অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उझबेकिस्तान

सोव्हिएट संघराज्यांपैकी एक संघराज्य. क्षेत्रफळ ४,४७,६०० चौ. किमी.; लोकसंख्या १,२५,००,००० (१९७२). याच्या उत्तरेस कझाकस्तान, पूर्वेकडे किरगीझिया व ताजिकिस्तान ही संघराज्ये, दक्षिणेस अफगाणिस्तान व पश्चिमेकडे तुर्कमेनिस्तान आहे. ताश्कंद ही उझबेकिस्तानची राजधानी आहे.

भूवर्णन

उझबेकिस्तानचा पुष्कळसा प्रदेश वाळवंटी व मैदानी आहे. उझबेकिस्तानच्या आग्‍नेय भागात तिएनशान व पामीर-आलाय पर्वतांचे फाटे घुसलेले असून त्यात सिरदर्याच्या फरगाना खोऱ्याचा समावेश होतो. हे खोरे ३२० किमी. लांब असून ११० किमी. रुंद आहे. तसेच अफगाणिस्तानच्या सरहद्दीपासून अमुदर्या नदीच्या तीराने वायव्येकडे अमुदर्या नदीच्या दोहो बाजूंस असलेले काराकाल्पाक स्वायत्त प्रजासत्ताक, त्याच्या पूर्वेस किझिलकुम वाळवंटाचा पश्चिम भाग व अरल समुद्र आणि कॅस्पियन समुद्र यांच्यामध्ये २०० ते ३०० मी. उंचीवर असलेल्या उश्तउर्तच्या पठाराचा पूर्वभाग यांचाही समावेश उझबेकिस्तानमध्ये होतो. किझिलकुम वाळवंट अरल समुद्र व डोंगर-पायथ्याच्या दरम्यान सु. ४८० किमी. पसरलेले आहे. हा भाग सर्वसाधारणपणे २०० मी. पर्यंत उंच असून त्यात मधूनमधून लहानलहान टेकड्या आहेत. संघराज्याचा बाकीचा भाग हा बहुतेक डोंगराच्या सोंडा व दऱ्या यांनी व्यापलेला आहे. या राज्यात अमुदर्या  ही एकच नदी बारमाही वाहणारी आहे. वितळणाऱ्या बर्फामुळे या नदीला पूर येत असल्यामुळे उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील नदीच्या पात्रात बराच मोठा फरक जाणवतो. ह्या नदीने आणलेल्या गाळामुळे रुंद पूरमैदान तयार झाले आहे व त्यामुळे नदीचा प्रवाह नेहमी बदलत असतो. ह्या नदीच्या त्रिभुज प्रदेशाला नुकूस या काराकाल्पाकच्या राजधानीपासून सुरुवात होते. ताश्कंदच्या वायव्येकडील चत्काल डोंगरात उगम पावलेल्या चिरचिक व अँग्रेन या नद्या पुढे सिरदर्या नदीस जाऊन मिळतात. दक्षिणेकडे डोंगरपायथ्यापर्यंत एक लांबच लांब लोएस मातीचा पट्टा आढळतो. फरगाना खोऱ्याच्या बाजूला डोंगर उतारावर जमलेल्या दगडगोट्यांवर बारीक मातीचा थर असलेली जमीन आहे व खोऱ्यात लोएस जातीची वाळू व सिरदर्या नदीने आणून टाकलेल्या गाळाने झालेली जमीन आहे. या प्रदेशास पाणीपुरवठा करणारे झरे  आलाय पर्वतात व त्याचाच भाग असलेल्या तुर्कस्तान पर्वतरांगांमधून उगम पावतात. या प्रदेशाचे हवामान खंडांतर्गत प्रकारचे आहे. हिवाळे तीव्र असून जानेवारीतील सरासरी तपमान – २० से. असते. उन्हाळे कडक असून जुलैतील सरासरी तपमान २७० सें. ते ३०० से. असते. डोंगरांनी वेढलेल्या भागात तपमानाची विपरीतता, अतिशय तीव्र हिवाळे व अतिशय कडक उन्हाळे अशी परिस्थिती आढळून येते. हिवाळ्यात तिएनशान पर्वतावरून वाहणाऱ्या फॉन वाऱ्यांमुळे हवेत थोडा उबदारपणा येतो. दक्षिणेकडे टरमेझ या ठिकाणी वर्षातील ७० दिवस अफगानेट नावाचे अतिशय थंड पण धुळीने भरलेले वारे हिवाळ्यात मध्य आशियाच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात. वाळवंटी प्रदेशापासून बर्फाळ प्रदेशापर्यंत सर्व प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. पॉप्लर, झाऊ, विलो, ऑलिव्ह, ज्यूनिपर, जर्दाळू, अक्रोड, मॅपल या त्यांतील काही प्रमुख होत. वाघ, चित्ता, रानबकरी, रानमेंढा, तरस, हरिण, कोल्हा, पाली, सरडे व अनेक जातीचे कीटक या राज्यात आढळतात.

इतिहास व राजकीय स्थिती

सु. सहाव्या शतकानंतर तुर्की लोकांच्या भटक्या टोळ्यांनी या प्रदेशात प्रवेश केला. नवव्या शतकात अरब लोक या प्रदेशात आले व बाराव्या शतकात या प्रदेशावर तुर्की लोकांची सत्ता सुरू झाली. पश्चिमेकडून पूर्वेकडील देशांकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर या राज्यातील भाग असल्याने या प्रदेशाचा विकास होत राहिला. १२२० मध्ये या प्रदेशावर चंगीझखानाने अनेक स्वाऱ्या केल्या. १३७० मध्ये तैमूरलंगाने स्वारी करून या राज्यामधील समरकंद येथे त्याने आपली राजधानी वसवली. सोळाव्या शतकापासून येथील तुर्की-मंगोल लोक उझबेक या नावाने ओळखले जाऊ लागले. रशियन सैन्याने १८६५ साली समरकंद व बुखारा आणि १८७३ साली कीएफ ताब्यात घेऊन रशियन साम्राज्याची सुरुवात केली. १९१७ मध्ये काही मुस्लिम उझबेकी नेत्यांनी राज्य स्थापण्याचा प्रयत्‍न केला. पण तो मोडून काढण्यात आला. १९२४ मध्ये रशियाच्या तुर्कस्तान प्रदेशातून उझबेकिस्तान वेगळा करण्यात आला आणि उझबेकिस्तानमध्ये ताजिकिस्तान हा एक स्वायत्त प्रांत होता. १९२५ मध्ये ताजिकिस्तान वेगळा करण्यात आला आणि उझबेकिस्तान रशियन संघराज्याचा एक घटक बनले. १९३६ व १९५६ मध्ये यात आणखी काही प्रदेशाची भर पडली. १९३७-३८ मध्ये काही राष्ट्रवाद्यांनी रशियाविरुद्ध कट रचला, पण तो फसला. रशियन संविधानाच्या धर्तीवरच येथील राज्यव्यवस्था आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या हाती सर्वाधिकार असून तोच एकमेव पक्ष आहे. सार्वभौम म्हटले जात असले, तरी राज्याच्या वकिलाती दुसरीकडे नाहीत अथवा स्वतःची संरक्षणव्यवस्था नाही. राज्याच्या सुप्रीम सोव्हिएट या विधिमंडळावर १९७१ मध्ये ४५२ डेप्युटी निवडण्यात आले. त्यांपैकी १५१ स्त्रिया आहेत.

आर्थिक व सामाजिक स्थिती

उझबेकिस्तान शेतीप्रधान राज्य आहे. कापूस पिकविण्यात या राज्याचा रशियात पहिला व जगामध्ये तिसरा क्रमांक लागतो. अमुदर्या व सिरदर्या या नद्यांवर व तिच्या उपनद्यांवर कालवे बांधून राज्यातील बहुतांश जमीन पाण्याखाली आणली आहे. १९१३ साली सु. २२ लक्ष हेक्टर जमीन लागवडीखाली होती. ती १९७१ साली ३४ लक्ष हेक्टर झाली आहे. कापूस, ताग, गहू, भात, बार्ली, तंबाखू, तीळ, ऊस, बटाटे, फळफळावळ आणि रेशमासाठी तुती ही येथील पिके होत. यांशिवाय डोंगराळ व निमओसाड भागांत गवताची लागवड केली जाते. रशियाच्या एकूण कापसाच्या ६७% कापूस, ५०% भात व ६०% ल्यूसर्न गवत या राज्यात होते. शेतीखालोखाल मेंढपाळी हा येथील महत्त्वाचा धंदा. काराकुल ही मेंढीची जात येथीलच. समरकंद येथे काराकुलाच्या शास्त्रीय अभ्यसासाठी एक संख्या काढली असून रशियाला लागणाऱ्या मेंढीच्या कातड्यांपैकी ३३% कातडी हे राज्य पुरविते. रशियातील निम्म्या रेशमाचे कोशही उझबेकिस्तानमधून गेलेले असतात. मनुका आणि जर्दाळू यांबाबतीतही रशियात या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. अमुदर्यामध्ये विपुल मत्स्यसंपत्ती आहे. तेल (फरगाना खोरे), कोळसा (अँग्रेन खोरे), नैसर्गिक वायू (बुखारा), ओझोसेराईट, जस्त, तांबे, अँटिमनी, सोने इत्यादीही येथे सापडतात. तांब्याच्या साठ्यात रशियामध्ये या राज्याचा तिसरा क्रमांक आहे. राज्यात १,६०० लहानमोठे कारखाने आहेत. त्यात सिमेंट, धातुकाम, शेती-उपयोगी अवजारे, कातडीकाम, कागद, कापड, कपडे, तेलशुद्धी, गंधक, रसायने इत्यादींचा समावेश होतो. पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले भरतकाम, गालिचे आणि हस्तव्यवसाय राज्यात आजही प्रगत आहेत. येथे जवळजवळ ८०० विद्युत्‌केंद्रे असून ६० टक्के वीज पाण्यापासून मिळते. १९७१ मध्ये २० लक्ष किवॉ. चे ताश्कंदचे वीज-केंद्र उभारले गेले. १९७१ मध्ये २,१३० कोटी किवॉ. तास विजेचे व ३,३६५·३ कोटी घ. मी. नैसर्गिक वायूचे उत्पादन झाले. १९७१ साली राज्यात ३,००० किमी. लोहमार्ग, २९,५०० किमी. सडका व १,२०० किमी. अंतर्गत जलमार्ग होते. हवाईमार्गांनी राज्यातील प्रमुख शहरे जोडलेली असून ताश्कंदला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ताश्कंद येथे नभोवाणी व दूरचित्रवाणीचेही केंद्र आहे. १९७१-७२ मध्ये राज्यातील ९,२३४ प्राथमिक व माध्यमिक शाळांत ३४ लक्ष विद्यार्थी होते. १९७१ मध्ये ४,२२० पूर्व प्राथमिक संस्थांतून ४ लाखांहून अधिक मुले होती. यांशिवाय येथे ३८ उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांतून २·३४ लक्ष विद्यार्थी व १६८ तंत्रसंस्थातून १·६७ लक्ष विद्यार्थी होते. ताश्कंद व समरकंद येथे विद्यापीठे असून उझबेक शास्त्र अकादमी महत्त्वाची समजली जाते.

उझबेकिस्तानमधील लोकसंख्येत ६५% उझबेक असून त्यांपैकी पुष्कळसे मुस्लिम सुन्नी पंथाचे आहेत. मध्ये आशियातील मूळचे हे टोळीवाले भटके लोक;शेती संपल्यानंतर कळप घेऊन डोंगरावर मेंढपाळी करण्यासाठी हे जात; टोळ्यांनी रहात. म्हणूनच रशियन अंमलाखाली येण्यापूर्वी येथे बरीच राज्ये होती. रशियन अंमलानंतर व कालवे झाल्यानंतर याच लोकांनी उझबेकिस्तान समृद्ध केले. यांच्याशिवाय राज्यात रशियन १२·५%, मध्य आशियाई १०·७%व तार्तर ४·९% होते. ३७% लोक शहरात राहतात. राज्यात रशियन व उझबेक या अधिकृत भाषा आहेत. उझबेक भाषा तुर्की गटातील असून त्यातील जगताई राज्यातील बऱ्याच लोकांची भाषा होती. ती पूर्वी अरबी लिपीत लिहीत; १९२७ नंतर ही भाषा रोमन व १९४० नंतर ती सिरिलिक लिपीत लिहू लागले. राज्यात उझबेकीशिवाय काराकाल्पाक व ताजिक भाषाही बोलल्या जातात. पंधराव्या शतकातील अली शेर नवाई हा उझबेकिस्तानमधील सर्वश्रेष्ठ कवी. विसाव्या शतकात सांस्कृतिक विकासाचे प्रयत्‍न झाले असून नृत्य, संगीत, नाट्य, यांबाबतीत लोक अग्रेसर आहेत. इस्लामी कालखंडातील काही उत्कृष्ट कलाकाम या राज्यात पहावयास मिळते. बुखारा (त्यावेळेस मक्केखालोखाल पवित्र), समरकंद, ताश्कंद ही त्यावेळची भरभराटलेली शहरे. अमुदर्या, सिरदर्या यांच्याकाठी ऋग्वेदकालीन अवशेष आढळले आहेत. ताश्कंद हे लालबहादूर शास्त्रींमुळे भारतीयांना पवित्र बनले आहे. रशियन संघराज्यात असूनही वेगळे वैशिष्ट्य असलेले हे राज्य आहे.

लेखक :ज.ब.कुमठेकर  ; र.रू.शाह

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate