অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

येमेन

येमेन

येमेन अरब रिपब्लिक. अरबस्तान द्वीपकल्पांच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात १२°४१’ ते १७°७२ उ. व ४२°८ ते ४६°१९ पू. यांदरम्यान विस्तारलेला हा देश उत्तर येमेन या नावानेही ओळखला जातो. इतर अरब राष्ट्रांच्या मानाने भरपूर पाणी व फळांचा प्रदेश म्हणून रोमनांनी याला ‘अरेबिया फेलिक्स’ (‘फेलिक्स’म्हणजे आनंददायक किंवा सुखद) असे नाव दिले. क्षेत्रफळ १,९५,००० चौ. किमी. लोकसंख्या ७७,००,००० ( १९८१). याच्या पश्चिमेस तांबडा समुद्र, तर उत्तरेस सौदी अरेबिया, पूर्व व दक्षिणेस द. येमेन हे देश आहेत. दक्षिणोत्तर लांबी ५४० किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ४१८ किमी. असून देशाला सु. १,६६१ किमी. लांबीची सरहद्द आहे. साना ( लोकसंख्या २,७७,८१७–१९८१) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन

भौगोलिक रचनेच्या दृष्टीने उंच डोंगराळ प्रदेश आणि अरुंद, चिंचोळा सखल किनारी प्रदेश असे देशाचे दोन भाग पडतात. देशाचा बहुतेक भाग तुटकतुटक उंच डोंगरांनी व पठारांनी व्यापलेला असून या डोंगररांगा म्हणजे उत्तरेकडील सौदी अरेबियातील असीर पर्वतरांगेचे पुढे विस्तारलेले भाग आहेत. बहुतेक डोंगररांगा देशाच्या पश्चिम भागात किनारपट्टीला समांतर असून उत्तर-दक्षिण दिशेने पसरल्या आहेत.

डोंगरांदरम्यानचे पठारी भाग सुपीक व सस.पासून १,२०० ते ३,००० मी. उंचीचे आहेत. याच डोंगराळ भागात जबल हदूर हे देशातील सर्वोच्च शिखर (सु. ३,७६० मी.) साना राजधानीच्या नैऋत्येस आहे. डोंगररांगांच्या पूर्वेकडील सपाट पठारी भागाची सस.पासून सरासरी उंची २,४०० मी. आढळते. त्यांतील काही शिखरे सु. ३,००० मी. उंचीची आहेत. देशाच्या उत्तर सीमेवर सौदी अरेबियातील रब अल्‌ खली हे वाळवंट पसरलेले असून देशाच्या पूर्व भागातही त्याचा विस्तार आहे. देशाची पश्चिम किनारपट्टी टिहामट-एश्‌-शाम या नावाने ओळखली जाते. ती ३२ ते ४८ किमी. रुंदीची असून फारशी सुपीक नाही. या भागात काही मरूद्याने असून त्यांच्या आसपास शेती केली जाते.

या किनारपट्टीचा बहुतेक प्रदेश उष्ण, आर्द्र व नापीक आहे. येमेनमधील बहुतेक नद्या मध्यवर्ती डोंगररांगांच्या पश्चिम उतारावर उगम पावून पश्चिमेस तांबड्या समुद्राला जाऊन मिळतात. यांत मुख्यत्वे वाडी (नदी) झेबीड, सिहँम, सुरदुद इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या उत्तर भागातून नेज्रान हा प्रवाह ईशान्य दिशेने सौदी अरेबियात वाहत जातो.

ईशान्य भागातील छोट्या खावलान डोंगररांगेत उगम पावणारे काही प्रवाह पूर्वेस वहात जाऊन रब अल् खली वाटवंटाच्या विस्तारित भागात लुप्त होतात. यांत मुख्यत्वे खब्ब, अल जाउफ, अब्राद इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आग्नेय भागात उगम पावून द. येमेनमध्ये वाहत जाणाऱ्या नद्यांमध्ये बॅनॅ, तिबॅन इ. मुख्य आहेत. पूर्वेकडील बहुतेक भाग ओसाड, वाळवंटी असून त्या भागात प्रवाह अथवासरोवरे नाहीत.

हवामान

येथील हवामान सामान्यपणे उष्ण, वाळवंटी प्रकारचे असून स्थलपरत्वे त्यात थोडाफार फरक दिसून येतो.देशातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. असते, तर उंच प्रदेशातील हवामान सौम्य असते. जून सर्वांत उष्ण तापमानाचाअसून या महिन्यात सर्वसाधारणपणे तापमान २१·७° से. असते; तर जानेवारीत ते १३·९° से. असते. उन्हाळ्यात वायव्येकडून वहिवाळ्यात नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थोडाफार पाऊस पडतो. या वाऱ्यांमुळे अत्यंत हानिकारक वादळे निर्माण होतात.देशात एकूण वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४० ते ६४ सेंमी. असते. नैर्ऋत्य भागात पावसाचे प्रमाण थोडे जास्त असते, तर सानाया मध्यवर्ती शहराच्या भागात ते ४० सेंमी. असते. येथील उन्हाळे सौम्य, तर हिवाळे थंड असतात. हिवाळ्यात थोडेफारहिमतुषार पडतात.

देशातील उंच डोंगराळ प्रदेशात व नद्यांकाठी वनस्पतींचे प्रमाण जास्त आहे. किनारी प्रदेशात दलदली वनस्पति-प्रकारआढळतात. बाभूळ व तत्सक काटेरी वनस्पती, खारीक-खजूर आणि इतर अनेक प्रकारची फळझाडे बऱ्याच ठिकाणी दिसूनयेतात. सीताफळ, यूफेर्बिया इ. वनस्पती तुरळक ठिकाणी सापडतात. देशातील फुलझाडांच्या सु. ६०० प्रकारांपैकी अल्पाइनरोज, तेरडा, तुळस, रानटी एल्डर, जुडास इ. प्रकार प्रमुख आहेत. उंच डोंगराळ भागात दाट जंगलांमध्ये बॅबून, कुरंग, चित्ता,ससे हे जंगली प्राणी दिसून येतात; तर विंचू, मिलिपीड हे सर्वत्र आढळतात. देशात सर्पांचे प्रमाण कमी आहे. माळढोक,ससाणा, गिधाड, द्रोणकावळा, पोपट, धनेश, हनीसकर, वीव्हर, फिंच इ. अनेक पक्षी तसेच २७,००० प्रकारचे कीटक दिसूनयेतात.

इतिहास व राजकीय स्थिती

प्राचीन भूगोलवेत्त्यांनी ‘अरेबिया फेलिक्स’ या नावाने ज्याचा निर्देश केला आहे, त्या नैर्ऋत्यअरबस्तानातील इतिहासप्रसिद्ध प्रदेशात हा देश मोडतो. जागतिक व्यापारात अग्रेसर असलेल्या या प्रदेशातच सबांचे राज्यहोते (इ. स. पू. १०००–२००). सुगंधी द्रव्ये व मसाल्याचे पदार्थ यांच्या व्यापारावर सबा राज्याची संपन्नता अवलंबून होती. पुढेनवे व्यापारी मार्ग उपलब्ध झाले आणि वाढत्या व्यापारी स्पर्धेमुळे सबांच्या वैभवास उतरती कळा लागली. इ. स. पू. दुसरे ते इ.स. सहावे शतक हा हिम्यराइट राजघराण्याचा कालखंड होय. इ. स. ५२५ मध्ये ख्रिस्ती इथिओपियन आक्रमकांनी हा प्रदेशजिंकला. नंतरच्या इराणी आक्रमकांनी ५७५ मध्ये त्यांना या प्रदेशातून हुसकावून लावले. इस्लाम धर्माचा प्रसार सातव्याशतकातच होऊन वेगवेगळ्या इस्लामी पंथांतील संघर्ष येमेनच्या भूमीवर सतत होत राहिले.

शिया आणि सुन्नी अशा दोन्हीपंथांचे पुरस्कर्ते या संघर्षात सामील झाले. नवव्या शतकात येथे इमामपीठाची स्थापना झाली. याह्या अल्‌ हदी इलाल हक्क याझैदी राज्यकर्त्याने स्थापलेले हे इमामपीठ विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अस्तित्वात होते. या देशाचा मध्ययुगीन इतिहासम्हणजे स्थानिक इमामांच्या स्पर्धा आणि कलहांचा मोठा गुंतागुंतीचा इतिहास आहे. ईजिप्त (अकरावे शतक), रसूल राजवंश(सु. १२३०, पंधरावे शतक) इत्यादींचा अंमल या प्रदेशावर कमीअधिक काळ टिकला. ईजिप्तच्या मामलूक सुलतानाने १५१६मध्ये आपल्या देशात हा प्रदेश सामील करून घेतला. परंतु पुढील वर्षीच ऑटोमन तुर्कांच्या सैन्याने हा प्रदेश पादाक्रांत केला.कासीम द ग्रेट (कार. १५९७–१६२०) या झैदी इमामाने येमेनच्या अंतर्भागातून ऑटोमन तुर्कांची सत्ता नष्ट केली. फक्त सागरीकिनाऱ्यावरच तुर्कांचे नियंत्रण टिकून राहिले.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी वहाबी मुस्लिमांनी येमेन ताब्यात घेतले. तथापि१८१८ मध्ये ईजिप्तच्या सुलतानाचा मुलगा इब्राहिम पाशा याच्या मदतीने वहाबींची हकालपट्टी करण्यात येऊन येमेनमध्ये पुन्हाझैदी इमामांची सत्ता प्रस्थापित झाली. १८४० पर्यंत येमेनच्या प्रमुख बंदरांत ईजिप्शियन सैन्याचे तळ होते. झैदी इमामांनीऑटोमन सुलतानांची अधिसत्ता मान्य करून प्रतिवर्षी त्यांना खूप मोठी खंडणी देण्याची प्रथा सुरू केली. १८४० ते १८७२ हाकालखंड अराजकाचा होता. परिणामतः १८७२ साली ऑटोमन राज्यकर्त्यांनी साना शहर ताब्यात घेऊन देशात पुन्हा आपलाजम बसविला. ऑटोमन सुलतानांचे मोठे सैन्य पहिल्या महायुद्धकाळामध्ये या देशात होते.

महायुद्धाच्या समाप्तीनंतर (१९१८)ते काढून घेण्यात आले. ग्रेट ब्रिटनच्या मदतीने इद्रिसी जमातीने येमेनमध्ये सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. तथापि झैदी इमामयाह्या इब्‌न मुहंमद याने हा प्रयत्न १९२५ साली मोडून काढला. ब्रिटिशांकडून इद्रिसी लोकांकडे आलेले एल्‌. होदेद हे ठाणेताब्यात घेऊन त्याने पश्चिम एडनचा ब्रिटिशसंरक्षित विभागही जिंकण्याचा प्रयत्न केला. इद्रिसी पक्षीयांना सौदी अरेबियाचाराजा इब्न सौद याने पाठिंबा दिला व १९३४ साली येमेन आणि सौदी अरेबिया यांच्यात युद्ध सुरू झाले. ताइफच्या तहाने हे युद्धसंपले; तथापि असीर प्रदेश सौदी अरेबियाला द्यावा लागला.

सौदी अरेबिया व ग्रेट ब्रिटन यांनी येमेनच्या स्वातंत्र्याला मान्यतादिली. ब्रिटिशसंरक्षित एडन घेण्याचा प्रयत्न मात्र येमेनच्या इमाम याह्याने १९३७ पर्यंत चालू ठेवला. १९४५ साली येमेन अरबलीगचा सभासद झाला व १९५८ साली युनायटेड अरब स्टेट आणि युनायटेड अरब रिपब्लिक यांचा एक संघ स्थापन करण्यातआला. १९६२ साली इमाम मुहंमद अल्‌ बद्र यांची सत्ता उलथून टाकण्यात ब्रिगेडियर अब्दला अल्‌ सलाल यास यश मिळाले वतो येमेनचा राष्ट्राध्यक्ष आणि सर्वोच्च सेनाप्रमुख झाला व त्यानेच येमेन अरब प्रजासत्ताकाच्या स्थापनेची घोषणा केली. मार्च१९७० पर्यंत इमाम सत्तेचे पुरस्कर्ते व प्रजासत्ताकवादी यांच्यातील सशस्त्र यादवी लढे देशात होत राहिले.

सौदी अरेबियानेइमामांची बाजू घेतली. जेद्दा येथील करारानुसार यादवी युद्ध संपले आणि येमेनची सत्ता प्रजासत्ताकवादी पक्षाच्याच ताब्यातराहिली. जून १९७४ मध्ये अब्द अर्‌-रहमान अल्‌ इरियाणी या राष्ट्राध्यक्षाने राजीनामा दिला. नंतर इब्राहीम मुहंमद हमदी याराष्ट्राध्यक्षाचा खून झाला (१९७७). त्यानंतरचा राष्ट्राध्यक्ष (अहंमद घशमी) बाँबस्फोटात ठार झाला. त्यानंतर लेफ्ट. कर्नलअली अब्दुल्ला सलेह हा राष्ट्राध्यक्ष बनला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate