जर्मन प्रजासत्ताक संघराज्य (फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी). मध्य यूरोपातील आर्थिक दृष्ट्या प्रगत देश असून या देशाचा विस्तार ४७° उ. पासून ५५° उ. व ६° पू. पासून १४° पू. पर्यंत पसरलेला आहे. या देशाच्या उत्तर सीमेलगत डेन्मार्क, पूर्व सीमेलगत पूर्व जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया, दक्षिण सीमेलगत स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया आणि पश्चिम सीमेजवळ नेदर्लंड्स, बेल्जियम, लक्सेंबर्ग व फ्रान्स हे देश आहेत.
वायव्य किनाऱ्यालगत उत्तर समुद्र व ईशान्य किनाऱ्यालगत बाल्टिक समुद्राचा भाग पसरलेला आहे. उत्तर-दक्षिण लांबी ८२७·२ किमी. व पूर्व-पश्चिम ४५० किमी. आहे. पश्चिम जर्मनीमध्ये बर्लिनचा पश्चिम भाग समाविष्ट केला आहे. या देशाचे एकूण क्षेत्रफळ २,४८,६०१ चौ. किमी. असून या देशाचे राज्यकारभारासाठी एकूण दहा प्रांतांत विभाजन करण्यात आले आहे. या प्रांतांनाच ‘लँडर्स’ असे म्हणतात. ३१ डिसेंबर १९७३ ची एकूण लोकसंख्या ६,२१,०१,४०० असून पुरुष २,९७,१३,८६० व स्त्रिया ३,२३,८७,६०० आहेत.
भौगोलिक दृष्ट्या पश्चिम जर्मनीचे पाच भागांत विभाजन करता येते. उत्तर समुद्राच्या किनाऱ्यालगत विस्तृत सखल प्रदेश पसरलेला आहे. किनाऱ्यालगतचा भाग वाळवंटी असून मध्यवर्ती भागाकडे या सखल मैदानाची उंची ३०० मी. पर्यंत वाढत गेली आहे. हा प्रदेश ऱ्हाईनपासून पूर्व जर्मनीपर्यंत पसरलेला आहे.
पश्चिम भागात ऱ्हाईन नदीच्या खचदरीचा भाग येतो. जर्मनीचा दक्षिण भाग पठारे आणि पर्वतरांगा यांनी व्यापलेला आहे. यात ब्लॅक फॉरेस्ट व ओडनव्हाल्ट या प्रमुख पर्वतरांगा असून त्या पुढे २,००० ते ३,००० मी. उंचीच्या बव्हेरियन आल्प्स या अती उंच पर्वतरांगेला येऊन मिळतात. या पर्वतरांगेपुढे स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया हे भाग पश्चिम जर्मनीपासून विलग झाले आहेत. त्सूकश्पिट्स हे पश्चिम जर्मनीमधील सर्वांत उंच शिखर आहे. समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची ३,२०० मी. आहे.
कॉन्स्टन्स हे या देशातील सर्वांत मोठे सरोवर आहे; परंतु या सरोवराचा काही भाग स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियामधे मोडतो. देशाचा दक्षिण भाग सोडल्यास या देशातील सर्व नद्या उत्तर समुद्राकडे वाहत जातात. पश्चिम भाग ऱ्हाईन व तीच्या उपनद्यांनी व्यापलेला आहे. मोझेल आणि मेन या तिच्या दोन उपनद्या आहेत.
ऱ्हाईन नदी खचदरीतून सु. ८०० किमी. अंतरापर्यंत वाहत जाते. पूर्व भागात एम्स, वेझर, आणि एल्ब या नद्या आहेत. या नद्यांच्या मुखांशी खाड्या निर्माण झाल्या आहेत. या खाड्यांवर उत्तम बंदरे वसली आहेत. दक्षिण भागातून डॅन्यूब नदी सु. ६४० किमी. अंतरापर्यंत पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते. पश्चिम जर्मनीच्या वायव्य किनाऱ्यालगत फ्रिझियन बेटे आहेत. एल्ब नदीच्या मुखाशी हेल्गोलँड नावाचे लहानसे बेट आहे.
पश्चिम जर्मनीचे हवामान सौम्य असले, तरी हवेत एकसारखा बदल होत असतो. जानेवारी महिन्याचे सरासरी तपमान स्थलकालपरत्वे –२·८° से. ते १·१° से. इतके असते. पर्वतीय भागात जानेवारी महिन्याचे तपमान सर्वांत कमी म्हणजे –६·१° से. इतके असते. उत्तरेकडील सखल प्रदेशात जुलै महिन्यातील सरासरी तपमान १६·१° से. ते १८·९° से. इतके असते. ऱ्हाईन नदीच्या वरच्या टप्प्यातील प्रदेशात जुलै महिन्यातील तपमान जास्त म्हणजे २०° से. इतके असते.
वार्षिक सरासरी तपमान ८·९° से. असते.पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांपासून वर्षभर पाऊस पडतो. उत्तरेकडील सखल प्रदेशात स्थलपरत्वे पावसाचे प्रमाण ५० ते ७० सेंमी., मध्य भागातील पर्वतीय प्रदेशात ६८ ते १०० सेंमी. इतके असते.
बव्हेरियन आल्प्स पर्वतावर पावसाचे प्रमाण सर्वांत जास्त म्हणजे १९५ सेंमी. असते. जानेवारी ते मार्च या कालावधीत उंच पर्वतशिखरे हिमाने आच्छादिलेली असतात. जानेवारी महिन्यात हिमावरणाचे प्रमाण जास्त असते.
पश्चिम जर्मनीमध्ये मध्य यूरोपात आढळणारे प्राणी व वनस्पती आढळतात. येथे नद्यांत व उत्तर समुद्रात कार्प, टेंच, स्टर्जन, सॅमन इ. मासे सापडत असून स्थलांतरित पक्षीही बरेच आहेत. जंगली कबूतर, कोकीळ, सुतारपक्षी, जे इ. पक्षी असून रानडुक्कर, बॅजर, ऑटर, लिंक्स वगैरे प्राणी आढळतात. बराचसा भाग सूचिपर्णी अरण्यांनी व्यापलेला आहे.
या प्रकारची अरण्ये पर्वतभागात आढळतात. यांशिवाय कमी पावसाच्या प्रदेशात पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. बीच आणि ओक या प्रमुख झाडांच्या जाती आढळतात. उंच पर्वतभागात स्प्रूस वृक्षांची जंगले, तर किनाऱ्यालगतच्या रेताड जमिनीवरच्या भागात पाइन व लार्च वृक्षांची जंगले आढळतात. ऋतूनुसार या भागात निरनिराळ्या जातींचे पक्षी स्थलांतर करताना आढळतात.
दाते, सु. प्र.
पश्चिम जर्मनीत जुन्या अविभक्त जर्मनीच्या बहुतेक औद्योगिक विभागांचा समावेश आहे. १९४९–६३ या काळात डॉ. ⇨कोनराड आडनौअर यांचे कणखर राजकीय नेतृत्व व लुडविग एरहार्ट यांचे कुशल आर्थिक धोरण पश्चिम जर्मनीला मिळाले. अमेरिकेच्या मार्शल योजनेनुसार १९४८–५१ या काळात ३ अब्ज ६३ कोटी डॉलर आर्थिक मदत तिला लाभली. पश्चिमी राष्ट्रांचा विश्वास संपादन करून जर्मनीच्या पुर्नरचनेला त्यांचे सहकार्य मिळविण्याचे आडनौअर यांचे धोरण होते.
१९५२ मध्ये आडनौअर यांनी फ्रान्स आणि इटली यांच्या सहकार्याने यूरोपीय कोळसा व पोलाद समूह म्हणजे कोळसा आणि पोलादासाठी यूरोपची सामूहिक बाजारपेठ स्थापन केली.
१९५८ मध्ये यूरोपीय सामायिक बाजारपेठ व परमाणू संशोधनाची सामूहिक यंत्रणा (यूरोटॉम) निर्माण केली. आडनौअरच्या या उपक्रमांनी यूरोपात आर्थिक सहकार्याचे एक नवे युग सुरू झाले. व प. जर्मनीला यूरोपमध्ये पुन्हा मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले.
आपल्या चौदा वर्षांच्या कारकीर्दीत आडनौअर यांनी प. जर्मनीची यूरोपशी एकात्मता घडवून आणली. पश्चिमी देशांशीच मित्रत्व राखून दुभंगलेल्या जर्मनीचे पुन्हा एकीकरण करता येईल, अशी त्यांची धारणा होती. पूर्व जर्मनीच्या स्वतंत्र राज्याचे अस्तित्व त्यांनी कधीच मान्य केले नाही. फ्रान्स व जर्मनीच्या एकतेला ते विशेष महत्त्व देत.
मे १९५५ मध्ये प. जर्मनी संपूर्ण सार्वभौम राष्ट्र झाले. नाटो या लष्करी करारातही प. जर्मनीला स्थान मिळाले. कोळशाच्या खाणी असलेला झारलँड प्रदेश फ्रान्सने आपल्या ताब्यात ठेवला होता. तोही १९५७ मध्ये प. जर्मनीला परत मिळाला. युद्धाच्या विध्वंसातून प. जर्मनीचे जे पुनरुत्थापन झाले, तो आधुनिक काळातील एक चमत्कार समजला जातो. १९५० पासून यूरोपीय व्यापारी देशांत प. जर्मनीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले. १९५६ मध्येच प. जर्मनीचे उत्पादन १९३८ च्या तिप्पट झाले होते. राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीने यूरोपीय देशांत प. जर्मनीचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2020