অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बडोदे संस्थान

बडोदे संस्थान

बडोदे संस्थान

ब्रिटिशांकित भारतातील गुजरातमधील एक प्रसिद्ध व प्रगत संस्थान. क्षेत्रफळ सु. २०,७४० चौ. किमी,: लोकसंख्या २८,५५,००० (१९४७); वार्षिक उत्पन्न सु. साडेचार कोटी रुपये. संस्थानचा प्रदेश सलग नसून गुजरात - काठेवाडातील इतर देशी संस्थाने आणि ब्रिटिश जिल्हे यांतून विखुरलेला होता. उत्तरेस कडी (मेहसाणा), मध्यावर पण नर्मदेच्या उत्तरेस बडोदे, , दक्षिणेस तापी नदीजवळ नवसारी हे प्रांत गुजरातेत; तर अमरेली आणि ओखामंडल हा छोटा जिल्हा काठेवाडात विभागलेले होते. संस्थानात लहानमोठी ४८ शहरे असून ३,०३५ खेडी होती. संस्थानची स्थापना करणाऱ्या गायकवाडांचा मूळ पुरुष दमाजी. त्याने गुजरातेत स्वाऱ्या करणाऱ्या सेनापती खंडेराव दाभाड्यांच्या हाताखाली मर्दुमकी गाजवून ‘समशेर बहादूर’ हा किताब मिळवला. त्याच्या मृत्यूनंतर पुतण्या पिलाजी (कार. १७२१-३२) याने सोनगड हे मुख्य ठाणे करून सुरत, बडोदे, नांदोद, चांपानेर, भडोच इ. प्रदेशांवर अंमल बसविला. डभईच्या लढाईत (१७३१) त्रिंबकराव दाभाडे मारले गेले; पण पेशवा पहिल्या बाजीरावाने पिलाजीला ‘सेनाखासखेल’ हा किताब देऊन दाभाड्यांऐवजी त्याचे गुजरातेतील हक्क मान्य केले. मोगल सुभेदार अभयसिंगने एका मारवाड्याकडून पिलाजीचा डाकोरला खून करविला (१७३२) आणि शेरखानबाबी याच्याकडे बडोद्याचे राज्यपालपद दिले (१७३२). पिलाजीचा मुलगा दुसरा दमाजी गायकवाड (कार. १७३२-६८) याने बडोदे पुन्हा जिंकले (१७३४). गुजरातखेरीज काठेवाड-माळ्व्यापर्यंत त्याने स्वाऱ्या केल्या. पिलाजी-दमाजी या बारलेकांनी मोगल सुभेदारांप्रमाणेच कंठाजी कदमबांडे आदी स्वकीयांशी मुकाबला करुन गुजरातेत गायकवाडांच्या सत्तेचा पाया घातला. कोल्हापूरच्या महाराणी ताराबाईचा नंतर पक्ष घेणाऱ्या दमाजीला बाळाजी ऊर्फ नानासाहेब पेशव्याने काही काळ कैद केले (१७५१); पण मागील बाकी १५ लाख रु. द्यावी, १०,००० घोडदळ पेशवे म्हणतील तेव्हा लष्करी कामगिरीसाठी सज्ज ठेवावे, सुरत अठ्ठाविशी, मही, रेवाकांठा वगैरे भागांतील २८ लाखांचा व काठेवाडातील तीन लाखांचा प्रदेश स्वतःकडे ठेवावा, उरलेला प्रदेश व नवीन जिंकलेल्या प्रदेशाचे निम्मे उत्पन्न पेशव्यांना द्यावे इ. अटींवर सुटका केली (१७५४). पुढील वर्षी त्याने व रघुनाथरावाने अहमदाबादवर अंमल बसविला. दमाजीने आपले ठाणे पाटणला हलविले (१७६२). त्यानंतर बडोदे हीच गायकवाडांची राजधानी झाली. थोरल्या माधवरावाविरुद्ध रघुनाथरावाला मदत करण्यासाठी त्याने दुसरा मुलगा गोविंदराव याला पाठविले; पण तो पेशव्यांच्या कैदेत पडला (१७६८). गोविंदरावाने बरीच मोठी खंडणी वगैरे अटी मान्य करुन सेनाखासखेल हा किताब मिळविला; पण १७७१ मध्ये दमाजीचा थोरला मुलगा सयाजी याला ते पद देउन धाकटा मुलगा फत्तेसिंग याला त्याचा मुतालिक नेमण्यात आले. पुढील सहासात वर्षे गोविंदराव-फत्तेसिंग यांत अंतःकलह माजून अखेर फत्तेसिंग विजयी झाला (१७७८). याच काळात फत्तेसिंग-रघुनाथराव-इंग्रज युती होऊन इंग्रजांनी भडोचवर हक्क मिळविले व गायकवाडीत शिरकाव केला. इंग्रजांच्या तहाचा (१७८०) फत्तेसिंगाला फायदा झाला नाही. त्याच्या मृत्युनंतर (१७८९) सत्ता हस्तगत करण्यासाठी गोविंदरावाला (कार. १७८९-१८००) मानाजी, मल्हारराव हे भाऊबंद, पेशव्यांचा अधिकारी आबा शेलूकर इत्यादींविरुद्ध कारवाया कराव्या लागल्या. दुर्बल पेशव्याने अहमदाबादचा मक्ता (इजारा) १८०० मध्ये गायकवाडांना दिला पण आनंदरावाने (कार. १८००-१८१९) अरब तसेच मल्हारराव, कान्होजी या भाऊबंदांचा पुंडावा मोडण्यासाठी इंग्रजांची तैनाती फौज मान्य केली (१८०२). त्यासाठी ७०,००० रुपयांचा प्रदेश इंग्रजाना तोडून दिला आणि सौराष्ट्रातील खंडणी आपल्यातर्फे वसूल करण्याचे हक्क त्यांना दिले. सहाजिकच संस्थान अशा रीतीने इंग्रजांच्या मांडलिकीखाली आले. पेशवे-गायकवाड यांचा आपसातील हिशोब मिटविण्यासाठी गेलेले बडोद्याचे मुत्सद्दी गंगाधरशास्त्री पटवर्धन यांचा पंढरपूर येथे खून झाला (१८१५). पेशवाईच्या अस्तानंतर त्यांचा गुजरातेतील उत्पन्नाचा हिस्सा गायकवाड इंग्रजांना देऊ लागले. शिवाय इंग्रजांची तैनाती फौज वाढली. पहिल्या सयाजीरावांच्या काळी (कार. १८१९-४७) इंग्रजाचे प्रभुत्व पूर्णपणे स्थापन झाले. इंग्रजानी महीकांठा येथील खंडणी वसुलीही स्वतःकडे घेतली आणि तैनाती फौजेच्या दिमतीसाठी घेतलेला २० लाखांचा प्रदेश परत केला; पण लाचखाऊ अधिकाऱ्यांनी अंतर्गत काभारात ढवळाढवळ केली, तेव्हा इंग्रजांनी पेटलाद शहर व आसपासचा भाग कायमचा घेतला (१८३८). संस्थानात गुलामगिरी अवैध ठरली. गणपतराव (कार. १८४७-५६) यांनी दळणवळणात सुधारणा केल्या आणि भ्रूणहत्येवर बंदी घातली. खंडेरावांच्या कारकीर्दीत (१८५६-७०) मियागाव ते डभई रेल्वे झाली; त्यांनी सरकारी पतपेढ्या काढल्या व जमिनीच्या पाहणीला सुरुवात केली; तसेच मल्लविद्येला उत्तेजन दिले. महीकांठा-रेवाकांठा यांमधील वाघऱ्यांची बंडे मोडून १८५७ मध्ये इंग्रजांना मदत केल्याबद्दल शिबंदीचा सालीना तीन लाख रूपये खर्च माफ झाला. खंडेरावांचा कैदेत असलेला भाऊ मल्हारराव हा नंतर गादीवर आला; पण त्याच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी लागली. दिवाण दादाभाई नवरोजीसुद्धा मल्हारावाला मदत करु शकले नाहीत. त्यांनी राजीनामा दिला. रेसिडंट कर्नल फेयरला विष घातल्याचा आरोप मल्हाररावावर आला. या आरोपाच्या चौकशी समितीत ३ युरोपीय व ३ भारतीय सदस्य होते. तिन्ही भारतीयांनी मल्हाररावांना निर्दोषी ठरविले; तरी त्यांना पदच्युत करण्यात आले (१८७५).

खंडेरावांची विधवा पत्नी जमनाबाई हिने दत्तक घेतलेल्या तिसऱ्या सयाजीरावांची प्रदीर्घ कारकीर्द (१८७५-१९३९) संस्थानाचे सुवर्णयुग ठरली. वयात येऊन त्यांना पूर्णाधिकार मिळेपर्यंत (१८८१) प्लेग-दुष्काळ-महापुरासारख्या आपत्तीही आल्या; पण शासनाच्या अंगोपांगांत जातीने लक्ष घालून राजा सर टी. माधवराव, मनूभाई मेहता, व्ही. टी. कृष्णम्माचारी इ. दिवाणांच्या साहाय्याने सयादीरावांनी संस्थानाला अत्यंत प्रगत, आधुनिक आणि संपन्न केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केलेच (१९०६); तसेच मागासलेल्या जमाती, स्त्रियांचे शिक्षण, कृषी व तांत्रिक शिक्षण, ललितकला अशा सर्व क्षेत्रांत सोयी उपलब्ध केल्या आणि शेती व उद्योगधंद्यांना उत्तेजन दिले. प्राच्यविद्या, भारतीय भाषा, ग्रंथालये, ग्रंथनिर्मिती, साहित्यपरिषदा व इतर अनेक सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था या सर्वांना त्यानी सढळ हाताने अनुदाने देऊन उत्तेजन दिले. महाराजा सयाजीराव विद्यापीठ हे त्याचेच एक महत्वाचे फलित होय. पंचायतींचा कायदा करून (१९०६) दहा हजार वस्तीवरील प्रत्येक शहरात नगरपालिका स्थापन केली आणि शहराच्या सुखसोयीत व सौंदर्यात भर घातली. हा वारसा त्यांच्या मृत्यूनंतर नातू प्रतापसिंह (कार. १९३९-५१) यांना सांभाळता आला नाही. सीतादेवी या घटस्फोट झालेल्या - धर्मांतरित स्त्रीशी विवाह करण्यासाठी-संस्थानचा द्विभार्याप्रतिबंधक कायदा त्यांनी दुरुस्त करुन घेतला आणि स्वतःचा तनखा २३ लाखांवरुन ५० लाख केला; त्यामुळेच त्यांना १९५१ मध्ये पदच्युत करण्यात आले. १९४७ मध्ये संस्थान विलीन करण्यास संमती दिल्यावर आपणास गुजरातचा राजा करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. प्रजामंडळा च्या दडपणामुळे १९४८ मध्ये त्यांना ५८ सदस्यांची घटनासमिती तथा लोकनियुक्त विधिमंडळ स्थापावे लागले आणि जीवराज मेहता हे मुख्यमंत्री झाले. १ मे १९४९ रोजी संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले व १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा भाग बनले.

 

स्त्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate