অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुलतान

मुलतान

मुलतान

पाकिस्तानातील एक प्रसिद्ध औद्योगिक शहर, जिल्हा व विभाग. हे पंजाब प्रांतात चिनाब नदीच्या पूर्वेस, लाहोरपासून सु. ३१० किमी.वर, एका टेकाडवजा पठारावर वसले आहे. लोकसंख्या शहर ७,३०,००० (१९८१).

मुलतानच्या नावाविषयी तज्ञांत एकवाक्यता नाही.

हेकाटीस, हीगॅडोटस, टॉलेमी इ. ग्रीक लेखक त्याच्या भिन्नभिन्न नावांचा उल्लेख करतात. काश्यपपूर हे त्याचे सर्वसाधारण प्राचीन नाव. हंसपूर, बेगपूर, संब किंवा सांबपूर ही त्याची अन्य नावे होत. येथे सूर्याचे एक भव्य मंदिर होते. त्याचा उल्लेख यूआनच्वांग या चिनी प्रवाशाने केला आहे. या सूर्यदेवतेच्या ‘मूलस्थान’ या नावावरून मुलतान हे नाव रूढ झाले असावे. मुलतानचा प्राचीन इतिहास स्पष्ट नाही. अलेक्झांडरने माली नावाच्या राजाची ही राजधानी जिंकली (इ. स. पू. ३२६).

बॅक्ट्रियन राजांच्या वेळी ते ग्रीकांच्याच आधिपत्याखाली होते, असे त्यांच्या उपलब्ध नाण्यांवरून दिसते. राय नावाचा राजा येथे सातव्या शतकात राज्य करीत होता. मुहम्मद कासीमने मुलतान जिंकून ते मुसलमानांच्या अखत्यारीत आणले (७१२). पुढे सु. ३०० वर्षे ते भारतातील इस्लामचे प्रमुख केंद्र होते. भारतात प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील खुष्कीचा मार्ग हा सुलभ असल्याने, यावर अनेक आक्रमणे झाली आणि नंतर दिल्ली सुलतान आणि मोगल सम्राट यांनी मुलतानवर अधिराज्य केले.

अफगाण (१७७९), शीख (१८१८) आणि ब्रिटिश (१८४९) यांनी त्यावर अंमल बसविला. पाकिस्तानच्या निर्मितीपर्यंत तेथे ब्रिटिशांची लष्करी छावणी होती. मुझफरखान, रणजितसिंग आदी राजांनी शहरात अनेक सुधारणा केल्या. व्यापार आणि उद्योगांमुळे हे शहर रस्ते व लोहमार्ग यांनी लाहोर-कराचीसारख्या मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. येथे विमानतळ असून कराची, क्वेट्टा व फैसलाबाद अशी विमान वाहतूक चालते.

गहू, कापूस, साखर, नीळ आणि खजूर या पिकांचे उत्पादन परिसरात होत असल्यामुळे ही मोठी व्यापारपेठ आहे. शहरात वस्त्रोद्योग, कापूस प्रक्रियेचे कारखाने, लोकर व रेशमी कापडाच्या गिरण्या, औष्णिक विद्युत्‌निर्मिती केंद्र, लघुउद्योग, हस्तकलाउद्योग आदी विविध व्यवसाय चालतात. मीनाकारी, चिनी मातीची नक्षीदार भांडी, काचसामान, कौले, गालिचे, एनॅमलच्या वस्तू आणि उंटाच्या कातड्यांवरील कलाकृतींसाठी मुलतान विशेष प्रसिद्ध आहे.

मुलतानमध्ये १८६७ मध्ये नगरपालिका स्थापन झाली असून शहरात दोन सुसज्जत रुग्णालये आहेत. पाच महाविद्यालये आणि मुलतान विद्यापीठ (१९७५) यांतून शैक्षणिक सोयी उपलब्ध असून, निश्तार वैद्यक महाविद्यालय आणि नगर सभागृह यांच्या इमारती वास्तुशास्त्रदृष्ट्या प्रेक्षणीय आहेत. पूर्वी शहराभोवती उंच तटबंदी होती. त्या जुन्या शहरात किल्ला, अनेक ऐतिहासिक प्राचीन वास्तू, पीर व मुस्लिम साधूंचे दर्गे आहेत.

त्यांपैकी शम्स-इं-ताब्रिझ, शाह रूक्न-इ-आलम, शेख युसूफ गार्दीझ, इद्‌गा (१७३५), वली मुहम्मद मशीद (१७५८) इ. वास्तू मुलतानी शैलीच्या खास द्योतक आहेत. शम्स-इ-ताब्रिझची वास्तू आकाशी रंगाच्या वालुकाश्मात बांधली आहे; तर शाह-रूक्न इ-आलमचा घुमट आशिया खंडात आकाराने सर्वांत मोठा आहे.

शहराच्या प्रह्‌लादपूरनामक भागात नरसिंहाचे एक जीर्ण मंदिर आहे. याशिवाय एक सार्वजनिक बाग आणि वस्तुसंग्रहालय आहे.

 

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate