অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टंड्रा

टंड्रा

ज्या प्रदेशाचे वर्षातील एखाद्या तरी महिन्याचे तपमान ०º से. ते १०º से.पर्यंत असते, अशा प्रदेशाचा समावेश टंड्रामध्ये केला जातो. टंड्रा प्रदेश सामान्यतः तीन ठिकाणी आढळतात. त्यांतील मुख्य म्हणजे सूचिपर्णी अरण्याच्या उत्तरेकडील, उत्तर ध्रुव प्रदेशालगतचा भाग आर्क्टिक टंड्रा म्हणून ओळखला जातो.

समशीतोष्ण कटिबंधातील पर्वत प्रदेशापैकी तरुरेषेपेक्षा उंचावरील प्रदेशास अल्पाइन टंड्रा म्हणतात. अंटार्क्टिकाचा टंड्रा प्रदेश अल्प आहे. भूपृष्ठाचा दहावा हिस्सा टंड्रा प्रदेशाने व्यापला आहे. उत्तर अमेरिकेतील ६०º उ. पलीकडील भाग यूरेशियातील ७०º उ. पलीकडील भाग, पूर्व सायबीरियातील ६०º उ. पलीकडील कॅमचॅटकाजवळचा भाग आर्क्टिक टंड्रामध्ये येतो.

र्क्टिक टंड्राच्या प्रदेशात अधून मधून तळी, दलदली, नद्या व खुरट्या झाडाझुडुपांचे व गवताचे आढळतात. बर्फ पडणे व वितळणे ह्या दोन्ही क्रिया या भागात चालतात. सदा गोठलेला जमिनीचा खालचा थर हे या भागाचे वैशिष्ट्य. या सदा गोठलेल्या तळ जमिनीमुळे विस्तृत ध्रुव प्रदेश व सूचिपर्णी अरण्यांचा तैगा प्रदेश हे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. स्थलपरत्वे ९० मी. पासून ६१० मी. खोलीपर्यंत जमीन गोठलेली आढळते. उन्हाळ्यात १५ ते ३० सेंमी.खोलीपर्यंतची जमीन वितळते.

वामान

टंड्राच्या ध्रुवीय ओसाड भागात तपमान उन्हाळ्यात ५º से. पासून हिवाळ्यात–३२º से.पर्यंत गेलेले आढळते. वार्षिक पर्जन्यमान सरासरी ३८ सेंमी. असते. त्यांपैकी दोन तृतीयांश पाऊस उन्हाळ्यात पडतो. किनारी प्रदेश खंडांतर्गत भागापेक्षा अधिक थंड व धुक्याने व्याप्त असतात.

उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे आकाश अभ्राच्छादित असते. हिवाळ्यात ते स्वच्छ होते. वर्षातील एक ते चार महिन्यांच्या काळात या भागाला सूर्यप्रकाश मिळतो. उरलेला काळ दीर्घ संधिप्रकाशाचा, अंधाराचा व ध्रुवीय प्रकाशाचा असतो. त्याचा परिणाम वनस्पतींच्या वाढीवर होतो. १०º से.ची समतापरेषा टंड्रा प्रदेशाच्या विषुववृत्ताकडील भागाची सीमा आहे, तर ०º से. ही ध्रुवाकडील भागाची सीमा आहे.

हिवाळ्याचा काळ ८–१० महिन्यांचा असतो. या वेळी हिमवष्टी होते. ती ६४ ते १९१ सेंमी.पर्यंत होते. वाऱ्यामुळे हिमकण वाहून नेले जातात व हिमवादळांमुळे हिमस्फटिक लहानलहान फटींतही घुसतात. आर्क्टिक टंड्रात वाऱ्याचा वेग ताशी ८ ते १६ किमी. असतो, तर अल्पाइन टंड्रात तो ताशी १२० ते २०० किमी.पर्यंतही असतो. अल्पाइन टंड्रात दिवस-रात्रीची लांबी आर्क्टिक टंड्रातल्याप्रमाणे अतिदीर्घ किंवा अतिलहान नसते. तसेच उंचीमुळे तेथे कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी असते. यांचा परिणाम तेथील जीवसृष्टीवर होतो.

वनस्पती

बर्फाचे आच्छादन, बर्फ वितळण्याचा काळ व जलवाहन यांवर वनस्पतिजीवन अवलंबून असते. वनस्पतीच्या दृष्टीने गवताळ टंड्रा, शैवाल टंड्रा व ओसाड टंड्रा असे तीन भाग होतात. उन्हाळ्यात बर्फाचा थर वितळतो. पाणी डबकी व सरोवरे यांत साठते. दलदली तयार होतात. टंड्राच्या दक्षिण सीमेवर बरीच सरोवरे आढळतात.

सरोवरांच्या व नद्यांच्या काठी जेथे जमीन चांगली आहे अशा भागात लव्हाळी, वाळुंज, गवत, द्विदल धान्ये, सूर्यफुले, बीच, विलो, बिलबेरी, क्लाउडबेरी यांसारख्या वनस्पती आढळतात. बऱ्याच वनस्पती झुबक्याझुबक्यांनी उगवतात. अधिक उत्तरेकडील शैवाल, दगडफूल यांसारख्या वनस्पती आढळतात. झुडुपे दाटीवाटीने उगवतात व त्यांची जाळी तयार होते. ती त्यांना संरक्षक ठरते.

नस्पतींचा रंग सर्वसामान्यपणे हिरवट-तपकिरी असतो. आर्क्टिक यूरोप व उ. अमेरिकेतील टंड्राचा भाग गवताळ टंड्राचा आहे. त्यामुळे त्याचा उपयोग रेनडियरसाठी होतो. ओसाड टंड्रा ध्रुवाकडील भागालगत आहे. तीन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या काळात अ‍ॅकोनाइट, येरॅनिअम, फरगेट-मी-नॉटसारख्या वनस्पती रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या असतात. उन्हाळ्याबरोबरच हा सर्व फुलबहार संपुष्टात येतो. उंच प्रदेशात वनस्पती विरळ असतात.

ल्पाइन टंड्रातही वनस्पतिजीवन जवळजवळ असेच असते. सौम्य उतारावर गवताची कुरणे, उंच भागात शैवाल व दगडफूल, खुरटी झुडुपे, विलो, खडकांच्या आडोशाला वाढणारे गवत व झुडुपेही दिसतात. विशिष्ट उंचीवर मोठी व भडक रंगांची फुले दिसतात.

प्राणिजीवन

अनेक प्रकारचे पक्षी व प्राणी या प्रदेशात आढळतात. ससे, कोल्हे, लांडगे, लेमिंग, अस्वले इ. प्राणी या भागात आढळतात. रेनडियर, कॅरिबू, कस्तुरी वृषभ (मस्क ऑक्स) हे मोठे प्राणी गवत खाणारे आहेत. कस्तुरी वृषभाच्या अंगावरील जाड कातडी व केस यांमुळे त्याचे तीव्र थंडीपासून रक्षण होते.

रेनडियर व कॅरिबू आपल्या टणक खुरांनी बर्फ उकरून त्याखालील दगडफूल, शैवाल यांसारख्या वनस्पती खातात. त्यांची शिंगेही बर्फ उकरण्यास व दाट झुडुपांतून वाट काढण्यास उपयोगी पडतात. अमेरिकन व यूरेशियन टंड्राच्या सर्वच भागांत ते आढळत नाहीत.

रेनडियर प्रामुख्याने उत्तर यूरोपात आढळतात. नंतर उ. अमेरिकेत त्यांना नेण्यात आले. रेनडियरचे मांस उत्तर आणि पश्चिम अलास्कामध्ये लोकांचे अन्न म्हणून उपयोगी येते.

फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, कोला द्वीपकल्प या भागांत रेनडियरला फारच महत्त्व आहे. पांढऱ्या रंगाची ध्रुवीय अस्वले विशेषतः समुद्राकाठी अधिक आढळतात. मासे हे येथील प्राण्यांचे व माणसांचे मुख्य अन्न.

सील जातीचा मासा उन्हाळ्यात स्थलांतर करतो. बेरिंग सामुद्रधुनीच्या भागात सील माशाची पकड मोठ्या प्रमाणावर केली जाते. व्हेल मासाही तितकाच महत्त्वाचा असून नॉर्वेमध्ये ते पकडण्यासाठी केंद्रे उभारलेली आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate