অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भागीरथी

भागीरथी

भागीरथी

पश्चिम बंगाल राज्याच्या त्रिभुज प्रदेशातून वाहणारा गंगा नदीचा दक्षिणवाहिनी फाटा ‘भागीरथी’ म्हणून ओळखला जातो. मुर्शिदाबाद जिल्ह्यात २४0३५' उ. अक्षांस व ८८०५५' पू. रेखांशावर जंगीपूरच्या साधारण उत्तरेस ८ किमी. वर हा फाटा गंगेपासून अलग होतो. बरद्वान आणि नडिया या जिल्ह्यांच्या सीमेवरून दक्षिणेस वहात गेल्यावर त्यास नवद्वीपजवळ पूर्वेकडून जलांगी नदी येऊन मिळते. तेथून पुढे हा प्रवाह ‘हुगळी’ नावाने ओळखला जातो. फार पूर्वी हा प्रवाह ‘सरस्वती’ या नावाने ओळखला जात असे. सोळाव्या शतकापर्यंत भागीरथी हाच गंगेचा प्रमुख फाटा होता.

मात्र सतराव्या शतकापासून त्यात साठत गेलेल्या गाळामुळे गंगेचे बरेचसे पाणी बांगला देशातील पद्मा-मेघना नद्यांना मिळाले. त्यासाठी वर्षातील आठ महिने पाण्याचे प्रमाण अत्यल्प राहू लागले. त्यामुळे भागीरथी-पद्मा अशा गंगेच्या विभाजनापूर्व पात्रात भारताने गंगेवर फराक्का हा प्रकल्प बांधून गंगेचे जादा पाणी भागीरथी नदीत सोडण्याची व्यवस्था केलेली आहे.

भागीरथीचे खोरे अत्यंत सुपीक गाळाचे असून त्यात भाताची वर्षातून तीन पिके घेतली जातात. मुर्शिदाबाद जिल्हा आंबे व रेशीम उत्पादन यांसाठी महत्त्वाचा आहे. जंगीपूर मुर्शिदाबाद, बेऱ्हमपूर, काटवा, नवद्वीप ही भागीरतीच्या तीरावरील प्रमुख शहरे होत. प्राचीन काळापासून भागीरथी जलवाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. हिच्या काठी गौड, राजमहाल, नवद्वीप इ. वैभवशाली नगरे नांदत होती. भागीरथीला हिंदू लोक फार पवित्र मानतात. अजूनही स्नान करताना ‘जय गंगे भागीरथी’ असे म्हणण्याचा प्रघात आहे. 

गंगेच्या हिमालयातील शीर्षप्रवाहसुद्धा भागीरथी या नावानेच ओळखला जातो. उगमापासून भागीरथी या नावाने गंगा प्रथम ३५ किमी. पश्चिमेस व नंतर हिमालयातील दऱ्यायाखोऱ्यातून १४० किमी. दक्षिणेस वाहत आल्यावर तिला देवप्रयाग येथे अलकनंदा हा गंगेचा दुसरा शीर्षप्रवाह येऊन मिळतो. तेथून पुढे भागीरथी-अलकनंदा यांचा संयुक्त प्रवाह गंगा नावाने दक्षिणेस वाहू लागतो.

भागीरथीसंबंधी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. कपिल मुनीच्या शापाने दग्ध झालेल्या सगराच्या साठ हजार पुत्रांच्या उद्धारासाठी अंशुमान व दिलीप या इक्ष्वाकुवंशीय राजांनी स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी केलेल्या अयशस्वी प्रयत्नानंतर भगीरथीने हिमालयात जाऊन घोर तपश्चर्या करून गंगेस प्रसन्न केले. गंगेने भगीरथीला दर्शन दिले व स्वर्गातून पृथ्वीवर पडणारा तिचा प्रवाह धारण करण्यासाठी शंकराला प्रसन्न करून घेण्यास सांगितले.

तेव्हा भगीरथाने शंकराची आराधना केली. शंकराने प्रसन्न होऊन गंगेचा प्रवाह आपल्या जटासंभारात धारण केला आणि आपल्या जटेतील एक केस तोडून गंगेच्या प्रवाहाला वाट करून दिली. गंगेच्या या प्रवाहाला ‘अलकनंदा’ हे नाव पडले. नंतर भगीरथीने गंगेला आपल्या मागून येण्यास सांगितले. सगरपुत्रांची राख जेथे पडली होती, तेथे गंगाप्रवाह नेऊन भगीरथीने त्यांच्या उद्धार केला. त्याच्याच नावावरून गंगेच्या या शीर्षप्रवाहाला भागीरथी हे नाव पडले. तिला भगीरथाची कन्या मानली जाते.

दुसऱ्या कथेनुसार गंगा प्रथम उत्तरेस तिबेटच्या बाजूला वाहत होती. त्यामुळे उत्तर भारत अवर्षणग्रस्त असे. तेव्हा भगीरथाने आपल्या प्रयत्नाने गंगेचा मूळ उत्तरवाहिनी प्रवाह वळवून तो दक्षिणवाहिनी केला. त्यावरून हिला भागीरथी असे संबोधले जाऊ लागले.  पहा : अलकनंदा; गंगा; पश्चिम बंगाल राज्य.

 

संदर्भ : 1. Bose, S. C. Geography of West Bengal, New Delhi, 1968.

2. Misra, S. D. Rivers of India, New Delhi, 1970

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/11/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate