অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंटार्क्टिका

अंटार्क्टिका

अंटार्क्टिका

दक्षिण ध्रुवाभोवतीचे खंड क्षेत्रफळ १,३३,७७,००० चौ. किमी. हे खंड दक्षिण अमेरिकेच्या भूप्रदेशापासून ९७० किमी. आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांपासून त्यापेक्षा पुष्कळच दूर व अलग आहे. अंटार्क्टिकासभोवतीच्या महासागराला ‘अंटार्क्टिक महासागर’ किंवा ‘दक्षिण महासागर’ म्हणतात. परंतु तो खरोखर हिंदी, अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांचा दक्षिण भाग होय. या महासागरांवरून सतत वाहणाऱ्या थंड व जोरदार वाऱ्यांना जमिनीचा अडथळा कोठेच होत नसल्यामुळे हा महासागर नेहमीच अस्थिर व खवळलेला असतो. त्याच्या जोडीला अंटार्क्टिकावरून आलेले हिमनग, हिमखंड, बर्फाची चकंदळे यांमुळे हा नौकानयनास अगदी धोकादायक आहे.

यामुळे अगदी अलीकडील काळापर्यंत हे खंड अज्ञातच होते. याची बाह्यरेषा पूर्व गोलार्धात जवळजवळ दक्षिण ध्रुववृत्ताला धरुन आहे. पश्चिम गोलार्धात मात्र अंटार्क्टिक द्वीपकल्पाचा निमुळता भाग जवळजवळ ६३ द. पर्यंत उत्तरेकडे गेलेला आहे. या द्वीपकल्पाच्या एका बाजूला वेडेल व दुसऱ्या बाजूला रॉस, अमुंडसेन आदी समुद्र व उपसागर यांचे किनारे ७०द. ते ८० द. च्या दरम्यानपर्यंत आत गेलेले आहेत. या द्वीपकल्पाजवळ काही बेटे आहेत. द्वीपकल्पाच्या टोकाजवळ दक्षिण शेटलंड बेटे आहेत. अंटार्क्टिका खंडावर उत्थानजन्य पर्वतश्रेणी असून मार्कहॅम, सायपल, लिस्टर, कर्कपॅट्रिक वगैरे शिखरे ४,५०० मीटरहून अधिक उंच आहेत.

रॉस बेटावर मौंट एरेबस हा सु. ३,७३६ मी. उंचीचा जागृत ज्वालामुखी आहे. खंडाच्या मध्यभागी बर्फाच्छादित उंच पठार आहे. दक्षिण ध्रुवाची उंची सु. २,८०० मी. आहे. खंडाची सरासरी उंची १,८०० मी. असून ती इतर कोणत्याही खंडाच्या सरासरी उंचीपेक्षा पुष्कळ अधिक आहे. पॅसिफिक बाजूच्या व्हिक्टोरिया लँडपासून अटलांटिक बाजूच्या कोट्स लँडपर्यंत गेलेल्या ट्रान्सअंटार्क्टिक या ४५० मी. उंचीच्या उत्थानजन्य पर्वतश्रेणीने या खंडाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन असमान भाग पाडले आहेत. पूर्व भाग पश्चिम भागाच्या सु. दुप्पट मोठा आहे. पश्चिम अंटार्क्टिकाचा बराच भाग बर्फाखालील द्वीपसमूहांचा बनलेला आहे. बेटांच्या दरम्यान बर्फाची जाडी ४,२७० मी. आहे. खंडावरील बर्फाचा थर सरासरीने सु. १.६ किमी. जाडीचा आहे. जगातील शुद्ध पाण्याच्या एकूण साठ्याचा फार मोठा भाग या खंडावर हिम व बर्फरूपाने साठलेला आहे.

पूर्व अंटार्क्टिका हा एक सलग खंडप्रदेश असावा. तो अतिशय उंचसखल आहे. काही ठिकाणी बर्फ घसरुन जाऊन पर्वताचे भाग उघडे पडले आहेत. दक्षिण ध्रुव या पूर्व भागातच आहे. व्हिक्टोरिया लँडजवळचा भाग एक विस्तीर्ण सखल बर्फाच्छादित मैदान असून काही ठिकाणी भूमी बर्फाच्या वजनाने समुद्रसपाटीखाली खचलेली आहे, दक्षिण ध्रुवापासून ३०० ते ५०० किमी. पर्यंतच्या भागात आढळणाऱ्या हलक्या बिट्यूमिनस कोळशाच्या दृश्यांशातील जीवाश्मांवरून हा प्रदेश पुर्वी केव्हा तरी अरण्यमय होता असे दिसते. नंतर तेथे आजच्यासारखा प्रदेश आला तो हवामानातील दीर्घकालीन बदलामुळे की ध्रुवाच्या स्थलांतरामुळे की खंडपरिवहनामुळे, हा संशोधनाचा विषय आहे. या खंडावर अल्प प्रमाणात लोखंड, मँगेनीज, तांबे, शिसे, मॉलिब्डिनम व युरेनियम आढळले आहे. अधिक संशोधन चालू आहे.

अंटार्क्टिका खंडावर जगातील सर्वांत कमी तापमान आढळले आहे. सर्वांत कमी थंडीच्या काळातही किनाऱ्यावरील तपमान ०से. व अंतर्भागातील तपमान -२० से. ते - ३५0असते. हिवाळ्यात किनाऱ्यावर - २० से. ते -३० से. आणि अंतर्भागात -४०से. ते - ७० से. असते. पठारावरील सरासरी तपमान -५५ से. असते. तर सर्वांत कमी तपमान -८८·३ से. हे ३,४३० मी. उंचीच्या, रशियन ठाण्यावर २४ ऑगस्ट १९६० रोजी नोंदले गेले आहे. प्रत्यक्ष दक्षिण ध्रुवावरील अमेरिकन ठाण्यावर बिनसूर्याच्या सहा महिन्यांत कमीतकमी तपमान -७४· से. नोंदले गेले.

अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यावर प्रतिवर्षी फक्त ३० ते ६० सेंमी. हिम पडते; अंतर्भागात ते फक्त १० ते १५ सेंमी. पडते. किनाऱ्यावर व लगतच्या समुद्रावर मिळून बर्फाचे प्रचंड थरांवर थर साठलेले असतात. त्यापासून सपाट माथ्याचे मोठेमोठे हिमनग सुटून समुद्रात येतात. त्यांपैकी काहींची लांबी सु. १५० किमी. पर्यंत आढळलेली आहे. हे पाण्याबाहेर सु. ६०-७० मी. उंच असतात. हिमनद्यांतून सुटलेले हिमनग सु. १५० मी. उंचीपर्यंत, वेगवेगळ्या आकारांचे असतात. जहाजाच्या डोलकाठीवरूनही पलीकडे दृष्टी पोचत नाही एवढ्या विस्ताराचे बर्फाचे थर समुद्रावर असतात. हिमनद्यांच्या जिव्हा समुद्रात आतपर्यंत आलेल्या असतात.

पूर्व अंटार्क्टिकात रुपांतरित व अग्निजन्य खडकांच्या कॅम्ब्रियनपूर्व आधारावर पुराजीव-महाकल्पातील व मध्यजीव-महाकल्पातील गाळाचे थर आहेत. रॉस समुद्रामागे गटपर्वतांची रांग आहे. विभंगामुळे तळाचे रुपांतरित व अग्निजन्य खडक वर आले असावे. पश्चिम अंटार्क्टिकात गाळाचे खडक व वलीपर्वत आढळतात. त्यातच अँडियन जातीचे अग्निजन्य खडक आहेत. तृतीय युगातील व अर्वाचीन काळातील ज्वालामुखीही आहेत.

अंटार्क्टिकावर जीवसृष्टी बहुतेक नाहीच, असे म्हणता येईल. काही शेवाळ्याच्या जातीच्या वनस्पती व एकदोनं प्रकारची फुलझाडे आणि गवताचे प्रकार आहेत. किनाऱ्यावरील बर्फ व ते वितळून झालेल्या डबक्यांत काही अतिसूक्ष्म जीव आढळतात. तसेच काही कीटक, कोळी व सूक्ष्म जीव आहेत. जमिनीवरील सर्वांत मोठा प्राणी म्हणजे सु. २·५ मिमी. लांबीचा घरातल्या माशीच्या जातीचा, बिनपंखाचा प्राणी होय. भोवतीच्या समुद्रात मात्र विपुल जलचर आहेत. देवमासे व सीलमासे येथे येतात. देवमाशांच्या शिकारीचे हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. येथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मात्र आश्चर्य वाटण्याइतकी मोठी आहे. बादशहा (एम्परर) पेंग्विन हाच काय तो येथे वर्षभर राहणारा पक्षी आहे. अ‍ॅडेलाय पेंग्विन, सी पेट्रेल व साउथ पोलर स्कुआ वगैरे पक्षी मधूनमधून येतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/1/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate