किनारी मैदानी प्रदेश दक्षिणेस ३० किमी. पासून उत्तरेस २oo किमी. पर्यंत रुंद होत जातो. त्याच्या पूर्वेस सु. ९६ किमी. रुंदीचा व १८o ते ६१o मी. उंचीचा उत्तट प्रदेश असून बाकीचा भाग डोंगराळ आहे. ईबूंजी हे १,५७४ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर ओगोवे व एन् गून्या या नद्यांदरम्यानच्या शायू पर्वतात आहे.
ओगोवे ही मुख्य नदी ८oo किमी. लांब असून एन् गून्या व ईव्हींदो या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. त्या सर्व अंतर्भागात सु. २५o — ३oo किमी. पर्यंत नौकासुलभ आहेत. लोपेझ भूशिरापर्यंतचा दक्षिण किनारा बेंग्वेला प्रवाहामुळे बनलेले वाळूचे दांडे व खारकच्छ यांनी युक्त आहे. उत्तरेकडील किनाऱ्यावर खाड्या व उपसागर तयार झाले आहेत. त्यांत गाबाँ नदीची खाडी रुंद व प्रमुख आहे.
ओगोवेच्या मुखाकडील भागात काही सरोवरे आहेत.
देशाच्या जवळजवळ मध्यातून विषुववृत्त गेले असल्याने येथे विषुववृत्तीय उष्ण व दमट हवामान आहे.तपमान नेहमी २६० से.च्या आसपास असते. ऋतूंचा फरक जाणवत नाही . जून ते सप्टेंबर हवा फार दमट असते; परंतु यावेळी पाऊस फारसा पडत नाही. तथापि वार्षिक पाऊस सु. २५o ते ३७५ सेंमी. पडतो. किनाऱ्याजवळ दक्षिणेकडून येणारा बेंग्वेला थंड प्रवाह आणि उत्तरेकडील उष्ण गिनी प्रवाह एकत्र येतात त्यामुळे पाऊस वाढतो. किनाऱ्याजवळ थंड प्रवाहामुळे तपमान थोडे कमी होते.
बहुतेक सर्व प्रदेश दाट वर्षावनांनी युक्त आहे. त्यांची वाढ जलद होते व ती सतत हिरवीगार असतात. त्यांच्या ३,००० जाती आढळल्या आहेत.ओकूमे किंवा गाबाँ मॉहॉगनी हा कठीण लाकडाचा वृक्ष आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. किनाऱ्याजवळ खारकच्छ वनस्पती व केवड्याची बने असून सरोवरांच्या भागात उंच पपायरस गवताने विस्तीर्ण प्रदेश व्यापला आहे.
अनेकविध प्राण्यांत हत्ती, हिप्पोपोटॅमस, रानरेडे, काळवीट, अनेक प्रकारचे हरिण व माकडे असून विशेष म्हणजे गोरिला हा कपी आढळतो. पॉल बी. द्यू शायू या समन्वेषकाने येथे गोरिला प्रथम पाहिला.
या देशात अश्मयुगीन उपकरणे सापडली आहेत. तेव्हापासून अनेक आफ्रिकी जमातींनी येथे वस्ती केली आहे. पोर्तुगीजांना १४७o मध्ये ह्या देशाचा शोध लागला. पहिल्या संशोधकांना कोमो खाडीचा प्रदेश टोपड्यासह बाह्यांच्या कोटासारखा भासला, म्हणून त्यांनी त्यास ‘गाबाँ ’ असे नाव दिले. त्यानंतर ह्या प्रदेशातील बंदरांचा उपयोग गुलामांच्या व्यापाराची केंद्रे म्हणून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. नंतर इंग्रज, डच, फ्रेंच हे लोकही येथे येऊ लागले.
गुलामांच्या व्यापारास बंदी झाल्यावर १८३९ मध्ये फ्रेंच लोकांनी ह्या प्रदेशात आपला ताबा बसविला व किनाऱ्यापासून आतला प्रदेशही हळूहळू व्यापला. फ्रेंचांनी आपल्या काँगोच्या राज्यात ह्या भागाचा समावेश केला. परतु १९१o मध्ये स्वतंत्र फ्रेंच वसाहत म्हणून हा भाग अलग करण्यात आला.
त्यानंतर फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकेच्या इतरप्रदेशांप्रमाणे गाबाँ हा त्याचा भाग झाला. १८४९ मध्ये गुलामगिरी रद्द करण्यात आल्यावर लीब्रव्हिल येथे आरमारी व व्यापारी ठाणे निर्माण झाले. गुलामांच्या मुक्ततेमुळेच ह्या शहरास लीब्रव्हिल असे नाव पडले.
१९५८ मध्ये फ्रेंच राष्ट्रकुलांतर्गत संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता ह्या प्रदेशास प्राप्त झाली व १९ फेब्रुवारी १९५९ मध्ये गाबाँची स्वतंत्र राज्यघटनाही अंमलात आली. पुढे १७ ऑगस्ट १९६० रोजी ह्या प्रदेशाने सुपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले; परंतु तो फ्रेंच राष्ट्रकुलातून बाहेर पडला नाही. आर्थिक व तांत्रिक मदतीसाठी त्याने फ्रान्सशी स्वतंत्र करार करून त्या देशाशी आपले संबंघ कायम ठेवले.
पूर्वीच्या फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकेतील चॅड,काँगो व मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकांबरोबर जकात, तांत्रिक ज्ञान व आर्थिक बाबी, दळणवळण इ. व्यवहारांसाठी गाबाँने करार केले आहेत. सप्टेंबर १९६० मध्ये गाबाँला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश मिळाला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांशी संबंधित बहुतेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्यत्वही त्याला मिळाले आहे.
फेब्रुवारी १९५९ मध्ये गाबाँने आपले संविधान तयार केले. ते १९६० आणि १९६१ मध्ये दुरुस्त करण्यात आले. त्याच्या प्रस्तावनेतच मानवी हक्कांची घोषणा करण्यात आली असून, प्रत्येक नागरिकांस व्यक्तिस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य व शिक्षणस्वातंत्र्य यांची हमी देण्यात आली आहे.
सार्वभौम सत्ता जनतेच्या हाती असून, आपल्या प्रतिनिधींमार्फत अगर सार्वमताच्या मार्गाने जनता आपला अधिकार वापरू शकते. सरळ, सार्वत्रिक व गुप्त मतदान पद्धतीची स्वीकार करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्षाची निवडणूक सरळ मतदानाने सात वर्षांकरिता करण्यात येते.
राष्ट्राध्यक्ष ह्या नात्याने तो संपूर्ण शासनाचा प्रमुख असतो व संरक्षक दलांचाही तो मुख्य असतो. आपल्या मंत्र्यांच्या अगर विधिमंडळातील नेत्यांच्या सल्ल्याने राष्ट्राध्यक्ष कोणताही प्रश्न सार्वमताला टाकू शकतो.
१९६७ मध्ये उपाध्यक्षांच्या निवडणुकीची तरतूद करण्यात आली. मंत्र्यांची नेमणूक राष्ट्राध्यक्षच करतो व ते त्यालाच जबाबदार असतात. याशिवाय संविधानाने मान्य केलेल्या न्यायमंडळ, आर्थिक व सामाजिक मंडळ आणि लवादमंडळ यांच्याही नेमणुका राष्ट्राध्यक्ष करतो.
राष्ट्रीय विधिमंडळात ४७ सभासद असतात आणि त्यांची निवडणूक सार्वत्रिक, प्रौढ, गुप्त मतदान पद्धतीने सात वर्षांच्या मुदतीसाठी होते. ही सभा बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षास आहे. परंतु २o ते ४o दिवसांत नवीन निवडणुका घ्याव्या लागतात. राष्ट्रीय विधिमंडळाने पाठविलेला कोणताही कायद्याचा मसुदा फेरवाचनासाठी राष्ट्रीय विधिमंडळाकडे पाठविण्याचा राष्ट्राध्यक्षाला अधिकार आहे. अशा प्रसंगी २/3 बहुमताने त्याला संमती मिळावी लागते.
१९६० च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांपैकी कोणासच बहुमत न मिळाल्यामुळे १९६१ मध्ये दोघांनीही एकच उमेदवार यादी मान्य केली. तिला ९९% मते मिळाली. डेमोक्रॅटिक पक्षाचा लीआँ म्बा हा अध्यक्ष आणि दुसऱ्या पक्षाचा प्रमुख औबामे परराष्ट्रमंत्री झाला. १९६३ साली औबामेच्या पक्षाने अधिकारपदे सोडली.
१९६४ च्या निवडणुकांच्या वेळी लष्करी रक्तहीन क्रांती झाली. परंतु फ्रेंच सरकारने लक्ष घालून लोकांनी निवडलेले सरकार पुन्हा प्रस्थापित केले.
लीआँ म्बा पुन्हा अध्यक्ष झाला. १९६७ मध्ये लीआँ म्बा अध्यक्ष व बाँगो उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. त्याच वर्षी लीआँ म्बा मरण पावला आणि बाँगो अध्यक्ष झाला.१९६८ पासून त्याचा डेमोक्रॅटिक पक्ष हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे. गाबाँचे ९ शासकीय विभाग व त्यांचे २८ जिल्हे आहेत; ३ कारभार केंद्रे आहेत. काही ठिकाणी टोळी-प्रमुखांकडे थोडी सत्ता आहे; परंतु ती कमी कमी होत आहे.
लीब्रव्हिल व पॉर झाँती येथे निवडलेल्या महापौरांच्या अधिकाराखालील नगरपालिका आहेत.ओयेम, बीटाम, म्वेला व लांबारेने येथील नगरपालिका निवडलेल्या व नेमलेल्या सभासदांच्या आहेत.
न्यायदानासाठी देशात एक सर्वोच्च न्यायालय आहे. त्याखेरीज एक संसदीय न्यायालय आहे. त्याचे सभासद राष्ट्रीय सभेतून निवडले जातात व त्यांना राष्ट्राध्यक्ष व इतर मंत्र्यांची चौकशी करण्याचा अधिकार आहे. वरिष्ठ न्यायालय अपील न्यायालया खालची न्यायालये इ आहेतच.
संरक्षणाच्या दृष्टीने कार्यक्षम अशी संरक्षक दले उभारण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याखेरीज फ्रान्सबरोबर लष्करी मदतीसाठी करारही अस्तित्वा त आहे. ९०० सैनिकांचे सेनादल आणि ५० सैनिकांचे हवाईदल आहे.
गाबाँमध्ये नैसर्गिक संपत्ती विपुल असल्याने व्यापारात निर्यात मालाचे प्रमाण आयातीपेक्षा पुष्कळ अधिक असते.स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत गाबाँची अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी त्याच्या वनसंपत्तीवरच अवलंबून असे. परंतु अलीकडे खनिजसंपत्तीही मोठ्या प्रमाणावर मिळू लागली आहे.
अशुद्ध तेल उत्पादनात गाबाँचा आफ्रिकेत पाचवा क्रमांक अlहे. दक्षिणेकडील म्वांदाजवळील मँगॅनीजक्षेत्र जगातील समृद्ध मँगॅनीज साठ्यांपैकी एक समजले जाते. ईशान्य भागातील मेकांबोजवळ लोखंडसाठT असून सोने व युरेनियमाचा साठाही मौल्यवान आहे.
लोखंड, मँगॅनीज, युरेनियम, खनिज तेल, पोटॅश इ. खनिजांच्या उत्पादनाबरोबरच विषुववृत्तीय फ्रेंच आफ्रिकेतील सर्व राज्यांना उपयुक्त होईल, एवढा मोठा तेलशुद्धीकरण कारखाना पॉर झाँती येथे सुरू करण्यात येणार आहे. तथापि अजूनही ओकूमे व इतर इमारती लाकडाच्या निर्यातीस महत्त्वाचे स्थान आहे.
शेती उत्पादनात ७५ % कामकरी गुंतलेले असून कॉफी, कोको व तांदूळ ही पिके प्रमुख आहेत. त्यांखेरीज मका, केळी, कसावा, तारो, रताळी व सुरण यांचेही मोठे उत्पन्न येते. मात्र बरीच शेती निर्वाहापुरती आहे. निर्यातीसाठी शेतीची वाढ केली जात आहे.
नदीकाठी व लहान तळ्यांतून मच्छीमारीचा धंदाही चालतो. गाबाँमध्ये त्से त्से माशीचा उपद्रव असल्यामुळे पशुधन म्हणण्यासारखे नाही.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/27/2019
मेनाम चाऊफ्राया : थायलंड देशातील मुख्य नदी. लांबी ...
वर्धा नदी : महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशातू...