन केले. यामुळे त्यांना सायबरनेटिक्समधील संकल्पनांचा विकास करण्यास अधिक मदत झाली.

दुसऱ्या महायुध्दाच्या काळात वीनर यांनी विमानवेधी गोळामार नियंत्रण उपकरणाचा अभिकल्प (आराखडा) तयार करण्यास मदत केली. या उपकरणात वैमानिकाने गोळामार (तोफांचा भडिमार) चुकविण्याकरिता केलेल्या क्रिया, दिलेल्या क्षणाला विमानाची अधिक संभाव्य असलेली गती आणि लक्ष्याच्या गतीप्रमाणे गोळामार नियंत्रणात केलेल्या सुधारणा या गोष्टी विचारात घेतल्या जातात. या संशोधनकार्यामुळे त्यांना सायबरनेटिक्स संकल्पनेची सूत्ररूपाने मांडणी करण्यास प्रेरणा मिळाली. त्यांनी संदेशांचे संकेतन व विसंकेतन करणाऱ्या पध्दतींचेही अन्वेषण केले.

वीनर यांनी सायबरनेटिक्स ऑर कंट्रोल अँड कम्युनिकेशन इन द ॲनिमल अँड द मशिन (१९४८) या ग्रंथात नवीन शास्त्राचे विस्तृत गणितीय विश्लेषण दिले आहे. तसेच मानवी व्यवहारावर होणाऱ्या त्याच्या परिणामांचे भाकितही केले आहे. नियंत्रण उपपत्ती, स्वयंचलन उपपत्ती आणि वेळेचा अपव्यय टाळणारे संगणक कार्यक्रमण यांमध्ये आता सायबरनेटिक्सचा वापर होतो. आयुष्याच्या शेवटच्या काळात वीनर यांनी सजीव प्राण्यांच्या, विशेषतः मानवाच्या, मेंदू व तंत्रिका तंत्रामधील (मज्जासंस्थेमधील) संदेशवहन व नियंत्रण या क्रियांचा सायबरनेटिक्सच्या दृष्टीने अभ्यास करण्यात अधिक रस घेतला. त्यांनी गणितातील इतर क्षेत्रांमध्ये सुध्दा सातत्याने संशोधन चालू ठेवले.

वीनर यांनी एक्स-प्रॉडिजी (१९५३) आणि आय अॅम ए मॅथेमॅटिशियन (१९५६) हे आत्मचरित्राचे दोन भाग लिहिले. त्यांनी द ह्यूमन यूज ऑफ ह्यूमन बीइंग्ज (१९५०) व गॉड अँड गोलेम : ए कॉमेंट ऑन सर्टन पॉइंट्‌स व्हेअर सायबरनेटिक्स इमपिंजेस ऑन रिलिजन (१९६४) या ग्रंथांमध्ये सार्वजनिक व खाजगी व्यवहारांकरिता गणिताच्या दृष्टिकोनातून अभिप्रेत असलेल्या अर्थासंबंधी चर्चा केलेली आहे. द फूर्ये इंटिग्रल अँड सर्टन ऑफ इट्‌स अॅप्लिकेशन्स (१९३३) नॉन-लिनीअर प्रॉब्लेम्स इन रॅंडम थिअरी (१९५८) आणि जे. पी. शाड यांच्याबरोबर संपादित केलेले नर्व्ह, ब्रेन अँड मेमरी मॉडेल्स (१९६३) व सायबरनेटिक्स ऑफ द नर्व्हस सिस्टिम (१९६५) हे त्यांचे गणितातील इतर ग्रंथ होत.

इ.स. १९६४ मध्ये वीनर यांना राष्ट्राध्यक्ष लिंडन बेंझ जॉन्सन यांनी नॅशनल मेडल ऑफ सायन्स प्रदान केले. स्वीडनला गेले असता स्टॉकहोम येथे वीनर यांचे निधन झाले.

 

लेखक - स. ज. ओक /  वि. ल. सूर्यवंशी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate