एक सामर्थशाली साम्यवादी राष्ट्र व क्षेत्रफळानुसार जगातील सर्वांत मोठा देश. देशाचे अधिकृत नाव ‘युनियन ऑफ सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिक्स’ (यू. एस.एस्. आर.) सामान्यतः ‘रशिया’ किंवा क्रांतीनंतर ‘सोव्हिएट युनियन’ असा त्याचा नामोल्लेख केला जातो. देशाचे क्षेत्रफळ २,२४,०२,२०० चौ. किमी. आहे.
जगाच्या एकूण भूभागाच्या क्षेत्रफळापैकी सु. एक-सप्तमांश (सु. १५%) क्षेत्र रशियाने व्यापलेले आहे. रशियाचा विस्तार यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत असून यूरोप खंडाचा पूर्वेकडील जवळजवळ निम्मा भाग (५५,७१,२०० चौ. किमी.) तर आशिया खंडाचा उत्तरेकडील सु. दोन-पंचमांश भाग (१,६८,३१,०० चौ. किमी.) या देशाने व्यापलेला आहे. दक्षिण अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका या खंडांपेक्षाही या देशाचा आकार मोठा असून तो जवळजवळ उत्तर अमेरिका खंडाएवढा आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा चीनच्या दुपटीपेक्षा मोठा, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपेक्षा अडीचपटीने, तर भारताच्या सातपट मोठा आहे. तथापि रशियाची जवळजवळ ७०% भूमी शेतीच्या दृष्टीने निरूपयोगी असून बऱ्याच भागांत मानवी वस्तीही आढळत नाही. रशियाची लोकसंख्या २७,६२,९०,००० (१९८५ अंदाज) असून लोकसंख्येच्या बाबतीत चीन व भारत यांच्यानंतर रशियाचा तिसरा क्रमांक लागतो.
देशाचा अक्षवृत्तीय विस्तार ३५०८’ ते ८१०५०’ उ. व रेखावृत्तीय विस्तार १९०३८ पू. ते १६९०४’ प. यांदरम्यान आहे. पूर्व-पश्चिम विस्तार १०,९०० किमी. व दक्षिणोत्तर विस्तार ४,५०० किमी. आहे. पूर्व-पश्चिम विस्तार जास्त असल्यामुळे जगातील एकूण २४ कालपट्टांपैकी ११ कालपट्ट रशियात आहेत. देशात १५ प्रजासत्ताकांचा समावेश असून त्यांशिवाय आर्क्टिक महासागरातील फ्रान्स जोझेफ लँड, नॉव्हायाझीमल्या, सेव्हर्नायाझीमल्या, न्यू सायबीरियन बेटे, रँगल बेटे व पॅसिफिकमधील कमांडर बेटे, कूरील बेटे, सॅकालीन बेट यांचा समावेश होतो.
या बेटांचे एकूण क्षेत्रफळ सु. ३,१०,८०० चौ. किमी. आहे. रशियाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर त्यातील बॅरेंट्स, कारा,लॅपटेव्ह, पूर्व सायबीरियन व चुकची हे समुद्र, पूर्वेस बेरिंग, ओखोट्स्क व जपानचा समुद्र, दक्षिणेस उत्तर कोरिया, चीन, मंगोलिया, अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान, कॅस्पियन समुद्र, व काळा समुद्र, तर पश्चिमेस रूमानिया, हंगेरी, चेकोस्लोव्हाकिया, पोलंड, फिनलंड, नॉर्वे हे देश व बाल्टिक समुद्र आहे.
देशाची एकूण सरहद ८०,३०२ किमी. असून ती जगात सर्वांत लांब आहे. उत्तर व पूर्व सीमा सागरी स्वरूपाच्या आहेत. रशियाला एकूण बारा देशांच्या तसेच आर्क्टिक, अटलांटिक, पॅसिफिक महासागरांच्या व त्यांतील बारा समुद्रांच्या सीमा लाभलेल्या आहेत. मॉस्को (लोकसंख्या ८६,४२,०००–१९८५ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे, सर्वांत मोठे व जगातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे.
चौधरी, वसंत
रशियाचा व्याप प्रचंड असल्याने तेथे जवळजवळ सर्व भूवैज्ञानिक कालखंडांमधील व बहुतेक सर्व प्रकारचे खडक असलेली पुरेशी मोठी क्षेत्रे आहेत. रशिया मुळात दोन मोठ्या खंडीय मंचांचा बनलेला आहे. यांपैकी उरल पर्वताच्या पश्चिमेकडील मंचाला रशियन (पूर्व यूरोपीय) आणि पूर्वेकडील मंचाला सायबीरियन (मध्य-सायबीरियन) मंच म्हणतात.
सायबीरियन मंच येनिसे नदीपासून ते लीना खोरे व पॅसिफिक महासागर यांच्या दरम्यानच्या घडीच्या पर्वतरांगांपर्यंत पसरलेला आहे. या दोन मंचांच्या मधल्या भागात उरल पर्वत, तसेच पश्चिम सायबीरिया व मध्य आशिया येथील सखल प्रदेश येतात.
हे मंच म्हणजे कँब्रियन-पूर्व काळातील (सु. ६० कोटी वर्षाहून जुन्या)ग्रॅनाइट, पट्टिताश्म, अभ्रकी सुभाजा, फायलाइट, संगमरवर आणि क्वॉर्ट्झाइट या स्फटिकी खडकांचे बनलेले दृढ ठोकळे आहेत. या मंचांवर नंतरच्या विविध काळांतील गाळाचे खडक साचले असून ते दक्षिणेकडे व पूर्वेस जाताना अधिकाअधिक कमी वयाचे होत गेलेले दिसतात. यांशिवाय रशियात अंतर्वेशी (आत घूसलेले) खडकही पुष्कळ आहेत.
मंचांचे स्फटिकी खडक ढाल क्षेत्रांच्या किंवा अत्यंत झीज झालेल्या पर्वतरांगांच्या गाभ्याच्या रूपात जमिनीवर उघडे पडलेले आढळतात. वायव्येकडचे फेनोस्कँडीअन किंवा बाल्टिक, युक्रेनमधील ॲझॉव्हपोडोल्यन आणि पूर्व सायबीरियामधील आल्डान व ॲनबार ही अशा प्रकारची ढालक्षेत्रे आहेत. तसेच कॉकेशस, उरल व रशियाच्या आशियाई भागातील पर्वतांच्या गाभ्यांमधील कँब्रियन-पूर्वकालीन खडक उघडे पडलेले आढळतात. सर्व सखल भागांत स्फटिकी खडकांवर निरनिराळ्या जाडीचे गाळाचे खडक साचलेले आहेत.
मॉस्को भागात या गाळाच्या खडकांचा थर एवढा जाड आहे की, तेथील सर्वात खोल खणलेल्या छिद्रांतही स्फटिकी खडकांचा ठाव लागला नाही. उलट कूर्स्क क्षेत्रात स्फटिकी खडक १०० मी. इतक्या कमी खोलीवर आढळले आहेत.
कच्चे लोखंड (क्रिव्हाइरोग व कूर्स्क, फेनोस्कँडीअन ढालक्षेत्र व खिबीनी); अँपेटाइन, सोने (सायबीरिया व अतिपूर्वेचा भाग), तसेच सायबीरियातील मँगॅनीज, बिस्मथ, तांबे, अभ्रक व ग्रॅफाइट यांचे साठे आणि बांधकामाचे दगड ही खनिज संपत्ती कँब्रियन-पूर्व खडकांत आढळते.
कँब्रियन कल्पात (सु. ६० ते ५१ कोटी वर्षापूर्वीच्या काळात)रशियन मंचाच्या पश्चिम कडेला जवळजवळ समांतर अशी कॅलेडोनियन मूद्रोणी निर्माण झाली. रशियाच्या आशियाई भागात उरलतिएनशान द्रोणी (खोलगट भाग) सायबीरियन मंचाच्या दक्षिणेस सरकून पूर्व सायबीरियन भूद्रोणीला मिळाली.
दोन्ही मंचांच्या दक्षिणेस टेथिस समुद्र होता व त्याच्या दक्षिणेस गोंडवनभूमी होती. कँब्रियन काळातील खडक लेनिनग्राडनजिक (निळ्या मृत्तिका) व थोड्या प्रमाणात यूरोपीय रशिया, मध्य आशिया व पूर्व सायबीरिया येथील पर्वतांमध्ये आढळतात.
सिल्युरियन कल्पात (सु. ४४ ते ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) ⇨गिरिजननाची प्रचंड प्रमाणावरील (पर्वतनिर्मितीची) क्रिया होऊन कॅलेडोनियन भूद्रोणीत खूप फेरबदल झाले. या बदलांमुळे मंचांवर समुद्राच्या पाण्याचे आक्रमण झाले होते.
सिल्युरियन निक्षेप रशियाच्या विस्तृत भागात आढळत असून ते लेनिनग्राड, प. युक्रेन, उरल,मध्य आशिया तसेच येनिसे व लीना नद्यांमधील प्रदेशांत जमिनीवर उघडे पडले आहेत.
तेलयुक्त शेल (बाल्टितचा समुद्रतटीय प्रदेश), फॉस्फोराइट (प. युक्रेन), शिसे, जस्त व तांब्याची धातुके (कच्च्या रूपातील धातू; उरल पैखोय, वायगाश बेट व नॉव्हायाझीमल्या), सैंधव व जिप्सम (सायबीरियन मंच), पाटीचा दगड, बांधकामाचा चुनखडक, वालुकाश्म ही या काळातील खनिज संपत्ती आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/11/2020