অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्रोफीम देनीसोव्ह्यिच लायसेंको

ट्रोफीम देनीसोव्ह्यिच लायसेंको

लायसेंको, ट्रोफीम देनीसोव्ह्यिच : (२९ सप्टेंबर १८९८ - २० नोव्हेंबर १९७६). रशियन कृषिशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ. वनस्पतिपोषण, जातिनिर्मिती, अंतर्जातीय आणि अंतराजातीय संबंध, परिवर्तनशीलता व आनुवंशिकता इत्यादींसंबंधी अनेक नवीन विचार त्यांनी मांडले; परंतु आता ते निराधार ठरले आहे. परंपरागत आनुवंशिकीची (पिढ्यान्‌पिढ्या चालू राहणाऱ्या लक्षणांसंबंधीच्या विज्ञान शाखेची) तत्त्वे बाजूस ठेवून आय्. व्ही. मिच्युरीन ह्या रशियन उद्यानविद्यावेत्त्यांच्या नावावरून प्रसिद्धीस आलेल्या उपपत्तीचा (मिच्युरिनिझमचा ) त्यांनी पुरस्कार केला. जुन्या लामार्कवादाचे लामार्क, झां बातीस्त प्येर आंत्वान ते एक नवीन रूप होते; तसेच ल्यूथर बरबँक यांच्या विचारसरणीशी त्याची तुलना होत असे. काही नवीन वनस्पतींची प्रजननाने निर्मिती करणे इतकाच उद्देश बरबँक यांच्यापुढे होता व त्या दृष्टीने ते यशस्वी झाले होते. त्यांनी कोणतेही नवीन नियम किंवा सिद्धांत मांडलेले नाहीत; याउलट ग्रेगोर योहान मेडेल यांनी नवीन सिद्धांत (अनुहरणविषयक) मांडले असून लायसेंको यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

लायसेंको यांनी १९२१ मध्ये लमन येथील उद्यानविद्या विद्यालयातून व १९२५ साली कीव्ह येथील कृषिसंस्थेतून पदव्या संपादन केल्या. १९२१-२९ या काळात त्यांनी संशोधनाचे काम केले. स्टॅलिन यांना अभिप्रेत असलेल्या मार्क्सवादाच्या समर्थकांनी लायसेंको यांनी पुरस्कारलेल्या मिच्युरिनिझमला राजकीय आश्रय दिला. १९३०-४० या दशकातील शेतीच्या समस्येच्या काळात रशियन नेत्यांनी लायसेंको यांना पाठिंबा दिला. काहीशा ढोबळ व अपुऱ्या प्रयोगांच्या आधारे इतर शास्त्रज्ञांना वाटत होते त्यापेक्षा अधिक जलद व कमी खर्चात अधिक अन्नधान्याचे उत्पादन करून देण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या नेत्यांना दिले होते. स्टॅलिन यांच्या कारकीर्दीत भिन्न भिन्न स्तरांवरील संशोधन संस्थांतील उच्च पदांवर त्यांना बढत्या मिळाल्या. १९४८ मध्ये सत्तेच्या जोरावर जुन्या प्रमाण आनुवंशिकीच्या शिक्षणावर व संशोधनावर त्यांनी बंदी घातली; परंतु १९५३ मध्ये स्टॅलिन यांच्या मृत्यूनंतर लायसेंको यांचे शेतीविषयक काही कार्यक्रम रद्द करण्यात आले, कारण खुद्द रशियात व बाहेर लायसेंको यांच्या विचारसरणीला विरोधाचे धक्के बसले. याच वेळी पंरपरागत आनुवंशिकीच्या अध्यापनाला आणि संशोधनाला मर्यादित स्वातंत्र्य मिळाले.

व्यक्तीने आपल्या प्रयत्नाने संपादन केलेल्या लक्षणांचे किंवा प्राण्यांवर व वनस्पतींवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या करण्यात आलेल्या संस्कारांचे अनुहरण (एका पिढीतून पुढील पिढीत आनुवंशिक लक्षणे उतरण्याची प्रक्रिया) हे लायसेंको व जुन्या परंपरेतील शास्त्रज्ञ यांच्यातील मतभेदाचे मुख्य कारण होते. १९२० पासून परंपरागत आनुवंशिकीविज्ञ संपादित लक्षणांच्या अनुहरणाचा काळजीपूर्वक अभ्यास करीत होते. लायसेंको यांना त्यांची पद्धत व मूळ कल्पना मान्य नव्हती. संपादित लक्षणे अनुहरणीय नसतात हा जुन्यांचा अनुभव व निष्कर्ष लायसेंको यांनी त्याज्य ठरविला. जनुकविधा ज्या सूक्ष्म कणांतून आनुवांशिक लक्षणे पुढच्या पिढीत उतरतात त्या जीनांचा म्हणजे जनुकांचा संच; जीन व सरूपविधा (व्यक्तीचे उपजत व नंतर विकास पावलेले स्वरूप) यांमधील सांख्यिकीच्या आधारे पूर्वी दाखवून दिलेली सुसंगती त्यांना मान्य नव्हती. सजीवांच्या सर्व अवयवांना आनुवांशिकीमध्ये समान कार्य असते, रंगसुत्रे विशेष कार्य करीत नाहीत व जनुकांना अस्तित्व नाही अशी त्यांची आग्रही भूमिका होती.

सजीवांची परिस्थितीशी एकरूपता ह्या त्यांच्या मध्यवर्ती तत्त्वाचा मन मानेल तसा अर्थ ते लावीत. आनुवंशिकीतील निर्देशित बदल, सांख्यिकीय सबळ पुरावा व प्रमाण आनुवंशिकीय संकल्पनांनी आवश्यक मानलेल्या सामग्रीमधील शुद्धता इत्यादींकडे त्यांनी लक्ष न देता काही अशास्त्रीय कल्पनांचा प्रसार चालविला होता. त्यांचे सिद्धांत व त्यांना आधारभूत अशा काही कल्पना यांमध्ये त्यांच्या सत्तेप्रमाणे बदल होत गेले. १९४८-५३ मध्ये ते रशियातील जीवशास्त्रावर सत्ता चालवीत असताना म्हणत की, योग्य परिस्थितीत गव्हाचे पीक वाढविल्यास त्यापासून रायचे पीक निघू शकेल. याचाच अर्थ असा होऊ शकतो की, जंगलातील कुत्र्यांना लांडग्याची पिले होतील. अशा विचित्र विचारसरणीमुळे स्टॅलिन यांच्या मृत्यूनंतर लायसेंको यांची अवस्था अनुकंपनीय झाली. त्यांनी सुचविलेल्या शेतीच्या उत्पादनाचे मार्ग सोडून द्यावे लागले. खनिज वरखते भरपूर वापरून सघन शेती पद्धती व अमेरिकेच्या धर्तीवर संकरित मक्याचा कार्यक्रम प्रयत्नपूर्वक राबविण्यात येऊ लागला. यालाच त्यांनी पूर्वी विरोध केला होता.

न्यिक्यित खुश्चॉव्ह यांच्या कारकीर्दीत जरी लायसेंको यांच्या कार्यक्रमांना विरोध झाला, तरी तो खपवून घेतला गेला. मात्र लेनिन ॲग्रिकल्चरल ॲकॅडेमीवरील त्यांचा ताबा कमी झाला. १९६४ अखेर खुश्चॉव्ह यांच्या राजकीय अस्तानंतर लायसेंको याचे सिद्धांत मागे पडले व परंपरागत प्रमाण आनुवंशिकीची पुनर्स्थापना करण्याचे निकराचे प्रयत्न केले गेले. १९६५ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्सच्या संचालक पदावरून लायसेंको यांना दूर करण्यात आले. १९७६ मध्ये कीव्ह (युक्रेन) येथे त्यांचे देहावसान झाले.

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate