एनिअस क्विन्टस : (२३९ – १६९ इ. स. पू.). प्रसिद्ध रोमन (लॅटिन) कवी. ह्याचा जन्म कालेब्रियातील रुडिआ येथे झाला. त्याला ऑस्कन (दक्षिण इटलीतील एक प्राचीन भाषा; सध्या मृत), ग्रीक आणि लॅटिन ह्या भाषा अवगत होत्या. सार्डिनियातील दुसर्या प्यूनिक युद्धाच्या वेळी तो रोमन सैन्यात होता. तेथे तो ‘सेंट्यूरियन’ म्हणजे शंभर सैनिकांचा प्रमुख ह्या पदापर्यंत चढला. थोरल्या केटोशी त्याची मैत्री जमली आणि केटोने त्याला इ. स. पू. २०४ मध्ये रोमला नेले. रोम येथे सिपिओ अॅफ्रिकेनसच्या वर्तुळातील लोकांशी त्याची मैत्री जमली. इ. स. पू. १८४ मध्ये त्याला रोमचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. रोममध्ये तो लेखन व अध्यापन करू लागला. त्याने लॅटिनमध्ये अनेक नाटके लिहिली; त्यांतील बहुतेक नाटके ð युरिपिडीझच्या ग्रीक नाटकांची रूपांतरे व अनुवाद आहेत.
एनिअसच्या उपरोधिका आणि विशेषत: त्याचे आन्नालेस हे महाकाव्य विशेष प्रसिद्ध आहे. हे महाकाव्य त्याने ग्रीकमधील वीररसात्मक हेक्झॅमीटरमध्ये लिहिलेले आहे. हेक्झॅमीटरचा वापर लॅटिनमध्ये प्रथम करणारा कवी एनिअसच मानला जातो. त्याने हे महाकाव्य अठरा भागांत लिहिले. त्यात त्याने रोमचा फार प्राचीन काळापासून तो स्वत:च्या काळापर्यंतचा इतिहास वर्णिला आहे. थोड्याच अवधीत त्याचे प्रस्तुत महाकाव्य अत्यंत लोकप्रिय ठरले व रोमच्या शाळांतून पाठ्यपुस्तक म्हणून लावले गेले. अभिजात लॅटिन साहित्यातील सर्वच साहित्यिकांनी एनिअसच्या महाकाव्याची प्रशंसा केली आहे. अफाट लोकप्रियता लाभलेल्या त्याच्या या महाकाव्याचा फारच थोडा भाग (सु. ६०० ओळी) आज उपलब्ध आहे. लॅटिन काव्याचा जनक म्हणून त्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. व्हर्जिल, लुक्रीशिअस आणि ऑव्हिड यांच्यावर एनिअसचा प्रभाव दिसून येतो.
लेखक - जॉ. (इ.) हंबर्ट / भा. ग. (म.) सुर्वे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/15/2020
शेती आणि शेतकऱ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या या महा...
क्रांतिवादी बंगाली कवी. त्यांचा जन्म चुरुलिया (जि...