অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिझोराम

मिझोराम

भारताच्या नऊ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक. क्षेत्रफळ २१,०८७ चौ. किमी. विस्तार २२° ते २४° १९′ उत्तर अक्षांश व ९२° १६′ ते ९३° २६′ पू. रेखांश. या प्रदेशाच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. लोकसंख्या४,८७,७७४ (१९८१). ईशान्य भारतातील या प्रदेशाच्या पश्चिमेस बांगला देश व भारतातील त्रिपुरा राज्य, उत्तरेस आसाम (काचार जिल्हा) व मणिपूर राज्य आणि पूर्वेस व दक्षिणेस ब्रह्मदेश असून, ऐजाल (लोकसंख्या ७५,९७१) ही या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे.

भूवर्णन

मिझोराम हा टेकड्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. बहुतेक टेकड्यांच्या रांगा एकमेकीला समांतर अशा उत्तर-दक्षिण पसरलेल्या असून त्यांचे उतार तीव्र आहेत. नद्यांच्या खननामुळे या टेकड्यांमध्ये अनेक खोल दऱ्या तयार झालेल्या आहेत. टेकड्यांदरम्यान लहानलहान मैदानी द्रोणी प्रदेश असून त्यांतील सुपीक मृदेमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मिझोरामाच्या मध्यातून उत्तर-दिक्षण दिशेने मिझो टेकड्या पसरलेल्या आहेत. या तीव्र उताराच्या टेकड्यांची सरासरी उंची सु.९०० मी. असून ती मध्यभागी जास्त आहे. दक्षिण भागातील ब्लू मौंटन (फ्वंगपुरी) हे या टेकड्यांमधील सर्वोच्च (२,२६५ मी.) शिखर आहे. मिझोरामच्या पूर्व व दक्षिण सरहद्दींवर चिन टेकड्या व ब्रह्मदेशातील आराकान पर्वतरांगेचा विस्तारित भाग असून पश्चिम सरहद्दीवर बांगला देशातील चितगाँग टेकड्यांची रांग आहे.

मिझोरामच्या डोंगराळ भूमीतून अनेक लहानमोठे नदीप्रवाह वाहत असलेले दिसतात. डोंगराळ भागातील खोल निदऱ्यांमधून उत्तरेकडे अथवा दक्षिणेकडे हे नदीप्रवाह वाहत जातात. ढालेश्वरी (त्लावंग), सोनई (त्वीरेल) व तुइव्हावल या नद्या मध्यवर्ती डोंगराळ प्रदेशात उगम पावून उत्तरेस वाहत जाऊन आसामच्या काचार जिल्ह्यात बऱ्‍रा क नदीला मिळतात, तर कर्णफुली ही नदी प्रदेशाच्या दक्षिण टोकापासून उत्तरेस साधारण मध्यभागापर्यंत वाहत जाते व तेथून पुढे ती पश्चिमेस बांगला देशात प्रवेश करते. तेथेच तिच्यावर प्रचंड जलविद्युत्‌ प्रकल्प उभारला गेला आहे. कलदन ही नदी ब्रह्मदेशातून मिझोराममध्ये वाहत जाते. द्रोणी प्रदेशात अनेक सरोवरेही निर्माण झालेली दिसून येतात. दक्षिण भागातील पालक हे सर्वां त मोठे सरोवर असून त्याशिवाय ताम्‌डिल, रुंग्‌डिल इ. सरोवरेही महत्त्वाची आहेत.

हवामान

मिझोरामचे हवामान आल्हाददायक आहे. येथील हिवाळा व उन्हाळा सौम्य असतात. हिवाळ्यातील तापमान ११° से. ते २४° से. यांदरम्यान, तर उन्हाळ्यातील तापमान १८° से. २९° से. यांदरम्यान असते. खोलगट द्रोणी प्रदेशात किंवा दऱ्याखोऱ्यां मधील हवामान उष्ण व दमट असते; परंतु त्यामानाने डोंगरमाथ्यावरील हवामान जवळजवळ वर्षभर थंड असते. बहुधा याच कारणामुळे मिझो लोकांनी आपल्या वसाहती अथवा गावे डोंगरमाथ्यावर वसविलेली दिसून येतात. या प्रदेशात मार्च ते एप्रिल या काळात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होते. या प्रदेशातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५४सेंमी. असून उत्तरेकडील प्रदेशापेक्षा दक्षिणेकडील प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक आहे (उदा., उत्तरेकडील ऐजाल शहरी वार्षिक सरासरी २०८ सेंमी. पाऊस पडतो तर दक्षिणेकडील लुंगलेई येथे ३५० सेंमी. पडतो ). हिवाळ्यात पाऊस पडत नाही तसेच आकाशही निरभ्र असते. स्वच्छ व निळे आकाश आणि सकाळी पडणारे धुके यांमुळे या डोंगराळ प्रदेशांचे हिवाळ्यातील सृष्टिसौंदर्य विशेष विलोभनीय असते.

वनस्पती व प्राणी

या प्रदेशात समृद्ध वनस्पतिजीवन आढळते. विविध प्रकारची झाडे, झुडपे व गवत तसेच बाबूंची वने सर्वत्र आहेत. डोंगराळ प्रदेशातील टेकड्या नेहमी हिरव्यागार दिसतात. अलीकडे पाइन वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. वन्य प्राणी अभयारण्याच्या दृष्टीने येथील वनस्पतिजीवन व हवामान फारच अनुकूल आहे, परंतु मोठ्या प्रमाणावरील शिकारीमुळे प्राण्यांचे व पक्ष्यांचे प्रमाण खूप घटले आहे. अलीकडे मात्र त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बंदुकीच्या वापरावर, प्राणी-पक्षी यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बंदुकीच्या वापरावर, प्राणी-पक्षी यांच्या शिकारीवर कडक निर्बंध घातले आहेत. हत्ती, वाघ,बिबळ्या, अस्वल, रानटी कुत्रे, शेळ्या, विविध प्रकारची माकडे, रानगवा, हरिण, रानडुक्कर इ. प्राणी येथे पुष्कळ प्रमाणात आहेत. यांचा पिकांना मात्र उपद्रव होतो. जंगली फाउल, धनेश, फेझंट, होले इ. पक्षी या प्रदेशात सर्वत्र दिसतात.

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate