या खंडात मोरोक्को, अल्जीरिया, ट्युनिशिया, लिबिया, ईजिप्त, मॉरिटेनिया, माली, नायजर, चॅड, सूदान, इथिओपिया, सोमालिया, सेनेगल, गँबियी, गिनी, सिएरा लेओन, लायबीरिया, आयव्हरी कोस्ट, अपर व्होल्टा, घाना, टोगो, दाहोमी, नायजेरिया, कॅमेरून, मध्य आफ्रिका संघराज्य, विषुववृत्तीय गिनी, गाबाँ, झाईरे, काँगो प्रजासत्ताक, युगांडा, केन्या, रूआंडा, बुरूंडी, टांझानिया, झँबिया, मालावी, बोट्स्वाना, र्होडेशिया, दक्षिण आफ्रिका संघराज्य, स्वाझीलँड, लेसोथो हे स्वतंत्र देश; स्पॅनिश सहारा हा स्पेनच्या व पोर्तुगीज गिनी, अंगोला, मोझँबीक हे पोर्तुगालच्या आणि नैऋत्य आफ्रिका हा दक्षिण आफ्रिकेच्या अमलाखालील प्रदेश; मादागास्कर (मॅलॅगॅसी) व मॉरिशस ही स्वतंत्र बेटे, सेशेल, रॉड्रिगेस व सोकोत्रा ही ब्रिटनची, कॉमोरो व रीयून्यन ही फ्रान्सची, फर्नांदो पो, अन्नाबॉन व कानेरी ही स्पेनची आणि साऊं टोमे, प्रिन्सिपे, मादीरा व केप व्हर्द ही पोर्तुगालची बेटे यांचा समावेश होतो. अॅसेन्शन, सेंट हेलीना व ट्रिस्टन द कुना ही ब्रिटनची बेटेही दक्षिण अमेरिकेपेक्षा आफ्रिकेला अधिक जवळ आहेत.
आफ्रिकेच्या उत्तरेचा भूमध्यसागरतटावरील प्रदेश यूरोपीयांना दीर्घकाळपर्यंत माहीत होता; परंतु बाकीच्या बऱ्याच भागाशी पाश्चात्त्यांचा संबंध अगदी अलीकडचा आहे. येथील हिरे, सोने, तांबे, कोबाल्ट वगैरे मोल्यवान खनिजे व कापूस, कोको, पामबिया, पामतेल, शिसल, भुईमूग इ. कच्चा माल, येथील अरण्यांत मिळणारे लाकूड, येथील विविध प्राण्यांची शिकार व त्यांपासून मिळणारे हस्तिदंत, कातडी वगैरे किंमती पदार्थ यांमुळे या खंडातील शक्य तेवढा प्रदेश आपल्या अमलाखाली आपणम्याची यूरोपीय राष्ट्रांची एकोणिसाव्या शतकात मोठीच स्पर्धा लागली. मुळचे लोक मागासलेले असल्यामुळे त्यांना बाजूला सारून आपले वर्चस्व स्थापणे यूरोपीयांना सुलभ झाले.
दुसऱ्या महायुद्धानंतर पुष्कळशी स्वतंत्र आफ्रिकी राष्ट्रे अस्तित्वात आली. या नवोदित राष्ट्रांचे स्थिरापद होण्याचे व विकासाचे प्रयत्न व त्यांच्यापुढील समस्या, त्यांच्याकडून शक्य तेवढ्या सवलती व लाभ मिळविण्याचे पुढारलेल्या राष्ट्रांचे प्रयत्न, तेथे आपलीच हुकमत कायम ठेवण्याचा पोर्तुगालसारख्या देशांचा अट्टाहास आणि वर्णभेदावर आधारलेले दक्षिण आफ्रिका वा र्होडेशिया यांचे शासकीय धोरण यांमुळे या खंडाकडे लक्ष वेधले जात आहे. संयुक्त राष्ट्रांत आफ्रिकी राष्ट्रांच्या गटाचे सामर्थ्य जाणवू लागले आहे.
विस्ताराच्या मानाने आफ्रिकेत उंच पर्वत व सखल मैदाने कमी आहेत. २,५०० मी. पेक्षा उंच प्रदेश मर्यादित असून, ते एक तर प्रतिकारक्षम गिरिपिंड तरी आहेत नाही तर ज्वालामुखी शिखरे आहेत. १५० मी. पेक्षा कमी उंचीची सर्व भूमी किनाऱ्यापासून ८०० किमी. च्या आत आहे. फक्त सहारामधील दोन द्रोणीच याला अपवाद आहेत. आफ्रिकेचा दक्षिण व पूर्व भाग अधिक उंच असून उत्तर व पश्चिम भाग कमी उंच आहे. काँगो नदीच्या मुखापासून एडननच्या आखातापर्यंत एक रेषा मानली, तर तिच्या दक्षिणेस सर्व प्रदेश ३०० मी. हून अधिक उंच आहे. यापैकी बराच भाग ९०० मी. पेक्षाही अधिक उंच आहे. या भागात पुर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्याचा सखल प्रदेश कमी रुंद आहे. या रेषेच्या उत्तरेस बहुतेक प्रदेश १५० मी. ते ३०० मी. उंचीचा आहे. त्यात थोडासाच भाग ९०० मी. पेक्षा अधिक उंचीचा आढळतो. येथे वायव्य भाग व नाईल नदीच्या पलीकडील पूर्वेचा भाग सोडून बराचसा किनारी प्रदेश सखल व रुंद आहे. सर्वांत उंच व विस्तीर्ण प्रदेश इथिओपियात आहे. त्यापैकी काही १,५०० मी. पेक्षाही अधिक उंच आहे. दक्षिणेत पूर्व आफ्रिकेचे पठार केन्यामध्ये सर्वात उंच आहे. ते २,५०० मी. किंवा अधिकही उंच आहे. क्कचिच काही ज्वालामुखी शिखरे त्याहूनही उंच आहेत. उदा., किलिमांजारो (५,८९४ मी.), केन्या (५,१९९ मी.), म्वेरू (४,५६६ मी.), एल्गन (४,३८१ मी.); रूवेनझोरी (५,११९ मी.) हा मात्र ज्वालामुखी नाही.
पूर्व आफ्रिकेपासून दक्षिणेकडे परसलेल्या पठारावर कित्येके ठिकाणी विशेषतः ड्रेकन्सबर्ग पर्वतात पठाराच्या कडेपाशी उभे उतार आहेत. थाडेंटसोन्याने (सु. ३,५०० मी.) व माँटोसूर्स (३,२७६ मी.) येथे पठाराची कड विशेष उठून दिसते, कारण तेथील खडक कठीण असून त्यांचे थर आडवे क्षितिजसमांतर आहेत. इथिओपियातही पठारांच्या कडा व त्यांचे उतार नजरेत भरतात. सापेक्षतः मऊ व कमी प्रतिकारी खडकांच्या भागात पठारांचे उतार कमी स्पष्ट दिसतात. भूमिस्वरूपांचा एकसारखेपणा आणि तोचतोपणा हे आफ्रिकेतील मोठमोठ्या प्रदेशांचे वैशिष्ट्य आहे. सपाट व किंचित ऊर्मिल प्रदेश पुष्कळ टिकाणी आढळतात आणि ते पुष्कळ उंचावर असूनही कित्येकदा सखल मैदानी प्रदेशांसारखे वाटतात.
उत्तरेकडे व पश्चिमकडे काँगो, नायजर व नाईल यांच्या स्वोर्यांकडे आफ्रिकेच्या पठाराची उंची कमी होत जाते. ९०० मी. पेक्षा अधिक उंचीचे प्रदेश फक्त उत्तरेकडे अॅटलास पर्वतात व मध्य सहारातील अहॅग्गर व तिबेस्ती यांच्या ग्रॅनाइटी गिरिपिंडात आढळतात. पश्चिम आफ्रिकेच्या व कॅमेरूनच्या अंतर्भागातील उंच प्रदेश हे प्राचीन स्फटिकी खडकांचे असून, गिनीमधील फूटा जालन पठार, सिएरा लेओन व लायबीरिया यांची सरहद्द, नायजेरियातील जॉस पठार व अॅडामावा आणि कॅमेरून पठार येथेच फक्त त्यांची उंची अधिक आढळते. या बाजूस किनाऱ्याजवळ विस्तीर्ण सखल प्रदेश असून ते सेनेगल, गँबिया, व्होल्टा व नायजर-बेन्वे या नद्यांच्या खोर्यांतही आहेत. सूदानमधील ३,०५० मी. उंचीचा दारफुर प्रदेश व ४,०६९ मी. उंचीचा माँट कॅमेरून हे ज्वालामुखीजन्य असून, त्यांच्या निर्मितीस कारण झालेले भूपृष्ठातील ताण व पूर्व आफ्रिकेतील खचदऱ्या व ज्वालामुखीक्रिया यांच्या निर्मितीस कारण झालेले ताण एकच होत.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/10/2020
सुएझ कालव्याच्या मध्यभागी असलेले ईजिप्तचे महत्त्वा...
आफ्रिकेच्या उत्तरेचा भूमध्यसागरतटावरील प्रदेश यूरो...
मोरोक्कोच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील प्रदेश. क्षेत्...
कॅसाब्लांका : (अरबी अल् बीदा) मोरोक्कोचे अटलांटिक...