तीन उत्तर-दक्षिण पर्वतमालिकांनी या राज्याचे अगदी वेगवेगळ्या स्वरूपाचे तीन भाग केलेले आहेत. पॅसिफिक किनाऱ्याला लागून ५० ते ८० किमी. पसरलेले ४६५ ते ६२० मी. उंचीचे गद्र वनाच्छादित कोस्ट रेंज व क्लॅमथ पर्वत असून त्यांना मधून मधून छेदणाऱ्या नद्यांच्या दऱ्यांनी हा भाग दुर्गम बनविला आहे. या पर्वतांच्या पूर्वेस २४० किमी. लांबीचे आणि सु. ५० किमी.रुंदीचे अत्यंत सुपीक विलेमिटचे दक्षिणोत्तर नदीखोरे आहे. हे सपाट आणि पाण्याने समृद्ध असून याच्या पूर्वेस कॅस्केड पर्वतश्रेणी म्हणजे ८० ते १६० किमी. रुंदीचे एक उंच डोंगराळ पठार आहे. यात २,८४५ ते ३,४८१ मी. उंचीच्या प्राचीन ज्वालामुखी-शिखरांची रांग व निविड वनप्रदेश आहे.
रेनिअर, हूड, जेफर्सन, थ्री सिस्टर्स ही प्रसिद्ध शिखरे व नितळ पाण्याकरिता प्रसिद्ध असलेले क्रेटर सरोवर याच भागात आहे. या पठाराच्या पूर्वेस ऑरेगनचा ६६% प्रदेश असून तो उत्तरेकेडे उतरत गेलेला आहे. त्याचा उत्तर भाग सुपीक जमिनीचा, तर दक्षिण भागात वाळवंट व सु. अडीच हजार मी. उंचीचे स्टीन्स, वॉलौआ, यूमाँटीला, हार्ट इ. पर्वत आहेत. राज्याच्या पूर्व सीमेवरील स्नेक नदीची दरी काही भागात १,५५० मी. खोल आहे. खनिजांपैकी निकेल उत्पादनात राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो. पारा, तांबे, शिसे, सोने, युरेनियम, क्रोमाइट या धातूंचेही साठे राज्यात आहेत. तथापि सर्वाधिक उत्खनन रेती, वाळू, इमारती दगड, जिप्सम्, शाडू अशा खनिजांचे होते.
उत्तर सीमेची कोलंबिया, तिला पूर्वसीमेवरून येऊन मिळणारी स्नेक व कोलंबियाच्या मुखापासून २०८ किमी. वर कोलंबियाला मिळणारी विलेमिट व डेश्यूट या येथील मुख्य नद्या होत. कॅस्केड पर्वतात कोलंबियानेही एक भव्य कॅन्यन कोरून काढली आहे. इतर किरकोळ नद्या पठारावरून उत्तरेकडे कोलंबियाला व कोस्ट रेंजमधून निघून पश्चिमेस पॅसिफिकला मिळतात. कोलंबिया नदी ठिकाठिकाणी अडवून विजेसाठी व पाटबंधाऱ्यांसाठी धरणे बांधली आहेत. त्यांतील सर्वांत मोठे बॉनव्हिल येथे आहे. राज्यातल्या अनेक सरोवरांपैकी दक्षिण-मध्य विभागात एका निद्रिस्त ज्वालामुखीच्या विवरातले क्रेटर लेक व त्याहून मोठे लेक अपर क्लॅमथ प्रेक्षणीय आहेत.
वाळवंट प्रदेशातील सरोवरे खारी व उन्हाळ्यात आटून जाणारी आहेत. ऑरेगनच्या समुद्रकिनाऱ्यालाच कोस्ट रेंज पर्वत असल्यामुळे किनारा सलग असून त्यात रेतीच्या तुरळक पुळणी व ठिकठिकाणी खडकाळ बेटे दिसतात. किनारभागात हवामान सौम्य, आर्द्र व साधारण समशीतोष्ण असून विलेमिट खोऱ्यातही हवामान सौम्य परंतु पाऊस किनाऱ्याच्या मानाने निम्मा पडतो. कॅस्केड पर्वतावर भारी हिमवर्षाव होतो. अंतःप्रदेशीय पठारावर तपमान कालानुसार अतिउष्ण व अतिशीत असते. पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो.
पाऊस नोव्हेंबर ते जानेवारी पडतो. किनारभागात वार्षिक सरासरी पर्जन्य २०० सेंमी.असून ग्लोनोरा येथे देशातील सर्वाधिक पाऊस ३२५ सेंमी. पडतो. राज्याचे सरासरी तपमान १२.८० से. आहे. राज्यातील जवळजवळ निम्मा प्रदेश वनाच्छादित आहे. वृक्षांच्या अनेक जातींपैकी डगलस फर, सितका स्प्रूस, व्हाइट व पाँडेरोझा पाइन, सीडर, रेडवुड या विशेष आणि विपुल आहेत. राज्याची एक तृतीयांश भूमी कृषि-उद्योगाला उपयुक्त असून बाकीच्या कमी पावसाच्या भागांत चराईला उपयुक्त विविध जातीचे गवत उगवते. काळे व उदी अस्वल, कित्येक जातीचे हरिण, लांडगा, कोल्हा, खोकड, रानमांजर, चित्ता, ससा,खार, चिपमंक, बीव्हर, बॅजर हे प्राणी; पेलिकन, कॉर्मोरंट, गल, करकोचा, बदक इ. पाणपक्षी; किनाऱ्याला व नद्यांत सॅमन, ट्यूना,कॉड, हॅलिबट, सार्डिन, तसेच कवचीचे जलचर, खेकडा, कालव, चिंगाटी इ. मिळतात.
१५४३ मध्ये स्पेनचा फेरेलो आणि १५७९ साली इंग्रज सर फ्रान्सिस ड्रेक या दर्यावर्दी शोधकांनी ऑरगनचा किनारा पाहिला असला, तरी नंतर दोन शतके यूरोपीयांचा संपर्क इकडे झालेला दिसत नाही. १७७८ मध्ये इंग्रज कॅप्टन कुक या किनाऱ्याच्या अॅल्सी नदीमुखापाशी आला होता. १७८८ मध्ये कॅप्टन ग्रे या अमेरिकन नाविकाने प्रथम या भूमीवर उतरून इंडियनांशी केसाळ कातड्यांसाठी बोलणी केली. १७९२ मध्ये तो पुन्हा आला तेव्हा आपल्या जहाजाचे कोलंबिया हे नाव येथील नदीला देऊन त्याने त्या मुलुखावर आपल्या देशाच्या हक्काचा मुहूर्त केला. १८०५ मध्ये पूर्वेकडून सेंट लूइसहून निघालेले ल्यूइस व क्लार्क यांची संशोधनमोहीम कोलंबिया नदीमुखाजवळ पोहोचली.
१८११ साली अॅस्टोरिया येथे केसाळ कातड्यांच्या व्यापारासाठी पहिले अमेरिकन ठाणे वसले. पण पुढल्याच वर्षी ब्रिटनशी लढाई सुरू झाल्यामुळे ते ठाणे कॅनडाच्या कंपनीला विकण्यात आले. लौकरच ऑरेगन प्रदेशावर अमेरिका, ब्रिटन, स्पेन व रशिया ही चार राष्ट्रे हक्क सांगू लागली. १८१९ मध्ये स्पेनने व १९२४ मध्ये रशियाने आपले हक्क सोडले. १८१८ मध्ये ब्रिटन-अमेरिकेने जोडीने या प्रदेशाचा कारभार पाहाण्याचा झालेला करार १८२७ मध्ये पुन्हा करण्यात आला. नंतरच्या काळात अमेरिकन मिशनरी व वसाहतकरी पूर्वेकडून येऊन विलेमिट खोऱ्यात व कोलंबिया पठारावर स्थायिक होत होते आणि त्यांची संख्या १८४३ पर्यंत खूपच वाढली होती.
१८४४ मध्ये या लोकांनी शांपोएग येथे एक परिषद भरवून तात्पुरती शासनव्यवस्था स्वीकारली. १८४४ मध्येच ऑरेगनची मालकी अमेरिकेने घ्यावी, अशी देशभर चळवळ झाली आणि १८४६ मध्ये ब्रिटनशी तडजोड होऊन ऑरेगन व ब्रिटिश कॅनडा यांच्या दरम्यान एकूणपन्नासावे अक्षवृत्त ही सीमा ठरली.
१८४८ साली इंडियनांच्या उपद्रवापासून बचावासाठी ऑरेगनला प्रदेशाचा दर्जा मिळाला. १८५० मध्ये राष्ट्रसंसदेने इकडे येऊन राहाणारांस मोफत जमिनी देऊ केल्याने येणारे लोक इतके वाढले, की १८५३ साली उत्तरेचा भाग वॉशिंग्टन प्रदेश म्हणून अलग होऊन ऑरेगन प्रदेश सध्याच्या स्वरूपात उरला. त्याला राज्य म्हणून राष्ट्रात १८५९ मध्ये प्रवेश मिळाला. १८८३ साली या राज्यात खंडपार लोहमार्ग येऊन पोहोचला. मोडोक, पायूट व नेझ पर्से या इंडियन जमाती आपल्या जमिनींवर होत असलेल्या आक्रमणाविरुद्ध १८७३ पासून प्रतिकार करीत होत्या; पण १८७८ पर्यंत तो प्रतिकार मोडून काढण्यात आला.
१८९२ ते १९१२ पर्यंत या राज्याने लोकांना देशाच्या राजकारणात प्रत्यक्ष भाग असावा यासाठी पुढाकार घेतला व इतर राज्यांनाही स्फूर्ती दिली. ऑरेगन योजनेत संविधानासंबंधी मतदारांना प्रत्यक्ष उपक्रमाधिकार, जनमत-निर्देश व प्रत्यावाहन अशा अधिकारांची मागणी होती. या राज्याने देशात प्रथमच कामाच्या तासांवर मर्यादा,स्त्रिया व मुले यांच्या श्रमांवर नियंत्रण, असे प्रगतिशील कायदे केले.
१९१२ मध्ये स्त्रियांस मताधिकार मिळाला. दुसऱ्या महायुद्धात बॉनव्हिल धरणावर वीजनिर्मिती सुरू झाल्यावर औद्योगिकीकरणाला मोठीच चालना मिळाली. गोद्या व आगबोटींच्या कारखान्यांत झापाट्याने कामे होऊ लागली. युद्धसाहित्याचे कारखाने युद्धोत्तर जीवनोपयोगी माल बनवू लागले. कोलंबिया नदीवरील नव्या नव्या धरणांची वीज उपलब्ध झाल्यावर राज्याची आर्थिक स्थिती आणखी सुधारेल अशी अपेक्षा आहे.
बऱ्याच वेळा सुधारलेल्या १८५७ च्या संविधानान्वये कार्यकारी सत्ता चार वर्षांसाठी निवडलेले गव्हर्नर व सहा खातेप्रमुख यांच्याकडे असते. पाळीपाळीने ४ वर्षांसाठी निवडलेल्या ३० सभासदांचे सीनेट व दोन वर्षांसाठी निवडलेल्या ६० सदस्यांचे प्रतिनिधिगृह, या विविधमंडळांची अधिवेशने राजधानी सेलम येथे विषमांकी वर्षी भरतात. सर्वोच्च न्यायालयावर सहा वर्षांसाठी निवडलेले सात न्यायमूर्ती असतात. राज्यातर्फे राष्ट्रसंसदेवर दोन सीनेटर व चार प्रतिनिधी निवडून जातात.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/19/2020
राज्याचा बहुतेक भाग कोलंबिया नदीक्षेत्रात असून फक्...