टॅलकॉट एडवर्ड पार्सन्झ : प्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ. जन्म कोलोरॅडो स्प्रिंग्ज येथे. वडिलांचे नाव एडवर्ड आणि आईचे मेअरी ऑगस्टा. ॲमहर्स्ट महाविद्यालयातून जीवशास्त्रात पदवी घेतल्यावर (१९२४) जर्मनीतील हायड्लबर्ग विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्राची पीएच्.डी. संपादन केली (१९२७).
नंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथे समाजशास्त्र व मानवशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. १९२७ साली हेलेन वॉकर हिच्याबरोबर विवाह. त्याच वर्षी समाजशास्त्राचे मार्गदर्शक म्हणून ते हार्व्हर्ड विद्यापीठात नियुक्त झाले आणि पुढे १९४४ पासून १९७३ पर्यंत या विषयाचे प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. समाजशास्त्रातील त्यांच्या कामगिरीचा गौरव त्यांना डॉक्टरेटचा बहुमान देऊन अनेक विद्यापीठांनी केला.
पार्सन्झ हे आधुनिक समाजशास्त्रातील अग्रणी सैद्धांतिक विचारवंत आहेत. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, मानवशास्त्र, आधुनिक मनोविश्लेषणशास्त्र इ. विषयांतील विविध संकल्पनांचा त्यांनी आपल्या प्रतिपादनात आधार घेतलेला आहे. या व्यापक सैद्धांतिक पार्श्वभूमीमुळे पार्सन्झ यांची बहुतेक ग्रंथरचना मौलिक संदर्भग्रंथ म्हणून मान्यता पावली आहे. स्थूलमानाने त्यांच्या लेखनाची तीन प्रकारे विभागणी करता येईल :
पार्सन्झ यांची ही सर्वच रचना त्यांच्या विशिष्ट सैद्धांतिक भूमिकेमुळे एकात्म बनली आहे. त्यांची ही भूमिका ‘रचनावादी व कार्यवादी मीमांसा’ ही संकल्पना सामाजिक संरचनेचे विश्लेषण करणाऱ्या अनेक सिद्धांतांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरते. सामाजिक व्यवस्थेचे कारक घटक आणि तिच्यातील विविध प्रक्रिया यांच्यातील परस्परसंबंध हे स्थितिशील नसतात. ही एकूण प्रक्रिया गतिमान स्वरूपाची असते. गतिमान अशा या सहेतुक प्रक्रिया त्या व्यवस्थेच्या सरंचनेचा भाग होत; परंतु त्यांचे खरे मूल्य त्या व्यवस्थेच्या धारणेसाठी त्या जे कार्य करतात, तेच होय. ही कार्ये – म्हणजे विशिष्ट रचनाकल्पांची व प्रक्रियांची विशिष्ट कार्ये- हीच सामाजिक व्यवस्थेच्या धारणेसाठी आवश्यक असलेल्या व अस्तित्वात असलेल्या पूर्व-अटी असतात. आपल्या व मीमांसेद्वारा सामाजिक व्यवस्था, तिची संरचना आणि कार्यपद्धती यांच्यात एक अन्वर्थक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न पार्सन्झ यांनी केला आहे .
सामाजिक व्यवस्थेच्या विश्लेषणासाठी एक पद्धतशीर व प्रमाणभूत अशी विचारचौकट बांधण्याचा पार्सन्झ यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने सामाजिक वर्तनप्रक्रियांचे विश्लेषण ते आधुनिक मनोविश्लेषणशास्त्र, वर्तनवादी मानसशास्त्र यांतील विविध संकल्पनांच्या आधारे करतात. आपल्या संबंधित विश्लेषणासाठी त्यांनी क्रियावादी सिद्धांताचे उपयोजन केले आहे. एखाद्या सामाजिक व्यवस्थेच्या अंतर्गत लहान लहान घटकसमूह व त्यांच्या व्यवस्था कार्यान्वित असतात; परंतु या घटक समूहांची कार्ये आणि समग्र व्यवस्थेची संरचना व कार्य यांच्यातील आंतरसंबंध हे एकात्म असतात. त्यामुळे एखाद्या घटकसमूहाचे सूक्ष्म विश्लेषण हेही त्या समग्र व्यवस्थेच्या आकलनासाठी व विश्लेषणासाठी मार्गदर्शक ठरते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. या दृष्टीने त्यांचे फॅमिली हे पुस्तक उल्लेखनीय आहे. बीजकुटुंब या मूलभूत लहान घटकसमूहाचे सूक्ष्म विश्लेषण करून सामाजिक संरचनेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यात केला आहे.
यांखेरीज समाजशास्त्र व इतर आनुषंगिक शास्त्रे यांच्यातील एकात्म संबंध; समाजशास्त्रातील सिद्धांत व अनुभववादी संशोधन यांच्यातील संबंध; सूक्ष्म व समष्टी समाजशास्त्रांतील एकात्म संबंध; माक्स वेबर, एमील द्यूरकेम व व्हिलफ्रेदो पारेअतो यांच्या कृतींचे विश्लेषण; सामाजिक क्रिया, संस्था, घटक, व्यक्तिमत्त्व इ. संकल्पनांच्या व्याख्या व विश्लेषण इ. विविध विषयांवरील चिकित्सक विवेचनही त्यांनी आपल्या कृतींमधून केलेले आहे. विविध नियतकालिकांतून त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झालेलले असून एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्सेस व एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका मधूनही त्यांनी संबंधित विषयांवर लेखन केलेले आहे.
लेखक - प्रतिभा पोरे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजश...
फिनिश समाजशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. फिनलंडमधी...
प्रसिद्ध ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ व सांख्यकीतज्ञ, ज...
जर्मन समाजशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बूडापेस्ट (हंगे...