भौगोलिक दृष्ट्या गिनीचे चार विभाग पडतात : किनारपट्टी; त्याच्या उत्तरेकडील फूटा जालन हा विस्तीर्ण पठारी प्रदेश; ईशान्येकडील सॅव्हानाचा गवताळ प्रदेश व आग्नेयीकडील वनाच्छादित डोंगराळ प्रदेश. दक्षिणेकडील किनारी प्रदेश सखल असून किनारपट्टी ४८ ते ८० किमी. रुंदीची आहे. समुद्रकिनारा जवळजवळ सरळ असून त्यावर काही नद्यांचे त्रिभुजप्रदेश आहेत. किनारी प्रदेशाची समुद्रसपाटीपासूनची उंची २०० मी. आहे. किनाऱ्याजवळ काही बेटे असून त्यांपैकी लॉस हे प्रमुख आहे, तर टोंबो बेटावर कोनाक्री वसले आहे. उत्तरेकडील अंतर्गत भागात प्रदेशाची उंची ५०० मी.पर्यंत आणि त्यानंतर फूटा जालन पठाराची उंची ५०० — ९१२ मी.पर्यंत वाढलेली आहे.
फूटा जालन पठाराच्या उत्तरेकडे प्रदेशाची उंची ३०० मी.पर्यंत कमी झालेली आहे. फूटा जालन हे पठार वायव्येकडून आग्नेयीकडे पसरलेले असून त्याने देशाचा मध्यभाग व्यापलेला आहे. फूटा जालन पठारावर अनेक नद्या उगम पावतात. त्यांपैकी काही उत्तरेकडे व ईशान्येकडे आणि काही दक्षिणेकडे व नैर्ऋत्येकडे वाहत येऊन गिनीच्या आखातास मिळतात. फूटा जालन पठारानेच नद्यांतील जलविभाजक क्षेत्र निर्माण केले आहे.
पठारी प्रदेशामुळे धबधबे निर्माण होऊन नद्या जलवाहतुकीस निरुपयोगी झाल्या आहेत. ईशान्येकडील गवताळ प्रदेश सरासरी ३०० मी. उंचीचा मधूनमधून खडकाळ डोंगर असलेला मैदानी प्रदेश आहे, तर आग्नेयीकडील भाग हा घनदाट जंगलांचा डोंगराळ प्रदेश आहे, निंबा (सु. १,८२४ मी.) हे देशातील सर्वांत उंच शिखर याच भागात आहे. नायजर व तिची उपनदी मिलो यांचा उगम याच भागात आहे. संपूर्ण प्रदेश संमिश्र स्फटिकमय खडकांपासून निर्माण झालेला आहे. त्यावर काही प्रदेशात स्तरित खडकांचे, ग्रॅनाइट व नीस खडकांचे संचयन झालेले दिसून येते.
कँब्रियनपूर्व काळात या खडकांना घड्या पडलेल्या असून मध्य व तृतीय युगांत गाळाच्या खडकांची निर्मिती झाली आहे. गिनीच्या दक्षिणभागात जांभ्याची माती, मध्यभागात उष्णकटिबंधीय लाल व पिवळ्या रंगांची आणि उत्तरभागात चर्नोझम व चेस्टनट माती दिसून येते. लोह,अॅल्युमिनियम व मँगॅनीज या धातूंच्या प्राणिदांमुळे मातीला लालसर पिवळा रंग प्राप्त झालेला दिसतो. पिकांच्या लागवडीमुळे या मातीची सुपीकता लवकरच नाहीशी होते; पण कठीण वृक्षांच्या वाढीसाठी ही माती अनुकूल आहे. काँकूरे, नायजर (जलिबा), गँबिया, बाफँग, बाकोई आणि काझामांस या गिनीतून वाहणाऱ्या प्रमुख नद्या होत.
गिनीचे हवामान विषुववृत्तीय प्रकारचेच असले, तरी उंचीप्रमाणे हवामानात फरक पडत जातो. किनारी प्रदेशाच्या हवामानावर गिनीच्या उष्ण प्रवाहाचा परिणाम होऊन उष्ण व दमट वारे गिनीच्या आखातावरून आतील प्रदेशात वाहू लागतात. त्यापासून किनारी प्रदेशात ४०० सेंमी.वर पाऊस पडतो. जास्त पाऊस, २६०—३०० से. तपमान, दमट हवा यांमुळे किनारी प्रदेशातील हवामान आरोग्यदायी नसून प्रदेशही बराच दलदलीचा आहे. पर्जन्याचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे २०० — १५० सेंमी.पर्यंत कमीकमी होत जाते. गिनी हा देश मुख्यत्वे ईशान्य व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येतो.
जानेवारीत जास्त भाराचे क्षेत्र उत्तर आफ्रिकेत तयार होते व ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे व्यापारी वारे वाहू लागतात. हे जमिनीवरून वाहणारे वारे असल्यामुळे कोरडे असतात. पण जुलैमध्ये गिनी आखातात जास्त वायुभाराचे केंद्र असते, तर सहाराच्या मध्यभागात वायुभार कमी असतो. म्हणून उन्हाळ्यात गिनीच्या आखाताकडून बाष्पयुक्त वारे वाहू लागतात व गिनीमध्ये उन्हाळ्यात त्यांपासून पाऊस पडतो. अतिपर्जन्यामुळे किनारी प्रदेशाच्या दलदली भागात कच्छवनश्री विपुल प्रमाणात उगवते. आग्नेय गिनीमध्ये घनदाट हिरवीगार विषुववृत्तीय अरण्ये निर्माण झाली आहेत.
जगात न सापडणाऱ्या काही वनस्पतींचे प्रकार येथे आढळतात. त्याशिवाय मॉहॉगनी, एबनी, रोजवुड इ. कठीण लाकडाचे वृक्ष, गवत, बाभूळ, निलगिरी, चिंच, बोर, तेल्याताड, गोरखचिंच. शीनट इ. वृक्ष आहेत. गिनीमध्ये तृणभक्षक व मांसभक्षक असे दोन्ही प्रकारचे प्राणी विपुल आहेत. अरण्यांत व गवताळभागांत हत्ती, वाघ, सिंह, जिराफ, तरस, लांडगे, हरिण, झेब्रा, मगरी, माकडे, सुसरी, साप इ. प्राणी विपुल आहेत.
गिनीच्या किनाऱ्यावर पिग्मी व निग्रो लोकांनी प्रथम वसाहती केल्या. आतील अरण्ये तोडून त्यांनी स्थलांतरित स्वरूपाची शेती करण्यास सुरुवात केली. उत्तरेकडून बर्बर लोक, ईजिप्त व सूदानमधूनही काही वन्य टोळ्या या देशाच्या उत्तर भागात येऊन स्थायिक झालेल्या आहेत. १५० उत्तर अक्षांश ते १५० दक्षिण अक्षांशापर्यंतचा संपूर्ण प्रदेश पूर्वी गिनी म्हणून ओळखला जात असे. सेनेगलमधील व्हर्द भूशिरापासून अंगोलातील मोसॅमीडीपर्यंतचा किनारी प्रदेश यात येत असे.
नकाशामध्ये १३५० पासूनच गिनी किनारा दर्शविण्यात येत होता; तथापि पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत यूरोपमध्ये गिनी नावाचा उपयोग केला जात नसे. नायजर नदीच्या पूर्व खोऱ्यातील धिनी-जेन्नी किंवा डेन्नी या शहराच्या नावावरूनच आठव्या शतकातच या प्रदेशास गिनी हे नाव देण्यात आले असावे, असे एक मत आहे. १४८३ मध्ये फ्रेंच लोकांचे या प्रदेशाकडे प्रथम लक्ष गेले.अकरावा लुई या फ्रान्समधील राजाने महारोगावरील औषधाच्या शोधासाठी काही जहाजे या भागाकडे पाठविली होती; पण ती जहाजे परत येण्यापूर्वीच लुई वारला.
१५५८ मध्ये सेनेगलमधील सेंट लूईस येथे फ्रेंचांनी पहिली व्यापारी वसाहत स्थापन केली. १६३४ मध्ये फ्रेंचांनी सेनेगल व गँबियाशी व्यापार करण्यास सुरुवात केली. व्हर्द भूशिर ते काँगो नदीच्या मुखापर्यंतच्या प्रदेशात फ्रेंच सरकारने तीन व्यापारी कंपन्यांना वसाहती स्थापण्यास परवानगी दिली.
फ्रेंचांशिवाय पोर्तुगीज, इंग्रज, डच व स्पॅनिश व्यापारीदेखील चौदाव्या ते पंधराव्या शतकांतच या भागाकडे येऊ लागले. या संपूर्ण किनाऱ्याच्या विविध भागांना तेथील उत्पन्नावरून निरनिराळी नावे देण्यात आली होती; उदा., पालमस भूशिर ते सिएरा लिओनच्या किनाऱ्यास ‘ग्रेनकोस्ट’ हे नाव तेथे उत्पन्न होणाऱ्या मिऱ्याच्या बियांवरून; त्यापुढील किनाऱ्यास हस्तिदंतावरून ‘आयव्हरी कोस्ट’; पालमस भूशिराच्या पूर्वेकडील किनाऱ्यास तेथे आढळणाऱ्या सोन्यावरून ‘गोल्डकोस्ट’, तर व्होल्टा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यास तेथे चालत असलेल्या गुलामांच्या व्यापारामुळे ‘स्लेव्हकोस्ट’ अशी नावे देण्यात आली होती.
१७९४ मध्ये कायद्याने गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला. त्यानंतर गिनीमधील नद्यांतून चोरून गुलामांची वाहतूक सुरू झाली. तोपर्यत गिनीमधील प्रदेशाकडे फारसे लक्ष नव्हते. १८१४ च्या तहाने येथील फ्रेंचांचे व्यापारहक्क सुरक्षित झाले. बोके शहर व त्याच्या आसपासच्या शहरांवर फ्रान्सने आपला संरक्षित प्रदेश १८४९ साली निर्माण केला. फूटा जालन पठारावरील टोळीवाल्यांत १७२५ साली धर्मयुद्धे होऊन फुलानी या इस्लामी टोळीवाल्यांनी मालिंकेंचा पराभव करून साम्राज्य स्थापले. फुलानींनी १८६१ साली फ्रेंच संरक्षित प्रदेशास मान्यता दिली.
१८६४ पासून फुलानींमध्ये यादवी सुरू झाली. १८८१ साली नायजर नदीच्या पश्चिमेकडील मुलूख फ्रेंच संरक्षणाखाली देण्यास फुलानी राजाने मान्यता दिली; पण त्याने शब्द बदलल्याने फ्रेंचांनी त्याची १८९१ — ९३ मध्ये हकालपट्टी केली. नायजरच्या पूर्व भागात, मिलो नदीकाठच्या कांकान शहरी, १८७९ पासून मालिंके टोळीवाल्यांचे राज्य होते. १८९८ पर्यंत फ्रेंचांनी त्यांचाही बीमोड केला. १८९० साली सध्याच्या गिनी प्रदेशाचे स्वरूप निर्माण झाले. १८९१ मध्ये त्याची सेनेगलपासून फारकत झाली आणि ‘रिव्ह्येअर द्यू स्यूद ’ या नावात बदल करून फ्रेंच गिनी हे नाव मिळाले.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/16/2020
युनायटेड किंग्डम : यूरोपच्या वायव्य किनाऱ्याजवळील...
आयबेरिया : (१) नैऋत्य यूरोपमधील स्पेन व पोर्तुगाल ...
लाँग बेट : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूय...
कानेरी बेटे : अटलांटिक महासागरातील, अफ्रिकेच्या वा...