অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विक्रम साराभाई

विक्रम साराभाई

भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून विक्रम साराभाई ओळखले जातात. विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदावाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते. आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे Physical Research Laboratory ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.

विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

१९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले. दि. डिसेंबर ३१ १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

 

स्रोत - vidnyan.net

अंतिम सुधारित : 4/5/2021



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate