অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चीन

चीन

चीनचे प्रजासत्ताक अथवा ‘चुंग-ह्‌वा-जन्-मिन्-कुंग-हो-क्वॉ ’. आशिया खंडातील सर्वांत मोठा व प्राचीन देश. क्षेत्रफळ (तैवान सोडून) सु. ९५,६१,००० (१९६७) चौ. किमी.; लोकसंख्या ७८,६०,५८,००० (१९७२ संयुक्त राष्ट्रे अंदाज). चीनचा पूर्वपश्चिम विस्तार सु. ७३° पू. ते १३५° पू. सु. ४,८०० किमी. व दक्षिणोत्तर विस्तार सु. १८° २०′ उ. ते ५३° ५२′ उ. सु. ४,००० किमी. आहे. चीनच्या मँचुरिया, इनर मंगोलिया, सिंक्यांग-ऊईगुर, तैवान व तिबेट या विभागांस मिळून बाह्य चीन किंवा महाचीन व बाकीच्या प्रदेशास मुख्य चीन असे संबोधण्याची परंपरा आहे. राजकीय दृष्ट्या तैवान-व्यतिरिक्त सर्व विभाग चिनी प्रजासत्ताकात समाविष्ट आहेत. तथापि तैवान आपलाच एक भाग असल्याचे चीन मानतो.

१९४९ पासून तैवान हा चीनपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला.

चीनच्या उत्तरेस मंगोलिया प्रजासत्ताक व रशिया, ईशान्येस रशिया व उत्तर कोरिया, पूर्वेस पीत व पूर्व चिनी समुद्र, दक्षिणेस दक्षिण चिनी समुद्र, उत्तर व्हिएटनाम, लाओस, ब्रह्मदेश, भारत, भूतान, नेपाळ आणि पश्चिमेस भारत, अफगाणिस्तान व रशिया हे देश आहेत. चीनचे समुद्र आणि पश्चिम पॅसिफिक यांदरम्यान कूरील, जपान, रिऊक्यू, तैवान, फिलिपीन्स या बेटांची रांग आहे.

देशाची भूरचना, प्राकृतिक स्वरूप व हवामान यांतील विविधता, विशिष्ट प्रकारचे सांस्कृतिक जीवन व अनेक बाबतीत शेजारच्या देशांपेक्षा दिसून येणारे वेगळेपण, यांमुळे चीन हे एक उपखंडच आहे असे यथार्थतेने म्हणता येते.

भूशास्त्रीय रचना

चीनमधील भूमिस्वरूपे, पश्चिमेकडील तिबेटिया, उत्तरेकडील गोबिया आणि पूर्वेकडील कॅथशिया या अतिप्राचीन प्रस्तर ढालींवर आधारलेली आहेत.

ढाली रूपांतरीत प्रस्तरांच्या बनलेल्या असून त्या अतिशय मजबूत, अनम्य, आणि अचल आहेत. या प्रस्तर ढालींचा बराचसा भाग नव्याने तयार झालेल्या खडकांखाली आज झाकलेला आढळतो. या भागातील समुद्रसपाटी जेव्हा जेव्हा वाढली, तेव्हा तेव्हा समुद्राचे पाणी वर निर्देशिलेल्या प्रस्तर ढालींच्या सखल भागांत पसरून तेथे चुनखडक, वाळूचे खडक, शैल इ. स्तरित खडकांची रचना झाली.

मात्र पाणी ओसरून गेल्यावर नवीन स्तरित खडक जमिनीच्या पृष्ठभागावर दिसू लागले. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचून दलदल तयार झाली अशा भागांत विशेषतः उत्तेरस, जंगले वाढीस लागली आणि त्यांवर कार्बोनिफेरस काळात समुद्राचे पाणी पुन्हा पसरल्यावर नविन स्तरित खडकांची मांडणी होऊ लागली.

याच भागात पूर्वीची नैसर्गिक वनस्पती स्तरित खडकाखाली गाडली गेल्याने, दगडी कोळशाचे साठे तयार झाले. याप्रमाणे भूशास्त्रीय काळात अनेक वेळा चीनच्या प्राचीन प्रस्तर भूमीच्या सखल भागात सभोवतालच्या समुद्राचे पाणी शिरून पसरले आणि कालांतराने ओसरले. मात्र ते ओसरताना त्या ठिकाणी नवीन खडक मागे राहिले.

मध्यजीव महाकल्पात चीनमध्ये मोठ्या गिरिजनक हालचाली झाल्या. त्यांना यिन शान हालचाली असे म्हणतात. त्यामुळे चीनच्या पूर्व भागातील स्तरित खडकांचे थर दुमडले जाऊन वली पर्वत तयार झाले. या वली पर्वतांतील भूचापांची अक्षीय दिशा नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे आहे, म्हणजेच ते चीनच्या पूर्व किनाऱ्याशी समांतर आहेत दोन भूचंपामध्ये त्यांना समांतर अशा भूद्रोणी तयार होऊन त्या सखल भागांत काही ठिकाणी आज मैदानी प्रदेश दिसून येतात.

चीनच्या पूर्व भागात भूचाप व भूद्रोणी यांच्या लागोपाठ पाच रांगा नैऋत्येकडून ईशान्येकडे समुद्रकिनाऱ्याला जवळजवळ समांतर गेलेल्या आढळतात. यांपैकी अतिपूर्वेकडील भूचापाचा अक्ष चीनच्या पूर्व किनाऱ्याच्या पट्टीवरील जजिआंग-फूक्येन पठारावरून ईशान्येस दक्षिण कोरियापर्यंत गेला आहे.

याच भूचापाचा काही भाग खाली खचून त्या ठिकाणी पीत समुद्र तयार झालेला आहे. या भूचाप अक्षाच्या पश्चिमेस दुसऱ्या भूचापाचा अक्ष शँटुंग द्विकल्पातून ईशान्येस लिआउनिंगपर्यंत गेलेला आहे. पूर्वेकडील भूचापांच्या दोन रांगांमध्ये भूद्रोणी तयार झाली असून त्यात यांगत्सीकिअँग (किअँग = नदी) व सिक्यांग नद्यांचे त्रिभुज प्रदेश व गान नदीचे खोरे बनले आहे.

शँटुंगपासून लिआउनिगंपर्यंत पसरलेल्या या भूचापाचा अक्ष सलग नसून तो मध्येच खंडित झालेला आहे. याच भूचापाच्या पश्चिमेस आणखी तिसरा भूचाप पसरला असून त्याच्या अक्षाची दिशाही नैऋत्येकडून ईशान्येकडेच गेलेली आहे. या भूचापाच्या प्रदेशांत जॉर्ज पर्वत, ताइ-हांग-शान (शान = पर्वत) आणि ग्रेट खिंगन पर्वत तयार झाले आहेत व त्यांच्या पूर्वेकडील भूद्रोणीमध्ये मँचुरियाचे मध्यवर्ती सखल मैदान, ह्‌वांग (हो) नदीचा त्रिभुज प्रदेश व यांगत्सी नदीचे मध्यवर्ती खोरे तयार झाले आहे.

पूर्व चीनमधील पर्वतश्रेण्यांच्या व नद्यांच्या दिशांवर या गिरिजनक हालचालींचा परिणाम घडून आला आहे. लक्षावधी वर्षांच्या कालखंडात या ठिकाणच्या पर्वतांची झीज होऊन ते उंचीने लहान, कमी ओबड-धोबड व काही भागांत पठाराच्या स्वरूपात आज दिसून येतात.

तृतीयक महाकल्पाच्या प्रारंभी चीनच्या अंतर्भागात पुन्हा गिरिजनक हालचाली होऊन गोबिया व तिबेटिया यांच्या दरम्यान पसरलेले स्तरित खडकांचे थर दुमडले गेले व त्यामुळे त्या भागात वली पर्वत तयार झाले. या भागातील पर्वतश्रेण्यांची दिशा मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. दक्षिण चिनी समुद्रापासून ते उत्तरेस सायबीरियाच्या सरहद्दीपर्यंत

(१) दक्षिणेकडील नानलिंग (नानशान) पर्वत;

(२) त्याच्या उत्तरेकडील, ह्‌वांग हो आणि यांगत्सीकिअँग यांच्या खोऱ्यांदरम्यानची, कुनलुनची शाखा चिनलिंग पर्वतश्रेणी;

(३) तिच्या उत्तरेस व गोबी वाळवंटाच्या दक्षिणेस इनर मंगोलियातून गेलेली डाचेंग आणि यिन शान पर्वतश्रेणी;

(४) या श्रेणीला समांतर पण गोबी वाळवटांच्या उत्तरेला टॅन-उ-ओला, खांगाई आणि गेंटे पर्वतश्रेण्या; या चार पर्वतश्रेण्या पूर्व- पश्चिम पसरल्या आहेत.

चीनमधील सर्वाधिक गुंतागुंतीच्या पर्वतश्रेण्या तिबेटच्या चारी बाजूंस निर्माण झालेल्या आहेत. तिबेटच्या दक्षिणेस हिमालय पर्वत व उत्तरेस कुनलुन आणि तिएनशान असे मोठमोठाले पर्वत तयार झाले आहेत. त्याची सर्वसाधारण दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे.

तिबेटच्या पूर्वेकडील पर्वतरांगा दक्षिणोत्तर पसरलेल्या असून त्या सेचवान प्रांतापर्यंत दक्षिणेस गेल्या आहेत. चीनच्या अंतर्भागात पर्वत निर्मितीच्या हालचाली अजूनही चालू आहेत. हे कान्सू प्रांतात (इ.स. १९२० व १९२७) व शेन्सी प्रांताच्या मध्यभागात (इ.स. १५५६) झालेल्या मोठ्या भूकंपांवरून सहज लक्षात येते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate