অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

युक्रेन

युक्रेन

रशियन संघराज्याच्या पंधरा प्रजासत्ताकांपैकी एक. पूर्ण नाव युक्रेनियन सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक. कृषिउद्योग व खाणकाम यांनी समृद्ध अशा आग्नेय रशियातील या प्रजासत्ताकाचे क्षेत्रफळ ६,०३,७०० चौ. किमी. असून लोकसंख्या ५,०८,४०,००० (१ जानेवारी १९८५) आहे. याच्या उत्तरेस बेलोरशियन प्रजासत्ताक, पूर्वेला रशियन एस्‌एफ्‌एस्‌आर, दक्षिणेला ॲझॉब्ह समुद्र, काळा समुद्र, मॉल्डेव्हिया प्रजासत्ताक व रूमानिया, तर पश्चिमेला हंगेरी, चेकोस्लोव्हाकिया व पोलंड हे देश येतात. ⇨कीव्ह (लोक. २४,४८,०००, १ जानेवारी १९८५) ही याची राजधानी. देशाचा केवळ २.७ टक्के भूप्रदेश व्यापलेल्या या राज्यात औद्योगिक व कृषिउत्पादन मात्र देशातील एकूण उत्पादनाच्या २० टक्क्यांहून अधिक व गहू उत्पादन २५ टक्के आहे.

भूवर्णन

हे राज्य काळ्या समुद्राच्या उत्तरेला असून त्यात विस्तृत सपाट मैदानी प्रदेश आढळतो. नैर्ऋत्येकडील कार्पेथियन पर्वतश्रेणी व दक्षिणेकडील काळा समुद्र एवढीच त्याची नैसर्गिक सीमा होय. नौवहनयोग्य नीपर नदी आपल्या अनेक उपनद्यांसहित मध्यवर्ती युक्रेनचे आर्थिक दृष्टींनी (उदा., जलवाहतूक, व्यापार, विद्युत्‌निर्मिती इ.) एकीकरण करते. ही नदी म्हणजे बाल्टिक किनारी देश, काळा समुद्र व भूमध्य समुद्र या दोहोंना जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होय. नैर्ऋत्येकडील नीस्तर नदी हीदेखील नौवहनास उपयुक्त आहे. डॅन्यूब नदीमुखातून युक्रेनचा बाल्कन राष्ट्रे, ऑस्ट्रिया व जर्मनी या देशांशी व्यापार चालतो. सर्वसाधारणतः युक्रेनचे हवामान कोरडे असते.

भूविज्ञानीय उठाव पट्टे वायव्येकडून आग्नेयीकडे गेलेले असून त्यांमुळे विविधतापूर्ण भूरूपे निर्माण झालेली आहेत. या पट्ट्यांच्या आग्नेयीकडील चेर्निगॉव्हकीव्हव्हॉलिन्यलाव्हॉव्ह हे क्षेत्र घनदाट जंगलांचे आहे. या प्रदेशांतील मध्ययुगीन कॅथीड्रल, अर्धभग्न किल्ले, चर्चयुक्त गढ्या म्हणजे युक्रेनियन संस्कृतीचे ऐतिहासिक स्रोतच होत. वरील पट्ट्याच्या दक्षिणेकडील विस्तीर्ण पश्चिम-पूर्व पट्ट्यांत (तेर्नोपोलव्हिनित्साचिर्कासी ते पल्टाव्हा) तुरळक लाकूडवृक्षांचा मैदानी प्रदेश असून त्यात हिवाळी गहू, साखरबीट, सूर्यफुले, फळफळावळ, पालेभाज्या इ. उत्पादने होतात व पशुपालन व्यवसाय आढळतो. या पट्ट्याच्या खालच्या भागात शेवटचे हिमयुग कधीच अवतरले नाही; त्यामुळेच या भागात तसेच दक्षिण व पूर्व युक्रेनमध्ये सर्वत्र दाट लोएस मृदेचा थर पसरल्याचे आढळते. या लोएसमुळे धान्यपिकांकरिता योग्य अशी समृद्ध काळी मृदा या राज्यात निर्माण झाली आहे. जागतिक गहू व साखर उत्पादनांपैकी अनुक्रमे ५% गहू व ८% साखर युक्रेनमध्ये उत्पादित केली जाते. यापैकी ५% निर्यात केली जाते.

काळ्या समुद्रालगतचा सखल भूमिप्रदेश (ईझ्माइईलओडेसाकीरव्ह्‌ग्राटझ्दानफ) व सींफ्यिरॉपल (क्रिमियामधील) म्हणजेच अतिशय सपाट भूप्रदेश-स्टेप प्रदेशहोय. या भागात गहू व मका यांचे प्रचंड पीक येते; तथापि येथे वृक्षराजींचा अभाव असल्याने हा भाग वारंवार दुष्काळी व अवर्षणग्रस्त ठरतो. ओडेसा, खेरसॉन यांसारखी उबदार समुद्रबंदरे या भागात मोडत असून तेथून मध्यपूर्व, भूमध्य समुद्रीय यूरोप व अटलांटिक यांच्याशी व्यापार साध्य होते.

क्रिमियामध्ये असलेली अनेक किनारी शहरे म्हणजे विदेशी पर्यटकांची आकर्षणे होत. पश्चिमेकडील कार्पेथियन भागात अनेक गिरिस्थाने, विश्रांतिस्थाने व हॉटेले असून पर्यटकांना हिवाळी खेळांचे मोठे आकर्षण आहे. कार्पेथियन भाग हा नैसर्गिक वायू, खनिज तेल तसेच रासायनिक खनिजे यांनी समृद्ध असला, तरी युक्रेनमधील सर्वांत कमी प्रमाणात त्याचा आर्थिक विकास झालेला आहे.

खारकॉव्ह, नेप्रोपट्रॉफ्स्क आणि डोनेट्स ही पूर्वेकडील शहरे ज्या भागात येतात, तो भाग म्हणजे ग्रेटर डॉनबॅस किवा डोनेट्स खोरे म्हणून ओळखला जातो. हा भाग म्हणजे राज्याचा औद्योगिक कणा किंवा औद्योगिक मर्मभूमी होय. हा स्टेप प्रदेश असला, तरी जगातील एकूण लोहधातुकाच्या साठ्यांपैकी १४%, २५% मँगॅनीज, कठीण व कोकिंग कोल तसेच रासायनिक साधनसामग्री आणि नैसर्गिक वायू व खनिज तेल यांचे विपुल साठे या प्रदेशात आहेत. राज्यातील हा सर्वाधिक लोकसंख्येचा तसेच मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेला प्रदेश आहे. त्यात लोखंड व पोलाद यंत्रसामग्री तसेच रासायनिक संयंत्रे यांचे अवाढव्य कारखाने असून मोठ्या कोळसाखाणी आहेत.

गद्रे, वि. रा.

इतिहास

‘युक्रेन’ शब्दाचा अर्थ राजनगरीचा विभाग किंवा सीमावर्ती प्रदेश असा आहे. सोळाव्या शतकात युक्रेन हे नाव प्रचारात आले असले, तरी त्याचा उगम अकराव्या शतकातील आहे. सोळाव्या शतकापूर्वी ‘रस’ या नावानेयातूनच ‘रशिया’ हा शब्द रूढ झालाहा प्रदेश ओळखला जाई. ‘छोटा रशिया’ असा या प्रदेशाचा उल्लेख झारच्या सत्ताकाळात होऊ लागला. हा उल्लेख निंदाव्यंजक म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून त्याचा वापर थांबला.

. स. १२४० मध्ये मंगोलांनी कीव्ह राजनगरी उद्ध्वस्त केली. पुढे १३८७ मध्ये हा प्रदेश पोलिश सत्तेखाली आला. १३९२ मध्ये लिथ्युएनियाच्या सरदाराने युक्रेन ताब्यात घेतले. १५६९ मध्ये लिथ्युएनिया आणि पोलंड यांचे एकीकरण झाले आणि हा भाग पोलिश सत्तेखाली आला. पोलिश राजे आणि सरदारांनी युक्रेनमधील जमिनी बळकावल्या व शेतकऱ्यांवर दास्य लादले. नीपर नदीच्या सखल खोऱ्यात त्यामुळे अनेक युक्रेनियन पळून गेले. त्यांनाच पुढे कझाक हे नाव पडले. त्यांनी सीमावर्ती भागात स्वतंत्र सैनिकी यंत्रणा उभी केली; आणि शासकीय व सैनिकी अधिकाऱ्यांची लोकशाही मार्गाने निवड करण्याची प्रथा रूढ केली. ‘सिक’ हे त्यांच्या लोकप्रतिनिधिगृहाचे नाव होय.

सिकने पोलिश राजांचे सार्वभौमत्व मान्य केले. पुढे सतराव्या शतकात जेझुइट मिशनऱ्यांनी येथे कॅथलिक धर्मप्रसाराची सक्ती करण्याचा प्रयत्न केला व त्यातून १६४८ चे कझाकांचे बंड निर्माण झाले. पोलिश सत्ताधाऱ्यांशी बंडखोरांनी अनेक यशस्वी लढे दिले व अखेर बॉदॅम ख्मेलनीट्स्की याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र कझाक राज्याची स्थापना करण्यात आली. निमलष्करी प्रजासत्ताक असे या राज्याचे स्वरूप होते व त्याचा प्रमुख लोकनियुक्त असे. राज्यात विधनसभाही होती. तथापि पोलंडच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी कझाक राज्यकर्त्यांनी झारची मदत मागितली व त्याच्याशी एक तह करण्यात आला. युक्रेनमधील नगरांतून रशियन सैन्य ठेवण्यात आले. ख्मेलनीट्स्कीच्या निधनानंतर झारने तहातील स्वायत्ततेच्या अटी नामंजूर केल्या व प्रत्येक नव्या शासनप्रमुखाच्या निवडणुकीच्या वेळी तहनाम्यात सुधारणा करण्याची मागणी केली. दुबळ्या उमेदवारांना एकमेकांविरुद्ध प्रवृत्त करून आणि भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबून झारने हळूहळू युक्रेनचे राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. कझाक प्रमुखांनी रशियापासून स्वतंत्र होण्याचे केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. शेवटी १७६४ मध्ये कझाक शासनप्रमुखाचे पद रद्द करण्यात आले व १७७५ मध्ये कझाक सिक म्हणजे विधानसभेची वास्तू रशियन सैन्याने जमीनदोस्त केली.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate