अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर : ( २९ नोव्हेंबर १८६९—१९ जानेवारी १९५१). गुजरातमधील समाजसुधारक, ‘ठक्करबाप्पा’ या नावानेही ते ओळखले जात. भावनगर येथे जन्म. पुण्याची अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते ‘एल्.सी.ई.’ झाले ( १८९०). पुढे त्यांनी वढवाण व पोरबंदर ह्या संस्थानांत (१८९१–९९), पूर्व आफ्रिकेतील युगांडा रेल्वेत ( १८९९–१९०२) व सांगली संस्थानात (१९०४–०५) अभियंता म्हणून कामे केली. ते मुंबई महानगरपालिकेत नोकरीस होते. ही नोकरी करीत असतानाच अस्पृश्य जातींच्या अवनत स्थितीकडे त्यांचे लक्ष्य गेले व त्यांच्या उद्धारासाठी ते झटू लागले. १९१४ साली मुंबई महानगरपालिकेची नोकरी सोडून ते ‘भारत सेवक समजा’चे सदस्य बनले. आसाम, उत्तर प्रदेश, प. बंगाल, गुजरात व ओरिसा या राज्यांत त्यांनी दुष्कळ -निवारणार्थ कार्य केले.
ओरिसात असताना त्यांनी पंचमहाल जिल्ह्यातील भिल्लांचे जीवन जवळून पहिले व त्यांचे लक्ष हरिजनांकडून गिरिजनांकडून वळले. त्यांनी ‘भिल्ल सेवा मंडळ’ व ‘अंत्यज सेवा मंडळ’ यांची स्थापना केली (१९२३–२५). भिल्ल समाजातील अज्ञान आणि व्यसनाधीनता नष्ट करणे, त्यांच्यावरील अन्याय दूर करणे यांसाठी त्यांनी परिश्रम केले. अस्पृश्यांसाठी विहिरी व भंग्यांसाठी धर्मशाळा बांधण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. म. गांधींच्या चळवळीशी संबंध नसतानाही त्यांना सरकारने पकडून शिक्षा केली; पण पुढे अपीलात ते सुटले (१९३०). जातीय निवाड्यांतील अस्पृश्यांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द व्हावेत म्हणून म. गांधीनी जी चळवळ केली; त्यामध्ये सर्वांत मोठा वाट ठक्करबाप्पांनी उचलला. ‘हरिजन सेवक संघा’चे ते १९३२ मध्ये मुख्य कार्यवाह झाले.
१९३७ साली काँग्रेसची मंत्रीमंडळे अधिकारावर आली, तेव्हा निरनिराळ्या प्रांतांतील हरिजन आदिवासी इ. मागासलेल्या लोकांची पाहणी करण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविण्यात आले व ते त्यांनी अतिशय कसोशीने पार पाडले. पुढे १९५० साली देशभर हिंडून त्यांनी सर्व आदिवासी लोकांची माहिती गोळा केली. तिच्या आधारेच आदिवासींचे कल्याणविषयक कायदे पुढे तयार करण्यात आले. त्यांनी ‘आदिवासी सेवा मंडळा’ची स्थापना केली. त्यांची राहणी अतिशय साधी होती प्रसिद्धीपासून अलिप्त राहून त्यांनी गिरीजन व हरिजन यांची आमरण सेवा केली.
लेखक - अं. दि. माडगुळकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 11/13/2019
आधुनिक समाजसुधारक व पत्रकार. तमिळनाडूतील तंजावर ये...
सुप्रसिद्ध इंग्रज समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ. ल...
राष्ट्रीय काँग्रेसच्या आद्यपर्वातील एक थोर मुस्लिम...
द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार...