অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्‍लंड

इंग्‍लंड

युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड या देशाचा एक घटक. भौगोलिक दृष्ट्या ग्रेट ब्रिटनचे इंग्‍लंड, वेल्स व स्कॉटलंड असे तीन विभाग पडतात. इंग्‍लंड हा दक्षिणेकडील सर्वांत मोठा विभाग. क्षेत्रफळ १,३०,३६० चौ. किमी.; लोकसंख्या ४,५८,७०,०६२ (१९७१); विस्तार ५० उ. ते ५५४८’ उ. व १ ४५' पू. ते ६ १८' प.; जास्तीत जास्त दक्षिणोत्तर अंतर ५१८ किमी. व पूर्वपश्चिम अंतर ३२५ किमी.

इंग्‍लंडच्या पश्चिमेस वेल्स आणि आयरिश समुद्र, उत्तरेस स्कॉटलंड, पूर्वेस उत्तर समुद्र आणि दक्षिणेस अटलांटिक महासागर व इंग्‍लिश खाडी आहेत. यूरोपखंडापासून इंग्‍लंड इंग्लिश खाडीने विभक्त झालेले आहे. इंग्‍लंडमधील डोव्हर व फ्रान्समधील कॅले यामधील अंतर फक्त ३४ किमी. आहे.

भूवर्णन

इंग्‍लंडचे क्षेत्र लहान असूनही त्यात बहुतेक सर्व भूवैज्ञानिक कालखंडांतील प्रस्तर आढळतात. त्यांची रचना जटिल स्वरूपाची आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात आर्कियन व पुराजीवकालीन खडक असून दऱ्यांखोऱ्यांतून कार्बोनिफेरस खडक आहेत. तसेच आग्नेयीकडील सखल भागाच्या उत्तरेकडे कार्बोनिफेरस खडक आढळतात. कार्बोनिफेरस खडकांत कोळशाचे मोठे साठे आहेत. सखल प्रदेशातील अर्वाचीन खडक कमजोर आहेत. त्यांत खडूच्या आणि चुनखडकाच्या टेकड्या आहेत. त्यांची उंची ३०० मी. पेक्षा अधिक नाही. हिमयुगात इंग्‍लंडचा सर्व भाग हिमाच्छादित होता.

हिमयुगातील घडामोडींचा मोठा परिणाम ब्रिस्टलची खाडी व टेम्स नदी यांना जोडणाऱ्या रेषेच्या उत्तरेकडील भागात दिसून येतो. तेथे वायव्येकडील डोंगराळ भागात या घडामोडींमुळे सरोवरे तयार झाली आहेत. त्या भागालाच लेक डिस्ट्रिक्ट नाव पडले आहे. हिमयुगाच्या अखेरीस बर्फ वितळून तळखडक उघडे पडले आणि प्रवाहाबरोबर वाहून गेलेली माती (बोल्डर क्ले) व वाळू सखल प्रदेशात पसरली गेली व तो भाग सुपीक झाला; तसेच पूर्वीच्या जलोत्सारणात व्यत्यय येऊन निर्माण झालेल्या सरोवरांपैकी बरीच सरोवरे आता कोरडी पडून तेथे सुपीक प्रदेश तयार झाला आहे.

स्वाभाविक दृष्ट्या इंग्‍लंडचे दोन भाग पडतात: ईशान्येकडील टाईन नदीच्या मुखापासून नैऋत्येस एक्स नदीच्या मुखापर्यंत कल्पिलेल्या रेषेच्या पूर्वेकडील सखल प्रदेश व बाकीचा सर्व डोंगराळ प्रदेश. सखल प्रदेशातून वाहणाऱ्या टाईन, टीझ, ऊझ, ट्रेंट, हंबर व टेम्स या नद्यांची खोरी सुपीक असून त्यांच्या मुखांशी खाड्या व प्रसिद्ध बंदरे आहेत. इंग्‍लंडच्या सखल प्रदेशाभोवती विविध भूस्वरूपे आढळतात. या भागांत काही ठिकाणी (उदा., डोव्हर येथे) चुनखडकांचे तुटलेले कडे आढळतात, तर काही ठिकाणी (उदा., वाइट बेटात) पांढुरक्या चुनखडकांचे सुळके दिसून येतात. इंग्‍लंडच्या दक्षिण व आग्नेय समुद्रिकनाऱ्यांवर वाळूच्या पुळणी तयार झाल्या आहेत हंबर नदी व टेम्स नदीची खाडी यांदरम्यानच्या इंग्‍लंडच्या पूर्व किनाऱ्याचा प्रदेश फारच सखल आहे.

डोंगराळ भागात उत्तरेकडे पेनाइनचे डोंगर दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पृष्ठभाग झिजून आतील कोळशाचे थर पृष्ठभागाजवळ सापडल्यामळे तेथे औद्योगिक वाढ झपाट्याने झाली. नैऋत्येकडील द्वीपकल्पाचा समावेश डोंगराळ भागातच होतो. या डोंगराळ प्रदेशाची उंची साधारणत: ३०० मी. हून अधिक आहे. मर्झी, सेव्हर्न, एक्स इ. नद्या या भागात आहेत. डोंगराळ भागाच्या प्राचीन खडकांचा विस्तार अनेक ठिकाणी समुद्रकाठापर्यंत झाला असल्याने त्या ठिकाणी उभे कडे तयार झाले आहेत. इतर ठिकाणी नद्यांच्या मुखांशी खाड्या बनल्या आहेत व त्यांलगत भूशिरे आहेत. इंग्‍लंडच्या सभोवतालचे समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी खाड्यांतून आत शिरते व ओहोटीच्या वेळी नद्यांनी वाहून आणलेला गाळ दूर समुद्रात नेऊन टाकते. यांमुळे नद्यांच्या खाड्यांवर नैसर्गिक बंदरे तयार झाली आहेत.

इंग्‍लंडभोवतालचा समुद्र उथळ आहे. सर्वसाधारणपणे त्याची खोली ९० मी. पेक्षाही कमी भरते. समुद्रकिनारा दंतुर असून त्याच्याजवळ सिली, लंडी, फाउलनेस, वाइट इ. अनेक बेटे आहेत. अथळ समुद्राचा उपयोग मत्स्योउत्पादनासाठी केला जातो. मासेमारीचे क्षेत्र या दृष्टीनेही त्यास महत्त्व प्राप्त झालेले आहे. पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या गल्फ प्रवाहाचे उबदार पाणी या उथळ समुद्रात चहूबाजूंस खूप पसरते व त्यामुळे लगतच्या भूप्रदेशाचे हवामानही उबदार होते. समुद्राच्या उथळपणामुळे भरतीच्या पाण्याच्या हालचालींचा परिणाम इंग्‍लंडच्या अंतर्भागात बराच आतपर्यंत जाणवतो.

हवामान

इंग्‍लंडचे हवामान सौम्य आणि समशीतोष्ण आहे. पश्चिमेकडून येणारे वारे व त्यांबरोबर येणारे आवर्त आणि पूर्वेकडील वाऱ्यांबरोबर येणारे प्रत्यावर्त यांमुळे येथील हवा सतत बदलत असते; मात्र येथील तपमानात फार मोठे बदल होत नाहीत. अटलांटिक महासागर व गल्फ प्रवाह यांचा परिणाम या प्रदेशाच्या हवामानावर प्रामुख्याने होतो. हवा थोडी उबदर असते. हिवाळ्यात मात्र पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही हवा कधी कधी थंड व कोरडी असते.

इंग्‍लंडच्या वायव्य भागी वार्षिक सरासरी तपमान ११ से. असते. त्याच अक्षवृत्तावर पूर्वेस ते कमी भरते दक्षिणेस इंग्लिश खाडीतील जर्सी बेटात तपमान हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी ) ६से. व उन्हाळ्यात १७ से. एवढे भरते. वार्षिक सरासरी तपमान कक्षा ७ ते १२ से. एवढे असते.

पूर्वेकडील प्रदेशात हे प्रमाण वाढते. दक्षिण भागात उन्हाळ्यात तपमान २७ से. पेक्षा वर क्वचितच जाते आणि ३२ से. वर ते सहसा चढत नाही. वर्षातील किमान तपमान स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. हिवाळ्यात रात्री आकाश निरभ्र व हवा शांत असल्यास ते -७ से. एवढे खाली जाते, -१२ से. पर्यंत ते क्वचितच खाली उतरते. मात्र आतापावेतो अपवादात्मक म्हणून -१८ से. इतक्या किमान तपमानाची नोंद केली गेलेली आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate