অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोझार्यो

रोझार्यो

अर्जेटिनामधील दुसऱ्या क्रमांकाचे व्यापारी आणि औद्योगिक शहर, तसेच महत्त्वाचे नदीबंदर. लोकसंख्या उपनगरांसह ९,५७,३०१ (१९८०). हे शहर देशाच्या मध्य- पूर्व भागात, ब्वेनस एअरीझच्या वायव्येस सु. २९० किमी. अंतरावर पाराना नदीकाठी वसले आहे.

वसाहतकऱ्यांपैकी लुइस रोमेरो दे पिनेदा या सैनिकाने १६८९ मध्ये येथे एक बंगला बांधला होता. हळूहळू सँता फे येथील लोकांची बंगल्याभोवती वसती वाढत जाऊन १७२५ मध्ये या वसाहतीला ‘रोझार्यो’ हे नाव देण्यात आले. १७३१ मध्ये येथे ‘नुएस्त्रा सेनोरा देल रोझार्यो’ (अवर लेडी ऑफ द रोझरी) ह्या चर्चची स्थापना झाली, तर १७७८ मध्ये पहिली शाळा सुरू करण्यात आली. १८१० च्या मे ‘मे क्रांती’ ला रोझार्योने मदत केली होती. प्रांतांच्या स्वातंत्र्य-संग्रामात या शहराचे खूपच नुकसान झाले. १८१९ मध्ये या शहराची मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. त्यानंतर नव्याने उभारलेले शहर १८२९ मध्ये क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा उद्‌ध्वस्त केले. पुढे १८५२ पर्यंत शहराची पुनर्रचना करण्यात येऊन १८५४ मध्ये शहरात पहिली बँक स्थापन झाली. १८५९ मध्ये हे उत्तरेकडील अकरा प्रांतांचे आयात-निर्यातीचे अधिकृत व प्रमुख बंदर बनले. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध व विसाव्या शतकाचा प्रारंभ या काळात फ्रान्सच्या सहकार्याने या बंदराचा झपाट्याने विकास करण्यात आला. १८६३ मध्ये हे बंदर कॉर्दोव्हा शहराशी रेल्वेने जोडण्यात आले. १९४० च्या दरम्यान धान्य व्यापाराचे जगातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून रोझार्योची प्रसिद्धी होती. या काळात या बंदरातील व्यापारापासून मिळणाऱ्या उत्पन्नात फ्रेंच कंपनीचा हिस्सा होता, परंतु १९४२ मध्ये कास्तीयोच्या सरकारने केलेल्या कारवाईनंतर हे अधिकार अर्जेंटिनाकडे आले. त्यानंतर देशातील इतर बंदरांच्या विकासामुळे रोझार्योचे महत्त्व थोडे कमी झाले.

रोझार्यो भू. जल, हवाई या मार्गांनी देशातील इतर शहरांशी जोडलेले असून येथून अन्नधान्ये, मांस, चामडी, साखर, लोकर, लाकूड यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. हे एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असून येथे पोलाद, स्वयंचलित यंत्रे, शेती अवजारे, साखर, प्रशीतके इत्यादींचे निर्मितिउद्योग आहेत. यांशिवाय छपाई, कागद, फर्निचर यांचीही येथे निर्मिती होते. शहरात रुंद रस्ते, प्रशस्त बागा, संग्रहालये, ग्रंथालये, प्राणिसंग्रहालये आहेत.‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लिटरल’ची अर्थशास्त्रीय विद्याशाखा (१९१९), ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ रोझार्यो’ (१९६८) इ. उच्च शैक्षणिक संस्थाही शहरात आहेत. उत्कृष्ट संग्रहालय-वास्तूंपैकी ‘म्यूझीयम ऑफ प्रॉव्हिन्शल हिस्टरी’ (१९३९), ‘द म्युनिसिपल डेकोरेटिव्ह आर्ट्‌स म्यूझीयम’ (१९६८), ‘द म्युनिसिपल फाइन आर्ट्‌स म्यूझीयम’ (१९३७) ही संग्रहालये उत्कृष्ट समजली जातात. १९५७ मध्ये शहरात एक ‘ध्वज स्मारक’ उभारण्यात आले, मॅन्युएल बेलग्रानो (१७७०-१८२०) हा अर्जेंटिनाचा जनरल व देशभक्त याने अर्जेंटिनाचा ध्वज प्रथम फडकविला. त्या प्रसंगाची व दिवसाची स्मृती म्हणून या स्मारकाची उभारणी करण्यात आलेली आहे. अत्यंत प्रेक्षणीय वास्तूंपैकी प्रबोधनकालीन (स्थापत्य) शैलीनुसार बांधलेले कॅथीड्रल आणि ‘फ्वेन्तेस राजप्रासाद’ (१८९६) यांचा आवर्जून उल्लेख करावयास हवा. इटलीमधील फ्लॉरेन्स शहरातील बाप्तिस्मागृहासाठी लोरेंत्सो गीबेर्ती (१३७८-१४५५) या इटालियन मूर्तिकार वास्तुशिल्पज्ञाने ब्राझची द्वारे -‘ द गेट्स ऑफ पॅरडाइज ’-घडविली, त्यांची हुबेहूब नमुनाकृती या राजप्रासादात करण्यात आली असून ती अत्यंत प्रेक्षणीय आहे.

देशपांडे, सु. चिं.; चौंडे, मा. ल.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate