অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऱ्होड आयलंड

ऱ्होड आयलंड

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ईशान्येकडील न्यु इंग्लंड या सहा राज्यांच्या विभागीय प्रदेशातील एक राज्य, तसेच देशातील मूळ तेरा वसाहतीपैंकी एक वसाहत. क्षेत्रफळ ३, १४४ चौ. किमी. पैकी ४२८ चौ. किमी. अंतर्गत जलाशयांखाली. लोकसंख्या ९,७५,००० (१९८६ अंदाज). दक्षिणोत्तर कमाल लांबी ७७ किमी. व पूर्व-पश्चिम कमाल रुंदी ६० किमी. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ४१, १८' ते ४२ ०१' उत्तर व ७१ ४८' ते ७१' ०७’ पश्चिम असा आहे.

क्षेत्रफळाने हे देशातील सर्वात लहान राज्य असून लोकसंख्येची घनता मात्र जास्त आहे. याच्या उत्तरेस व पूर्वेस मॅसॅचूसेट्स, पश्चिमेस कनेक्टिकट ही राज्ये व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहे. राज्याला ६४ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रॉव्हिडन्स (लोकसंख्या १,५६,८०४-१९८०) हे राज्यातील सर्वात मोठे व राजधानीचे शहर आहे.

भूवर्णन

राज्याचे पूर्वेकडील कोस्टल लोलँड्स, पश्चिमेकडील ईस्टर्न न्यू इंग्लंड अपलँड असे दोन मुख्य नैसर्गिक विभाग पडतात. कोस्टल लोलँड्स हा 'न्यू इंग्लंड सी बोर्ड लोलँड्स,' चाच भाग आहे. हा कमी उंचीचा वालुकामय प्रदेश असून त्यातील काही भाग नॅरागँसिट उपसागराखाली गेलेला आहे. या विभागाची सस. पासून सर्वाधिक उंची ६० मी. आहे. या विभागात ऱ्होड आयलंड (अक्किड्‌निक), कनॅनिकट व प्रूडन्स ह्या तीन मोठ्या व इतर अनेक लहान बेटांचा समावेश होतो. यांशिवाय किनाऱ्यापासून दक्षिणेस १६ किमी. वर ब्लॉक बेट आहे. येथील बेटावर व किनारी भागात कडे आढळतात; तसेच किनारी भागात, विशेषतः जूडथ भूशिराच्या पूर्वेस पुळणी, खारकच्छे व खाऱ्या पाण्याची तळी आहेत.

श्चिमेकडील नैसर्गिक विभागाने राज्याचे सु. ६६ टक्के क्षेत्र व्यापले आहे. हा भाग डोंगराळ व उंचसखल असून तो 'न्यू इंग्लंड अपलँडस'' चाच भाग आहे. 'वेस्टर्न रॉकी अपलँड' या नावाने राज्यातील हा विभाग ओळखला जातो. या विभागाची सर्वाधिक उंची (२४७ मी.) पश्चिम सरहद्दीवरील जेरिमॉथ टेकडीत आढळते. पूर्वेकडून पश्चिमेकडील या प्रदेशाची उंची वाढत गेलेली आहे. या उच्चभूमीच्या प्रदेशात अनेक लहानलहान सरोवरे, जलाशय, तळी असून किनाऱ्यावर पुळणी आहेत. राज्यात उंच पर्वतीय प्रदेश मात्र नाही.

ऱ्होड आयलंडमधील बहुतांश जमीन नापीक आहे. नॅरागँसिट उपसागर किनारी भागातील मिआमी दगडयुक्त लोम, तांबट ह्या येथील सुपीक मृदा असून त्यांनी राज्याचे वीस टक्के क्षेत्र व्यापले आहे. ईशान्य भागात वॉरिक वालुकामय लोम मृदा आढळते. ग्लॉसेस्टर दगडयुक्त लोम ह्या अम्लीय वालुकामय मृदेने राज्याचे जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले असून ती कमी सुपीक आहे.

राज्यात विशेष महत्त्वाचे खनिजसाठे नाहीत. वाळू, खडक, बारीक खडी यांचेच काय ते मोठे साठे आहेत. वायव्य व ईशान्य भागांत चुनखडी, तर नैऋत्य भागात वेस्टर्ली शहराच्या आसमंतात ग्रॅनाइटचे साठे आहेत. राज्याचे हवामान आर्द्र खंडीय प्रकारचे असून तापमानातील विषमता सागरसान्निध्यामुळे कमी झालेली आहे. जानेवारीचे सरासरी तापमान मॅसॅचूसेट्स सरहद्दीवर -३ से. व किनारी प्रदेशात -१ से. असते.

जुलैचे सरासरी तापमान बहुतांश भागात २१ से असते. राज्यातील कमाल तापमानाची (४० से.) नोंद प्रॉव्हिडन्स येते २ ऑगस्ट १९७५ रोजी झाली, तर न्यूनतम तापमानाची (-३१ से.) नोंद किंग्स्टन येथे ११ जानेवारी १९४२ रोजी झाली. वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. १०० सेंमी. तर हिमवृष्टी ७९ सेंमी. आहे. वर्षभर सरासरी सापेक्ष आर्द्रता ७० टक्के असते. उन्ह्याळ्यात किनारी प्रदेशातील हवामान सामान्यपणे आल्हाददायक असते. कधीकधी हरिकेन व सागरी लाटा यांचा तडाखा राज्याच्या किनारी भागाला बसतो. १८१५, १९३८, १९४४ व १९५४ मधील हरिकेन वादळे जास्त विनाशकारी होती.

क, पाइन, जूनिपर, श, हिकरी, एल्म, विलो, मॅपल, वर्च, पॉप्लर, सीडार ह्या येथील स्थानिक वनस्पती आहेत. पिवळी, पांढरी, निळी व जांभळ्या रंगांची डॉगवुड, लॉरेल, ऱ्होडोडेंड्रॉन ही फुलझाडे आढळतात. याशिवाय लिकी, गोल्डन रॉड, डेझी, ब्लॅकबेरी व ब्लूबेरी, हकलबेरी, पॉयझन आयव्ही आणि पॉयझन सुमाक ह्या वनस्पीही आढळतात.

राज्याचे ६४% क्षेत्र अरण्यांखाली आहे. तीन प्रकारची अरण्ये असून त्यांपैकी ७३% क्षेत्र ओक, २५% ओक-पाइन, तर उरलेले २% क्षेत्र सीडार यांच्या अरण्यांनी व्यापलेले आहे.

राज्यात वन्य प्राणिजीवन मर्यादित आहे. ससा, वुडचक, खार, कोल्हा, चिचुंद्री, स्कंक, मिंक, रॅकन, ऊद मांजर व हरिण हे प्राणी आढळतात. पक्षिजीवन मात्र विपुल व वैविध्यपूर्ण आहे. ऑस्प्रे, सँडपायपर व श्वेत आर्क्टिक घुबड हे पक्षी येथे आढळतात. किनाऱ्याजवळील जलाशयात क्लॅम, ऑयस्टर, शेवंडा, ब्लूफिश, तलवार मासा, सागरी बास, कॉड, मॅकेरल, हेरिंग, ब्लॅकफिश, पट्टेरा बास, तर अंतर्गत जलाशयांत बास, पर्च, ट्राउट आणि पिकॅरेल हे माशांचे विविध प्रकार आढळतात.

विपुल जलसंपदेमुळे राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. प्रॉव्हिडन्स, सकॉनिट व सीकाँक ह्या राज्यातील तीन मुख्य नद्या म्हणजे नॅरागँसिट उपसागराचे फाटेच आहेत. पटकिट, पेटकामस्क्ट, पॉटॉवॉमट व वुन्सॉकिट ह्या मुख्य नद्या राज्यातून वाहतात. उत्तर भागातून वाहणारी ब्लॅकस्टोन नदी प्रथम पटकिट व नंतर सीकाँक या नावांनी ओळखली जाते; पुढे ती नॅरागँसिट उपसागरास मिळते. नैऋत्य भागातून वाहणारी पटकिट नदी काही अंतर ऱ्होड आयलंड-कनेक्टिकट सरहद्दीवरून वाहते. यांशिवाय, चीपॅचिट, पॉनागनसेट व वुड ह्या इतर महत्त्वाच्या नद्या आहेत.

राज्याच्या अंतर्गत भागातून वाहणाऱ्या नद्या लहान, परंतु शीघ्रगामी आहेत. त्यांच्या पात्रांत अनेक ठिकाणी धबधबे निर्माण झालेले आढळतात. सरोवरे, जलाशय व तळ्यांची संख्याही राज्यात बरीच आहे. सिचुवेट हा राज्यातील सर्वात मोठा जलाशय आहे. वॉचऑग व वर्डन ही येथील महत्त्वाची तळी आहेत.

नॅरागँसिट उपसागर किनाऱ्यावरील बंदरांचा राज्याच्या सुरूवातीच्या काळातील व्यापारी विकासात फार मोठा हातभार लागला आहे. आजही व्यापारी जहाजवाहतूक, नौसेना उपकरणे व प्रशिक्षणकेंद्र यांची स्थापना, मनोरंजन, मासेमारी या दृष्टीनी या उपसागराला फार महत्त्व आहे. राज्यातील नद्या वीजउत्पादनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या असून येथील कापडगिरण्या व इतर कारखाने ह्यांना सुरूवातीपासूनच त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate