जेम्स जोसेफ सिल्व्हेस्टर : (३ सप्टेंबर १८१४— १५ मार्च १८९७). इंग्रज गणितज्ञ. बीजगणित या विषयात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले असून आव्यूह सिद्घांतातील रिक्तता नियम त्यांच्या नावाने प्रसिद्घ आहे. सिल्व्हेस्टर यांचा जन्म लिव्हरपूल (लंडन) येथील ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण लंडनमधील हायगेट व इलिंग्टन येथील ज्यू मुलांसाठीच्या शाळेत झाले. १८२९ मध्ये त्यांनी लिव्हरपूल येथील रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तेथे ते गणितात प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे विजेते ठरले. १८३१— ३३ या काळात त्यांचे शिक्षण केंब्रीज येथील सेंट जॉन कॉलेजमध्ये झाले. १८३७ मध्ये ते ट्रायपॉस परीक्षा दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले; परंतु त्यांना पदवी दिली गेली नाही (नंतर १८७१ मध्ये इंग्लिश चर्चने नियम बदलल्यानंतर त्यांना केंब्रीज समतुल्य पदव्या १८७२— ७३ मध्ये मिळाल्या). डब्लिनला त्यांनी बी.ए. आणि एम्.ए. या पदव्या संपादन केल्या (१८४१). फिलॉसॉफिकल मॅगेझीनमध्ये प्रसिद्घ केलेल्या शोधनिबंधामुळे १८३९ मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो झाले. ते लंडन विद्यापीठात (१८३८) व व्हर्जिनिया विद्यापीठात (१८४३)प्राध्यापक होते. १८४६ मध्ये त्यांनी ‘इनर टेंपल’ मध्ये कायद्याचा अभ्यास सुरु केला व १८५० मध्ये ते बॅरिस्टर झाले.ते वूलविच येथील मिलिटरी ॲकॅडेमीमध्ये गणिताचे प्राध्यापक होते (१८५५— ६९). १८७६ मध्ये ते जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात प्राध्यापक झाले. तेथे त्यांनी अमेरिकन जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स या नियतकालिकाची स्थापना केली व त्यामध्ये ३० शोधनिबंध प्रसिद्घ केले. ते ऑक्सफर्ड येथे भूमितीसाठी असलेले सॅव्हिलियन प्राध्यापक होते.(१८८३— ९४).
सिल्व्हेस्टर यांचे सर्वाधिक संशोधन बीजगणित विषयातील आहे. ऑर्थर केली यांच्या समवेत त्यांनी निर्धारक सिद्घांत विकसित केला व त्याचे बीजगणिताव्यतिरिक्त इतर विषयांतही उपयोजन केले. त्यांनी संख्या सिद्घांतातही काही महत्त्वाची प्रमेये सिद्घ केली. त्यांनी निश्चलाविषयी पुष्कळ संशोधन केले. समचयात्मक पद्घतीतही त्यांचे मूलभूत योगदान होते . द्विघाती रुपे प्रसामान्य रुपात मांडण्याविषयीही त्यांनी संशोधन केले. गणितामध्ये पुष्कळ नवीन संज्ञा प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
वूलविच येथील मिलिटरी ॲकॅडेमीमध्ये प्राध्यापक असताना सिल्व्हेस्टर यांनी क्वार्टर्ली जर्नल ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स हे नियतकालिक सुरु केले व त्याचे संपादक म्हणून १८७७ पर्यंत काम केले. द मॉर्गन यांनी स्थापन केलेल्या मॅथेमॅटिकल सोसायटीचे ते अध्यक्ष होते (१८६६–६८). ब्रिटिश ॲसोसिएशनतर्फे १८६९ मध्ये भरलेल्या अधिवेशनात सिल्व्हेस्टर गणित व भौतिकी या शाखेचे अध्यक्ष होते. त्यांना ग्रीक, लॅटिन, जर्मन वगैरे यूरोपीय भाषा अवगत होत्या. त्यांना रॉयल पदक (१८६१), कॉप्ली पदक (१८८०) आणि द मॉर्गन पदक (१८८७) ही मानचिन्हे मिळाली. तसेच त्यांना डब्लिन (१८६५), एडिनबर्ग (१८७१), ऑक्सफर्ड (१८८०) व केंब्रीज (१८९०) या विद्यापीठांनी सन्माननीय पदव्या बहाल केल्या.
सिल्व्हेस्टर यांचे संशोधन सर सॅम्युएल बेकर यांनी द कलेक्टेड मॅथेमॅटिकल पेपर्स ऑफ जेम्स जोसेफ सिल्व्हेस्टर या नावाने चार खंडांत प्रसिद्घ केले.
सिल्व्हेस्टर यांचे ऑक्सफर्ड (इंग्लंड) येथे निधन झाले.
लेखक - स. ज. ओक / व. ग. टिकेकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/21/2020
रशियन गणितज्ञ. त्यांनी यहच्छ प्रक्रियांचा सिद्धां...
ही बीजगणितातील एक महत्त्वाची शाखा आहे. यामध्ये बीज...
कलन या गणितशाखेचे अवकलन व समाकलन असे दोन विभाग मान...
फ्रेंच गणितज्ञ. उच्च बीजगणितात महत्त्वाचे कार्य. त...