অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वैनगंगा

वैनगंगा

वैनगंगा

मध्य प्रदेश राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातून वाहणारी एक प्रमुख नदी व गोदावरीची उपनदी. लांबी सु. ५८० किमी. महानदी, शोण, नर्मदा, तापी यांसारख्या अनेक नद्यांचे उगमस्थान असलेल्या मध्य भारतातील पूर्व-मध्य उच्चभूमी प्रदेशातच वैनगंगेचाही उगम होतो.

अधिक उंची, डोंगराळ प्रदेश व भरपूर पाऊस ही या प्रदेशाची प्रमुख वैशिष्टे आहेत. मध्य प्रदेश राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील महादेव डोंगररांगात सस. पासून ६४० मी. उंचीवर सिवनीच्या पश्चिमेस १८ किमी.वर परताबपूर गावाजवळ वैनगंगा नदी उगम पावते.

पर्वतीय प्रदेशातील कटकांमुळे पहिल्या टप्प्यात तिला अनेक वळणे प्राप्त झाली आहेत. उगमानंतर काही अंतर वाहत गेल्यावर सिवनी जिल्ह्यातून ती पूर्वेकडे वाहते. त्यानंतर एक दीर्घ अर्ध-वर्तुळाकार वळण घेऊन ती दक्षिणेस वळते. तेथे तिला मंडलाकडून वाहत येणारी थानवर नदी मिळते. काही अंतर सिवनी जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहत गेल्यानंतर ती बालाघाटमध्ये प्रवेश करते.

वैनगंगेच्या वरच्या टप्प्याचे सुरूवातीचे काही पात्र खडकाळ असून त्यानंतर सिवनी जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीवर येईपर्यंतच्या तिच्या खोऱ्यात आलटून-पालटून सुपीक गाळाचे प्रदेश व अरुंद निदऱ्या आढळतात. पात्रात अनेक ठिकाणी द्रुतवाह, तसेच काठावर सु. ६० मी. उंचीच्या ग्रॅनाइटी खडकांच्या भिंती आढळतात. थानवर नदी मिळण्यापूर्वीचे वैनगंगेचे दहा किमी. लांबीचे खोरे निसर्गसुंदर आहे. मध्य भारतातील अशा अप्रतिम सृष्टिसौंदर्याच्या बाबतीत नर्मदेच्या भेडाघाट घळईनंतर याच खोऱ्याचा क्रमांक लागतो.

ध्य प्रदेश राज्यातून सु. २७४ किमी. वाहत आल्यानंतर मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्यांच्या सरहद्दीवरून सु. ३२ किमी. नैऋत्य दिशेत ही नदी वाहत येते. त्यानंतर ती भंडारा व गोंदिया जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहते. गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवर तिला पूर्वेकडून येणारी वाघ नदी मिळते.

भंडारा जिल्ह्यातून वाहताना ती प्रथम भंडारा-गोंदिया जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून व पुढे भंडारा तालुक्यातून नैऋत्येस जाते. पुढे भंडारा-नागपूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस जाऊन भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागातून आग्नेयीस वळून गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून आग्नेयीस वाहत येते.

भंडारा जिल्ह्यातील तिची एकूण लांबी सु. २०० किमी. आहे. त्यानंतर ती दक्षिणवाहीनी होऊन चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहू लागते. शेवटी या दोन जिल्ह्यांच्या दक्षिण सरहद्दीवरच (महाराष्ट्र-आंध्रप्रदेश राज्यांच्या सरहद्दीवर) सेवनी गावाजवळ तिला पश्चिमेकडून वाहत येणारी व विदर्भातील दुसरी महत्त्वपूर्ण अशी वर्धा नदी मिळते.

वर्धा-वैनगंगा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह पुढे प्राणहिता नावाने ओळखला जातो. प्राणहिता नदी महाराष्ट्र (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्यांच्या सरहद्दीवरून ११३ किमी. अंतर वाहत गेल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा गावाजवळ सस. पासून १०७ मी. उंचीवर पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या गोदावरी नदीला मिळते.

बालाघाट, तुमसर, भंडारा व पौनी ही वैनगंगेच्या काठावरील प्रमुख नगरे आहेत. वाघ, बावनथरी, सुर, कन्हान, बोदलकसा, चोरखमारा. चुलबंद, गाढवी, गायमुख, खोब्रागडी, कथणी, पोटफोडी, फुअर, अंधारी या वैनगंगेच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या आहेत. वैनगंगेचे मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील एकूण पाणलोट क्षेत्र ६१,०९३ चौ. किमी. आहे.

सिवनी व छिंदवाडा जिल्ह्यांच्या विस्तृत प्रदेशातील तसेच नागपूर मैदानाच्या पूर्व भागातील पाणी पेंच व कन्हान नद्यांद्वारे वैनगंगेला मिळते. मध्य प्रदेशातील तिच्या खोऱ्यात दाट अरण्ये आहेत. सिवनी व बालाघाट जिल्ह्यांतील पात्रात बेसाल्टयुक्त कटकांच्या मालिका व खोल डोह आढळतात. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. बालाघाटनंतरचे पात्र सामान्यपणे रुंद व वालुकामय असून त्यात अधूनमधून खडकांच्या मालिका आढळतात.

चंद्रपूर-गडचिरोली दरम्यान तिच्या पात्राची रुंदी ५४५ मी. पर्यंत वाढते. पावसाळ्यात भरपूर पाणी असताना वाघ नदीच्या संगमापासून गडचिरोलीपर्यंतच्या प्रवाहातून पडाव-वाहतूक चालते. मात्र एक-दोन ठिकाणचे खडकाळ भाग थोडे धोकादायक आहेत. प्रवाहातून लाकूड, धान्य व भाजीपाल्याचीही वाहतूक केली जाते.

नदीने आपल्या खोऱ्यात काहीकाही ठिकाणी पूर-मैदानांचीही निर्मिती केली आहे. वैनगंगेचे खोरे तांदूळ उत्पादनासाठी विशेष महत्त्वाचे आहे. मात्र जलसिंचनासाठी तिचा विशेष उपयोग करून घेतलेला नाही. तिच्या खोऱ्यात लोकवस्ती विरळ आहे.

वैनगंगेच्या पहिल्या टप्प्यातील आश्चर्यकारक अशा दीर्घ अर्धवर्तुळाकार वळणाबद्दल व वेड्यावाकड्या पात्राबद्दल एक हिंदू आख्यायिका प्रचलित आहे.

 

पहा : चंद्रपूर जिल्हा; भंडारा जिल्हा.

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate