অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अदिस अबाबा

अदिस अबाबा

अदिस अबाबा

आफ्रिकेतील इथिओपिया देशाची राजधानी व प्रमुख शहर. लोकसंख्या ७,९५,९०० (१९७१). हे इथिओपियाच्या मध्यवर्ती पठारावर, दक्षिणेकडे असून समुद्रसपाटीपासून २,४३८ मी. उंचीवर आहे. भोवताली डोंगर आहेत. उन्हाळ्यात पडणारा पाऊस मुसळधार असतो. एरवी हवा अगदी सौम्य असते.

दुसऱ्या मेनेलिक राजाने १८८७ मध्ये या ठिकाणी नवीन राजधानी वसविण्याचे ठरविले आणि १८८९ मध्ये ती इंटोट्टोहन येथे आणली. त्याच्या राणीने या शहरात नाव ‘अदिस अबाबा’ ठेवले. आम्हारिक या त्यांच्या राष्ट्रभाषेत त्याचा अर्थ ‘नवे फूल’ असा होतो. राजाने या ठिकाणी निलगिरीच्या झाडांची भरपूर लागवड केली. ती  शहराच्या बाहेरच्या भागात असून त्यांपासून भरपूर प्रमाणात इमारती लाकूड मिळते. या राजाची मोठी कबर येथे आहे.

इटलीने १९३६ मध्ये इथिओपियावर आक्रमण केले व हा प्रदेश गिळंकृत केला. तेथील राजा हेले सेलासी पळून गेला. इटलीने या प्रदेशाची (इटालियन ईस्ट आफ्रिकेची) राजधानी या ठिकाणी ठेवली व शहराची सुधारणा केली. १९४१ मध्ये ब्रिटिशांच्या मदतीने इटलीचा पराभव करून हेले सेलासीने आपला कारभार पुन्हा सुरू केला.

दुसऱ्या महायुद्धानंतर शहराची वाढ झपाट्याने झाली आहे. नव्याने बांधल्या जाणाऱ्या इमारती आधुनिक आहेत; पण गवताच्या झोपड्या, कौलारू घरे आजही येथे दिसतात. परदेशी प्रतिनिधींना राहाण्यासाठी गावाबाहेर प्रशस्त जागा, तसेच उद्याने आणि मैदाने यांची सोय केलेली आहे.

शहराला अकाकी सरोवरापासून वीजपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी नभोवाणी केंद्र आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांना हवाई व लोहमार्गांनी हे शहर जोडलेले आहे. फ्रेंच सोमाली लँडमधील जिबूतीशी हे १९१७ पासून लोहमार्गाने जोडलेले आहे.

शहरात सर्व प्रकारच्या शैक्षणिक, वैद्यकीय इ. सोयी उपलब्ध आहेत. कॉफी, तंबाखू, हाडे व धान्य यांचा व्यापार करणारे हे एक प्रमुख व्यापारी केंद्र असून येथे कापड, जोडे, मद्य, आटा, सिमेंट, सिगारेट इत्यादींचे कारखाने व गिरण्या आहेत. विणकाम, कातडीकाम व धातुकाम असे कारागिरीचे उद्योगही येथे केले जातात.

सध्याचा राजवाडा, जुना ‘धिब्बी’ राजवाडा, कॅथीड्रल, ट्रिनिटी चर्च, ऑपेरा हाऊस, रुग्णालय, चित्रपटगृहे या येथील प्रेक्षणीय इमारती आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आफ्रिकेसाठी असलेल्या आर्थिक मंडळांचे हे मुख्य ठिकाण असून त्याच्या कार्यालयासाठी येथे अत्याधुनिक इमारत ‘आफ्रिका हॉल’ बांधली आहे व म्हणून अदिस अबाबा हे आंतरराष्ट्रीय केंद्र बनले आहे.


दातार, नीला

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/17/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate