অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जर्मनी, पूर्व

जर्मनी, पूर्व

जर्मन लोकशाही प्रजासत्ताक (जर्मन डेमॉक्रॅटिक रिपब्लिक). पूर्व यूरोपमधील अत्यंत पुढारलेल्या आणि औद्योगिक दृष्ट्या जागतिक महत्त्वाचा देश. बर्लिनचा ४०३ चौ. किमी.चा पूर्व भाग धरून एकूण क्षेत्रफळ १,०८,१७८ चौ. किमी. लोकसंख्या १,६९,५१,२५१ (१९७३). विस्तार ५०° १०′ उ. ते ५४° ४१′ उ. आणि ९° ५४′ पू. ते १५° २′ पू.; पश्चिम जर्मनीशी याची सीमा १,३८१ किमी.; पूर्वेकडे पोलंडशी ओडर-नीस या नद्यांच्या अनुरोधाने ४५६ किमी. व दक्षिणेकडे चेकोस्लोव्हाकियाशी ४३० किमी.; याच्या उत्तरेस बाल्टिक समुद्र आहे.

भूवर्णन

अगदी उत्तरेकडील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यालगतचा भाग वालुकामय असून तो लहान टेकड्यांनी, वाळूच्या टेकड्यांनी व सरोवरांनी व्यापलेला आहे. अगदी मध्यवर्ती भाग सुपीक व मैदानी असला, तरी याचा काही भाग पर्वतांनी व वाळूने व्यापलेला आहे. दक्षिण भागात मिट्ल्‌जबर्ग पर्वतरांग व उत्तर जर्मन मैदानाचा भाग असून हा सर्व भाग जंगलांनी आच्छादिलेला आहे. फिख्‌टेलबेर्क हे एर्ट्‌सबिर्ग पर्वतरांगेतील १,२१४ मी. उंचीचे सर्वांत मोठे उंच शिखर आहे. बाल्टिक समुद्रकिनाऱ्यालगत थोडीच बेटे आहेत, त्यांतील ऱ्युगन हे सर्वांत मोठे आहे. ओडर, नीस, एल्ब, हाफेल, स्प्री, झाले (साल) या येथील प्रमुख नद्या होत.

हवामान

पूर्व जर्मनीचे हवामान समशीतोष्ण आहे. वायव्य भागाला समुद्रसान्निध्याचा फायदा मिळत असल्याने वर्षभर हवामानात विशेष फरक जाणवत नाही; परंतु आग्नेय भागात हवामान थोडे विषम स्वरूपाचे असते. दैनंदिन तपमानात फारसा फरक पडत नाही. बर्लिन शहराचे जानेवारी महिन्यांचे सरासरी तपमान १·१° से. आणि जुलै महिन्यांचे सरासरी तपमान १७·२° से. असते. दक्षिण भागात असलेल्या ड्रेझ्‌डेन या शहराचे जानेवारी महिन्यांचे सरासरी तपमान ०° से. व जुलै महिन्यांचे तपमान १८·३° से. असते. वार्षिक सरासरी तपमान ८·९° से. असते. उन्हाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असून वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६०·४ सेंमी. असते.

वनस्पती व प्राणी

उत्तर, मध्य व पश्चिम यूरोपात आढळणाऱ्या वनस्पती व प्राणी पूर्व जर्मनीतही आढळतात. पर्वतीय भागात पाइन, स्प्रूस, ओक आणि बीच वृक्षांची जंगले आहेत. अनेक प्रकारची फुले, नेचे, शैवाल इ. आढळतात. हरिण, जंगली डुकरे, कोल्हे, बॅजर, बीव्हर, इ. प्राणी आढळतात. पक्षी बहुतेक स्थलांतरी असून ते ईशान्य-नैर्ऋत्य दिशेने स्थलांतर करतात. मासे थोडेसेच सापडतात.


दाते, सु. प्र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate