অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजेंद्रलाल (राजा) मित्र

राजेंद्रलाल (राजा) मित्र

राजेंद्रलाल (राजा) मित्र

राजा राजेंद्रलाल मित्र

(१६ फेब्रुवारी १८२२ – २६ जुलै १८९१). प्रसिद्ध बंगाली प्राच्याविद्या संशोधक. जन्म कलकत्त्याच्या सुरा या पूर्वेकडील उपनगरात. वडील जनमेजय साहित्यप्रेमी होते. क्षेमचंद्र बोस यांच्या इंग्लिश स्कूलमध्ये आणि गोविंदचंद्र बिसाक यांच्या हिंदू फ्री स्कूलमध्ये शालेय शिक्षण. नंतरचे वैद्यकिय शिक्षण अर्धवट झाले आणि कायद्याचा अभ्यास (पदवीअभावी) अपुरा राहीला.

मात्र संस्कृत, फार्सी, उर्दू, हिंदी, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, लॅटिन तसेच इंग्रजी इ. विविध भाषा शिकून त्यांनी आपला व्यासंग समृद्ध केला. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी भुवनमोहिनी या महिलेशी१८६० मध्ये विवाह केला. त्यांना रामेंद्रलाल आणि महेंद्रलाल हे दोन मुलगे झाले.

राजेंद्रलाल एशियाटिक सोसायटीत सुरुवातीस ग्रंथपाल (१८४६ ते १८५६) व नंतर सहायक चिटणीस होते. त्यानंतर जमीनदारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या शासकीय संस्थेचे ते संचालक झाले (१८५६–८०). पुढे १८८५ मध्ये ते एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय अध्यक्ष झाले.

राजेंद्रलालांच्या ग्रंथसंपदेचे साधारणपणे तीन भाग पाडता येतील. पहिला भाग भारतीय शिल्पकला, वास्तुकला आणि राजकीय आणि सामाजिक विषयांवरील निबंधांचा; दुसरा संस्कृत ग्रंथांच्या भाषांतर विवेचनाचा आणि तिसरा संस्कृत हस्तलिखितांच्या सूचिग्रंथां चा.

सार्वजनिक जीवनातही राजेंद्रलालांचा सहभाग फार मोठा होता. कलकत्ता महानगरपालिका, विद्यापीठ लँड होल्डर्स असोसिएशन इ. संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आला. १८८६ मध्ये कलकत्यात भरलेल्या अखिल भारतीय काँ ग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते. कलकत्त्याला नगरपालिकेचा कारभार सुरू झाला, तेव्हा ते कमिशनर म्हणून निवडून आले. सरकारने स्थापन केलेल्या वॉर्डस्‌ इन्स्टिट्यूट मध्ये संचालक आणि शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. आपल्या फर्ड्या वक्तृत्वाने बाबूंनी ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या अन्याय्य वर्तनावर कडक टिका केली. कलकत्ता विद्यापीठाने १८५३ साली त्यांना ‘फेलो’ म्हणून निवडले आणि पुढे त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ ही सन्मान्य पदवी दिली (१८७६).

विविध इंग्रजी-बंगाली नियतकालिकांतून त्यांनी स्फूट लेखनही केले. विविधार्थ संग्रह हे पहिले बंगाली चित्रमासिक त्यांनी १८५१ मध्ये सुरू केले. त्यांनी लिहिलेल्या सु. ११४ शोधनिबंधापैकी ‘द रिप्रेझेंटेशन ऑफ फॉरिनर्स इन्‌ अजंठा फ्रेस्कोज’ हा निबंध विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यांचे पुढील ग्रंथ उल्लेखनीय आहेत द अँटिक्विटिज ऑफ ओरिसा (२ खंड, १८८०), द पार्सीज ऑफ बॉम्बे(१८८०), इंडो आर्यन्स (२ खंड, १८८१), नोटिसीस ऑफ संस्कृत मॅन्युस्क्रिप्ट्स (९ खंड १८७०–८८), द संस्कृत बुद्धिस्ट लिटरेचर ऑफ नेपाल (१८८२), द योग सूत्राज ऑफ पतंजली (१८८०). याशिवाय मेषारेर राजेतिहास (१८६१), शिवाजीर जीवनी (१८६०), व्याकरण प्रवेशआणि भारतवर्षे सांस्कृतिक इतिहास हे बंगालीतील उल्लेखनीय ग्रंथ होत. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

 

संदर्भ : टागोर, रवींद्रनाथ, जीवनस्मृति, कलकत्ता, १९६३.

लेखक - शोभना गोखले / बिंदा परांजपे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate