অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बेलीझ

बेलीझ : मध्य अमेरिकेतील २१ सप्टेंबर १९८१ रोजी स्वतंत्र झालेला देश. ग्रेट ब्रिटनच्या ताब्यातील हा भाग ‘ब्रिटिश हॉंडुरस’ या नावाने १९७३ पर्यंत ओळखला जाइ. क्षेत्रफळ २२,९६३ चौ.किमी. लोकसंख्या १,५१,६०७ (१९७८), १५०५३’ ते १८०३१’ उत्तर अक्षांश व ८७०१६’ ते ८९०८’ प. रेखांश या दरम्यान पसरलेल्या या देशाच्या उत्तरेस मेक्सिको, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला हे देश असून पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहे. वेल्मोपान (लोकसंख्या ४,०००) ही देशाची राजधानी. देशाच्या किनाऱ्यापासून मु. ३२ किमी. वर अँब्रग्रीर्स, कॉर्कर, सेंट जॉर्जेस या प्रमुख के व इतर अनेक लहान बेटे असलेल्या प्रवाळभिंतीचा तसेच तिच्या पूर्वेस असलेल्या टर्नेफ बेटे व ग्लव्हर्स रीफ यांचा या देशातच समावेश होतो.

बेलीझ या नावाविषयी दोन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. हा शब्द मूळ फ्रेंच ‘बॅलीसे’ (इं. वेकन-दीपस्तंभ) या शब्दावरून आला असावा. दुसऱ्या व्युत्पत्तीनुसार स्कॉटिश चाचा पीटर वॉलिस याच्या नावावरून अपभ्रंशाने हा शब्द आला असावा, असे मानले जाते.

भूवर्णन

भूरचनेच्या दृष्टीने पाहता हा प्रदेश ‌मेक्सिकोच्या यूकातान द्वीपकल्पाचाच दक्षिणेकडील भाग होय. देशाचा बहुतेक भाग जंगलांनी व दलदलींनी व्यापलेला असून येथील खडक तृतीयक व क्रिटेशस काळात निर्माण झालेले आहेत. त्यांत चुनखडकांचे प्रमाण जास्त आढळते. देशाचा किनारी प्रदेश दलदलीचा आहे. याला लागूनच असलेला १६ ते ३२ किमी. पर्यंतचा प्रदेश मैदानी असून तो अंतर्भागात उंच होत जातो. दक्षिणेकडे माया ही प्रमुख डोंगररांग नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने पसरलेली आहे. सु. ८० किमी. लांबीची ही पर्वतरांग सु. ६१० ते ९१५ मी. उंच आहे. कॉक्स्कोम ही १६ किमी. लांबीची डोंगररांग देशाच्या मध्यभागी पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेली असून ती माया पर्वतरांगेचाच एक फाटा होय. ‘व्हिक्टोरिया पीक’ (१,१२२ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर याच रांगेत आहे. या रांगेत ग्रॅनाइट खडकांचे प्रमाण जास्त असून त्याच्या कडेला कार्‌बॉनिफेरस स्लेट आहे. दोन्ही डोंगररांगा जंगलमय असून त्यापैकी कॉक्स्कोम रांग विश्रामधामांसाठी प्रसिद्ध आहे. भूपृष्ठ व हवामान यांच्या विभिन्नतेमुळे देशात अनेक प्रकारच्या मृदा आढळतात. तथापि लॅटेराइट प्रकारच्या मृदेचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

देशातील बहुतेक नदीप्रवाह सर्वसाधारणपणे नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने वाहतात. देशात ओंदो, न्यू, ब्लू क्रीक, बेलीझ, सार्सतून इ. प्रमुख नद्या आहेत. ओंदो नदी ग्वातेमालामध्ये उगम पावते व देशाच्या उत्तर सीमेवरून नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने वाहत जाऊन कॅरिबियन समुद्रातील चेतूमाल उपसागराला मिळते. न्यू ही उत्तरवाहिनी नदी माया पर्वतरांगेत उगम पावून ओंदो नदीस मिळते; तर ब्लू क्रीक ही ग्वातेमालात उगम पावणारी नदी प्रथज्ञ नैर्ऋत्य-ईशान्य व देशाच्या उत्तर सीमेवर वायव्य-आग्नेष दिशेने वाहत जाऊन ओंदो नदीस मिळते. बेलीझ ही देशातील महत्त्वाची नदी असून ती ‘ओल्ड रिव्हर’ या नावानेही ओळखली जाते. ग्वातेमालातील तिचा शीर्षप्रवाह मोपान या नावाने ओळखला जातो. ही नदी ईशान्य दिशेने वाहत जाऊन वेलीझ सिटीजवळ कॅरिबियन समुद्रास मिळते. सार्सतून ही देशाच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी ग्वातेमालामध्ये उगम पावून पूर्वेस हॉंडुरस आखातास मिळते. ही नदी मुखापासून आत २५ किमी. पर्यंत वाहतुकीस सुलभ असून दिओस हे तिच्यावरील बंदर रबर व लाकूड वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. या प्रमुख नद्यांशिवाय माया पर्वतात उगम पावणाऱ्या सीबून, डीप तसेच मोओ इ. लहान नद्या आहेत. बहुतेक सर्व नद्यांचा उपयोग लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी केला जातो. देशाच्या पूर्व किनारपट्टीच्या व उत्तर भागांत अनुक्रमे नॉर्दर्न, सदर्न व रिव्हेंज, न्यू रिव्हर इ. खारकच्छे आढळतात.

हवामान

देशातील हवामान उपोष्ण कटिबंधीय प्रकारचे व आर्द्र असून किनारी प्रदेशात सर्वसाधारण तापमान १५० ते ३२० सें.पर्यंत तर अंतर्भागात ते थोडे जास्त असते. हा प्रदेश हरिकेन वाऱ्यांच्या कक्षेत येत असल्याने वर्षातील बहुतेक काळ या प्रदेशाला सागरी वाऱ्यांना तोंड द्यावे लागते. किनाऱ्याजवळील प्रवाळभित्तीमुळे मात्र अनेकदा सागरी लाटांपासून संरक्षण होते; परंतु १९३१, १९५५, १९६०, १९६१ साली आलेल्या हरिकेन वादळांमुळे या देशाच्या किनारी भागात प्राणहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. फेब्रुवारी ते मे व ऑगस्य ते सप्टेंबर हे देशातील दोन कोरडे ऋतू असून इतर महिन्यांत देशात पाऊस पडतो. देशातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २०८ सेंमी. आहे. देशाच्या दक्षिण भागात हे प्रमाण जास्त (सु. ४५७ सेंमी.) तर उत्तर भागात कमी (१२७ सेंमी.) असते.

वनस्पती व प्राणी

देशातील बराचसा भाग उष्ण कटिबंधीय प्रकारच्या जंगलांनी व्यापलेला आहे. काही सॅव्हाना व दलदलींचे प्रदेश तसेच पर्वतमाथे वगळता इतर भागात मिश्र प्रकारची कठिणकाष्ठ वने आढळतात. यांत मुख्यत्वे मॅहॉगनी, रेझवुड, सीडार, पतंगी व चिकू (चिकल निर्मितीसाठी उपयुक्त) या वृक्षप्रकारांचा समावेश होतो. सपाट प्रदेशात पाइन वृक्ष आहेत, तर किनारी प्रदेशात व काही फे मध्ये कच्छवनश्री आढळते. येथील जंगलात आर्मडिलो, ऑपॉस्सम, हरिण, माकडे, साप, केमन, घोरपड इ. प्राणी आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था

या प्रदेशातील उत्खननांत सापडलेल्या अवशेषांवरून हा प्रदेश माया संस्कृतीच्या साम्राज्याचा भाग होता असे दिसते. इ.स. दहाव्या शतकात या संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागला. १४५० मध्ये स्पॅनिशांनी मायांना जिंकले. शिवाय कॉर्तेझने हॉंडुरसला जाताना या प्रदेशाचा प्रवासही केला होता. परंतु या प्रदेशातील रोगट हवामानामुळे स्पॅनिशांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. ब्रिटिश चाच्यांनी स्पॅनिश जहाजे लुटण्यासाठी या प्रदेशातील प्रवाळ बेटांचा (केजचा) आश्रमय घेतला. १६३८ च्या सुमारास लाकूडतोडे व चाचे यांनी विद्यमान वेलीझ सिटीच्या परिसरात पहिली वसाहत केली. येथील वनसंपत्तीच्या लोभाने जमेकातूनही काही लोक येथे आले. काही लाकूडतोड्यांनी सेंट जॉर्जेस के वर वस्ती केली. सुमारे दोन शतके मुख्य भूमीवरील वसाहत ‘सेटल्‌मेंट इन द वे ऑफ हॉंडुरस’ या नावाने ओळखली जात असे. व्यापार व सत्तास्पर्धा यांमुळे ब्रिटिश व स्पॅनिश यांच्यात दीर्घकाळ संघर्ष चालू होते. १७८३ मध्ये स्पेनबरोबर तह करून ब्रिटिशांनी हा प्रदेश विकसित करण्याचा हक्क मिळविला. पुढे १८२१ मध्ये स्वतंत्र ग्वातेमालाने या प्रदेशावर आपला हक्क सांगितला. परंतु १८५९ साली बेलीझ ते ग्वातेमाला असा रस्ता तयार करण्याचे वचन ब्रिटिशांनी दिल्याने स्पेनने त्या हक्काबद्दल आग्रह धरला नाही. १८६२ मध्ये ब्रिटिश हॉंडुरसची वसाहत अस्तित्वात आली व १८८४ साली ती ब्रिटिशांची स्वतंत्र कॉलनी झाली. १९३३ व १९६० मध्ये ग्वातेमालाने या प्रदेशावरील आपल्या स्वामित्वाचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला. १९६१ मध्ये आलेल्या हरिकेन वादळामुळे वेलीझ सिटीचे अतोनात नुकसान झाल्याने राजधानी बेल्मोपान येथे हलविण्यात आली. १९६४ साली या वसाहतीला अंतर्गत स्वायत्तता मिळाली. १९७२ पासून ग्वातेमाला व ब्रिटिश हॉंडुरस यांच्यात या प्रदेशावरील हक्कावरून तणाव वाढू लागला. १९७३ साली याचे वेलीझ असे नामांतर करण्यात आले. याच काळात ग्रेट ब्रिटनने मात्र वेलीझच्या स्वातंत्र्याला संमती दर्शविली. परंतु गेली शंभर वर्षे या प्रदेशावर आपला अधिकार दाखवित असलेल्या ग्वातेमालाने याला तीव्र विरोध केला. नोव्हेंबर १९७५ व जुलै १९७७ मध्ये ब्रिटिशांनी सैन्य व लढाऊ विमाने पाठवून ग्वातेमालाकडून संभवणाऱ्या हल्ल्यापासून या देशाला संरक्षण दिले. १९७७ पासून ग्रेट ब्रिटन व ग्वातेमाला यांच्यात याविषयी बोलणी चालू होती. ब्रिटनने मांडलेले निरनिराळे प्रस्ताव कधी वेलीझने तर कधी ग्वातेमालाने अमान्य केले. नोव्हेंबर १९८० मध्ये संयुक्त राष्ट्रांनी वेलीझच्या स्वातंत्र्याची शिफारस केली. मार्च १९८१ मध्ये ब्रिटन व ग्वातेमाला यांच्यात समझोता होऊन हा बऱ्याच वर्षाचा जुना प्रादेशिक वाद मिटेल असे वाटले. या करारानुसार ग्वातेमालाने रूपुआना व झापोटिलोस या लहान बेटांचा वापर करण्याच्या व बंदरांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अटींवर या वसाहतीवरील हक्क सोडला. अ‍ॅमातीकी उपसागरातील प्रवेशाच्या दृष्टीनेही ही बेटे मोक्याची आहेत. मात्र या सुविधांना अंतिम स्वरूप नंतर देण्यात येणार आहे. या करारामुळे मात्र बेलीझमध्ये मोठ्या दंगली झाल्या. आपला देश ग्वातेमालाला विकला गेल्याची भावना लोकांत निर्माण झाली. तथापि या देशाचे पंतप्रधान जॉज प्राइस यांनी वरील करार हंगामी आहे व देशाचे सार्वभौमत्व व प्रादेशिक ऐक्य बाधित होईल असा कोणताही करार आपण मानणार नसल्याचे लंडन येथे जाहीर केले. परिणामत: ग्वातेमालानेही बेलीझवरील आपला हक्क पुन्हा सांगितला व अंतिम करारावर होणारी बोलणी थांबविली. या अवस्थेतच २१ सप्टेंबर १९८१ रोजी वेलीझ स्वतंत्र झाल्याचे जाहीर करण्यात आले. या नवजात राष्ट्राचा ग्वातेमालाशी असणारा संघर्ष मात्र संपलेला नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळातील देशाची राज्यघटना १९६४ पासून अंमलात आली. या संविधानानुसार देशात द्विसदनी विधिमंडळ असून त्यापैकी लोकसभेत सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने निवडलेले १८ सदस्य असतात. सीनेटमध्ये (दुसरे सत्यागृह) ८ सदस्य असून त्यापैकी ५ सदस्य सदस्य पंतप्रधानांच्या शिफारसीने, दोन सदस्य विरोधी नेत्याच्या शिफारसीने व एक सदस्य राज्यपालाच्या शिफारसीने नियुक्त केला जात असे. त्यावेली बेलीझ ही ब्रिटिश वसाहत असल्याने राज्यपाल हा ब्रिटनच्या राणीचा प्रतिनिधी म्हणून नेमला जाईल आणि त्याच्याकडे परराष्ट्रीय धोरण व अंतर्गत सुरक्षितता या जबाबदाऱ्या असत. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या मदतीने राज्यकारभार चालवितो. देशात दोन प्रमुख पक्ष असून नोव्हेंबर १९७९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत ‘पीपल्स युनायटेड पार्टी’चे १३ व ‘युनायटेड डेमॉक्रॅटिक पार्टी’चे ५ सदस्य निवडून आले.

न्याय व संरक्षण

स्वातंत्र्यापूर्वी देशाच्या न्यायालयीन विभागांत (जिल्ह्यांत) प्रत्येकी एक एक अशी दिवाणी व फौजदारी न्यायालये होती. यांतील खटल्यांविरुद्ध उच्च न्यायालयाकडे अपील करता येत होते. त्यावरही एक अपील न्यायालय असून (स्थापना १९६८) त्याही पुढे अपील करावयाचे झाल्यास ते इंग्लंडमधील प्रिव्ही कौन्सिलमध्ये केले जात असे. १९७७ साली देशाचे स्वतंत्र संरक्षण दल उभारण्यात आले. त्यात पोलिसांचे खास दल व स्वयंसेवी रक्षक या दोहोंचा अंतर्भाव होता. संरक्षण दलासाठी ब्रिटिश शासनाकडून मदत मिळत असे.

आर्थिक स्थिती

साम्राज्यवादी सत्तांनी आपल्या वसाहतींचे आर्थिक शोषण कसे केले, याचा पुरावा या देशाच्या आर्थिक इतिहासातून मिळतो. देशातील एकूण जमिनीपैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र (४९%) जंगलांखाली होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात लाकूड निर्यातीवरच या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून होती. त्या काळात हा विभाग लाकूड उत्पादन व निर्यातीत जगात अग्रेसर मानला जाई; परंतु बेसुमार जंगलतोड झाल्याने देशाचे उत्पन्न घटू लागले. त्यामुळे कृषिउत्पादनांवर भर देणे भाग पडले. एकूण सुपीक जमिनीपैकी २०% जमिनीचाच शेतीसाठी वापर केला जातो. ऊस, लिंबू जातीची फळे (विशेषत: चकोतरा, संत्री) यांचे उत्पन्न चांगले येऊ लागल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. देशाच्या एकूण निर्यातीच्या दोन तृतीयांश निर्यात साखर व लिंबू जातीच्या फळांची असल्याने ही दोन उत्पादने देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होत. १९७३ पासून देशात केळीचेही उत्पादन घेतले जाते. १९७५ च्या दुष्काळात ऊस उत्पादन बरेच घटले होते; परंतु त्यानंतर १९७७ मध्ये हे उत्पादन ९८,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आले. १९७८ च्या हरिकेन वादळात मात्र येथील केळी व लिंबू जातीच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले. यांशिवाय नारळ, टॅपिओका, भात, मका, द्विदलधान्ये तसेच द्राक्षे इत्यादींचे उत्पन्नही घेतले जाते. मासेमारी व पशुपालन (विशेषत: डुकरे व कोंबड्या) यांच्यासाठी नव्या विकासयोजना आखण्यात येत आहेत. १९७९ साली देशात ५७,००० गुरे; ३,००० शेळ्या-मेंढ्या; २६,००० डुकरे; ३,४६,००० कोंबड्या असे पशुधन होते. एक पूरक अन्न म्हणून व निर्यातीच्या दृष्टीनेही मासेमारीचा व्यवसाय केला जातो. देशात कुटिरोद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. फळांचा रस तसेच फळे डबाबंद करणे, तेल शुद्धीकरण, मद्य इ. उद्योगांची पातळी मध्यम प्रकारची आहे. कॉराझॅल येथे फळे डवाबंद करण्याचा कारखाना असून तेल शुद्धीकरण कारखानाही सुरू करण्यात आला आहे. याशिवाय देशात कापड विणणे, सिगारेटी तयार करणे, लहान नावा बनविणे, बेकरी उत्पादने, लाकूड कापणे, मेणबत्त्या बनविणे, भात सडणे इ. उद्योगही विकसित होत आहेत.

वेलीझियन डॉलर हे देशाचे अधिकृत चलन असून १ वे. डॉलरचे १०० सेंट असे भाग होतात. १, ५, १०, २५ व ५० सेंटची नाणी आणि १, २, ५, १०, २० वे. डॉलरच्या नोटा प्रचलित आहेत. १ स्टर्लिंग पौंड = ४.२० वे. डॉलर व १ अमेरिकी डॉलर = २.०० वे. डॉलर असा १९७८ साली विनिमय दर होता. या देशाचा व्यापार बहुधा ग्रेट ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, जमेका या देशांशी चालतो. निर्यातीत मुख्यत्वे लाकूड, साखर, मळी, लिंबू जातीची फळे, केळी, मासे यांचा, तर आयातीत यंत्रसामग्री, खाद्यपदार्थ, वाहने, रसायने, इंधन इत्यादींचा समावेश होतो.

वाहतूक व संदेशवहन

देशातून लोहमार्ग काढून टाकण्यात आले आहेत. १९७८ सालापर्यंत देशात एकूण सु. १,६०० किमी. लांबीचे पक्के व ४०० किमी. लांबीचे कच्चे रस्ते होते. देशात एकूण पाच विमानतळ असून स्टॅन्ली फील्ड येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. वेलीझ सिटी हे देशातील प्रमुख बंदर असून ते खोल पाण्याने बंदर बनविण्याची सरकारी योजना आहे. स्टॅन क्रीक हे दुसरे बंदर देशाच्या दक्षिण भागात आहे. कॉराझॅल, स्टॅन क्रीक, पून्ता गॉर्द ही समुद्र किनाऱ्यावरील; तर ऑरेंज वॉक व सान ईग्नास्यो (काइओ) ही अंतर्गत भागातील नदीकाठची गावे वेलीझ सिटीशी जलमार्गांनीच जोडली गेली आहेत. देशात १९७८ साली एकूण ६ प्रमुख डाकघरे व ४४ उप-डाकघरे (खेडेगावात) तसेच एकूण ५,७८७ दूरध्वनी संच होते. त्यांद्वारा देशातील सर्व मोठी शहरे एकमेकांशी जोडलेली होती. १९७५ साली देशात एकूण ६८,००० रेडिओ संच व १०,००० लोकांची सोय असलेली एकूण १८ चित्रपटगृहे होती.

लोक व समाजजीवन

देशातील बहुतेक लोकवस्ती नदीखोऱ्यात व किनारी प्रदेशात एकवटलेली आहे. समाजात मिश्र वंशपरंपरा आढळून येतात व काही विशिष्ट गट ठराविक प्रदेशात एकवटलेले दिसून येतात. देशातील सु. ४०% लोक निग्रो असून ते मूळचे आफ्रिकेतील होत. हे लोक देशाच्या दक्षिण किनारी प्रदेशात राहतात. स्पॅनिश व मूळच्या माया इंडियनांचे (१७%) प्रमाण देशात खूपच कमी झालेले आढळते. माया इंडियन डोंगराळ प्रदेशात राहतात. यांशिवाय देशात काही आशियाई, यूरोपीय व कॅरीव इंडियन लोकही आहेत. धार्मिक दृष्ट्या देशात खिश्चनांचे प्रमाण जास्त असून १९७८ पर्यंत ६५,००० रोमन कॅथालिक व २८,००० मेथडिस्ट पंथीय होते. याशिवाय हिंदू, मुसलमान, बहाई धर्मीयही थोडेफार आहेत. मासेमारी, शेती व लाकूड उत्पादन हे येथील लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत. इंग्रजी ही देशाची अधिकृत भाषा असली, तरी एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक क्रीओल भाषा बोलतात. यांशिवाय स्पॅनिश, जर्मन, माया, कॅरीव तसेच काही बोलीभाशही प्रचलित आहेत. देशात सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मलेरियासारख्या साथीच्या रोगांचे निर्मूलन करण्यासाठीही योजना आखण्यात आल्या आहेत. उत्तर भागातील प्रगत भागापेक्षा दक्षिण भागात-विशेषत: माया जमातीत-मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. १९७७ साली देशाच्या शहरी भागात १० व ग्रामीण भागात १४ आरोग्यकेंद्रे होती. १९७९ साली देशात एकूण चार रुग्णालयांत ४५ डॉक्टर व ५४५ खाटांची सोय होती.

देशात प्राथमिक शिक्षण मोफत असून ६ ते १४ वर्षे वयाच्या मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. देशात १९७९ साली १५ सरकारी, १७९ सरकारी अनुदान घेणाऱ्या व १५ खाजगी प्राथमिक शाळांत एकूण ३४,१४९ विद्यार्थी शिकत होते. याच वर्षी २३ माध्यमिक शाळांत ५,९१३ विद्यार्थी, एका सरकारी तांत्रिक विद्यालयात ४७७ विद्यार्थी, २ सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांत ५८८ विद्यार्थी शिक्षण घेत होते. सरकारी विद्यालयांव्यतिरिक्त इतर सरकारी अनुदान घेणारी विद्यालये ख्रिस्ती संघटनांकडून चालविली जात होती. देशातील तीन महाविद्यालयांत एकूण ५८० विद्यार्थी होते. सप्टेंबर १९७९ मध्ये कला, विज्ञान व तंत्रविद्या शाखा असलेले महाविद्यालय सुरू करण्यात आले. देशात एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय असून त्याशिवाय ‘युनिव्हर्सिटी ऑफ द बेस्ट इंडीज’ तर्फे एक ३ वर्षाचा शिक्षक प्रशिक्षणाचा पदविका अभ्यासक्रमही चालविण्यात येतो. देशात १९७८ साली वेलीझ टाइम्स हे दैनिक, तर रिपोर्टर, द बेकम यांसारखी साप्ताहिके वेलीझ सिटी येथून; तर एक शासकीय व त्रैमासिक वेल्मोपान येथून प्रसिद्ध होत होते.

महत्त्वाची स्थळे

ब्रिटिशांची अमेरिकेतील अखेरची वसाहत ठरलेल्या या स्वतंत्र लहान देशात बराचसा भाग जंगलांचा व दलदलींचा असल्याने फारच थोडी शहरे वसली आहेत. येथील पुळणी, किनाऱ्याजवळची सु. २५६ किमी. लांबीची प्रवाळभित्ती, जंगलातील श्वापदांची शिकार, मासेमारी तसेच इतिहासप्रसिद्ध माया संस्कृतीचे अवशेष इ. आकर्षणांमुळे पर्यटन व्यवसायाचा विकास होणे शक्य आहे.

देशाची जुनी राजधानी असलेले वेलीझ सिटी हे मोठे शहर (लोकसंख्या ४९,७४९-१९७८) अंदाज) असून ते पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदरही आहे. येथून लाकूड, लिंबू जातीची फळे, केळी, नारळ यांची निर्यात केली जाते. देशाच्या मध्यवर्ती असलेले वेल्मोपान (४,०००) हे राजधानीचे शहर होय. कॉराझॅल (३,०००-१९७०) हे बंदर उत्तरेस मेक्सिकोच्या सरहद्दीजवळ चेतूमाल उपसागरावर वसलेले आहे. तेथे साखर-उत्पादन, मासेमारी, हरणाच्या कातड्याचे जोडे बनविणे, रम तयार करणे इ. उद्योग चालतात. या बंदरातून नारळ, साखर यांची निर्यात केली जाते. ऑरेंज वॉक (५,४१३) हे उत्तर भागातील शहर न्यू नदीवर वसले असून लाकूड (विशेषत: मॅहॉगनी), चिकल गम, साखर, रबर यांच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे मानले जाते. स्टॅन क्रीक (६,९६१) हे देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर केळी, लाकूड, नारळ, मासे यांच्या व्यापाराचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. कॅरीब लोकांनी एकोणिसाव्या शतकात हे शहर वसविले. येथून लहान नावांच्या साहाय्याने दररोज वेलीझ सिटीशी वाहतूक चालते. पून्ता गॉर्द (२,२१३-१९६७ अंदाज) हे दक्षिण भागातील, हॉंडुरस आखातावरील बंदर असून तेथून साखर, केळी, नारळ इत्यादींची निर्यात होते. सान ईग्नास्यो (२,४४६) व बेंग्के व्ह्येहो ही वेलीझ नदीवरील शहरे ग्वातेमालाच्या सरहद्दीवर असल्याने त्यांना राजकीय महत्त्व आहे. चिकल, लाकूड उत्पादनासाठी ही शहरे प्रसिद्ध आहेत. सान ईग्नात्यो गुरे व डुकरे यांच्या व्यापारासाठी महत्त्वाचे आहे. बेंग्के व्ह्येहो येथे माया लोकांची वस्ती जास्त आढळते.

बेलीझ बेलीझ बंदराचे दृश्य
माया इंडियन स्त्री मॅहाँगनी: राष्ट्रीय जंगलसंपत्ती

 

लेखक: मा. ल. चोढे / अविनाश पंडित

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate