अर्नेस्ट चे गेव्हारा : (१४ जून १९२८—९ ऑक्टोबर १९६७). क्यूबातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. अर्जेंटिनातील रोझार्यो येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. त्याने वैद्यकातील पदवी संपादन केली होती. क्यूबाच्या क्रांतीत फिडेल कास्ट्रोच्या बरोबरीने तो लढला आणि त्या क्रांतीला स्थैर्य आणण्यासाठी १९६५ पर्यंत त्याने अविरत कार्य केले. नंतर तो क्रांतीचा प्रसार करण्यासाठी स्वखुषीने मंत्रिपद सोडून लॅटिन अमेरिकेत गेला. गनिमी दलाचे नेतृत्व करीत असताना बोलिव्हियन सैनिकांनी त्याला गोळी घालून ठार केले.
फिडेलप्रमाणेच चे गेव्हारा हा गनिमी युद्धतंत्राने व शस्त्रबळानेच क्रांती घडवून आणता येईल, अशा ठाम मताचा होता. या क्रांतीचे स्वरूप आणि व्याप्ती यांबद्दल त्याच्या कल्पना निश्चित व स्पष्ट होत्या. लॅटिन अमेरिकेतील क्रांती हिंसात्मक, प्रदीर्घ आणि खंडव्यापी स्वरूपाची असेल; एखाद्या देशाला क्रांती करून तिला स्थैर्य आणणे हे अतिशय अवघड काम आहे; प्रत्येक देशातील भांडवलदार वर्ग हा अमेरिकन साम्राज्यवाद्यांना सामील झालेला असून साम्राज्यवाद्यांच्या भवितव्याशी त्याने आपले भवितव्य जोडले आहे; क्रांतीची मुख्य शक्ती शेतकरी वर्गातच असते; आपल्या शेतकऱ्यांत सुप्त शक्ती आहे आणि तिचा उपयोग अमेरिकेच्या मुक्तीसाठी केला पाहिजे; शेतकऱ्यांना कामगार व बुद्धिजीवी वर्ग यांच्या नेतृत्वाची गरज असते; लॅटिन अमेरिकेत सर्वत्र क्रांतीला अनुकूल परिस्थिती आहे; गनिमी युद्ध हाच सत्ता काबीज करण्याचा एकमेव मार्ग आहे; गनिमी युद्ध हे जनतेचे युद्ध असते; तो एक प्रकारचा सामुदायिक संघर्ष असतो; स्थानिक जनतेच्या सहकार्याशिवाय गनिमी युद्ध चालविण्याचा प्रयत्न केला, तर पराभव निश्चित समजावा इ. त्याच्या विचारसरणीची काही अंगे होत.
प्रथमपासून त्याचा भर क्यूबामध्ये एक समाजवादी मानव निर्माण करण्यावर होता. याउलट समाजवादी मनुष्य घडविण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण केली पाहिजे, अशी क्यूबातील साम्यवाद्यांची भूमिका होती. गेव्हाराचे म्हणणे होते, की समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण केल्यानंतरसुद्धा जर मनुष्याचा लोभ व वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यांनाच उत्तेजन मिळून सामूहिकतेची भावना दिली जाणार असेल, तर तिचा काही उपयोग नाही.
गनिमी दलाबरोबर राहून त्याचे नेतृत्व करून प्राणपणाने लढण्याचे काम असो, की क्रांती यशस्वी होऊन सत्ता काबीज केल्यानंतर नव्या क्रांतिकारक सरकारचे उद्योगखाते वा बँक यांचे संचलन करण्याची जबाबदारी असो, चेने दोन्ही जबाबदाऱ्या तळमळीने, निष्ठेने आणि क्रांतिकारक ध्येयवादाने पार पाडल्या. क्यूबातील क्रांतीसंबंधीच्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या आहेत, आता अन्यत्र क्रांतीची सेवा केली पाहिजे, या भावनेनेच कास्ट्रोच्या संमतीने त्याने एप्रिल १९६५ मध्ये क्यूबा सोडला.
चेची ही क्रांतिनिष्ठा, प्रस्थापित मार्क्सवाद-लेनिनवादापेक्षा वेगळी विचारसरणी व गनिमी युद्धतंत्राचा पुरस्कार यांमुळे चेबद्दल विशेषतः तरूण वर्गात आकर्षण निर्माण झाले. केवळ लॅटिन अमेरिकेतच नव्हे, तर उत्तर अमेरिकेत व सर्व यूरोपभर चेला नायक व आदर्श मानणारे असंख्य तरुण असून त्यांचे ‘चे गेव्हारा गट’ अस्तित्वात आहेत. श्रीलंकेमध्येही गेव्हाराचा क्रांतिवाद मानणारा पक्ष आहे. १९७१ मध्ये त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत झालेला उठाव अयशस्वी झाला.
लेखक - दिनकर साक्रीकर
स्त्रोत- मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
पिलसूतस्की, यूझेफ : (५ डिसेंबर १८६७–१२ मे १९३५). प...
एकोणिसाव्या शतकातील प्रसिध्द रशियन क्रांतिकारक व अ...
इंग्लंडमधील एक राजकीय मुत्सद्दी व क्रांतिकारक. त्य...
एक सुविख्यात कृषितज्ञ व भारताबाहेर राहून भारतीय स्...