অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पंजाब

पंजाब

पंजाब

भारतीय उपखंडातील महत्त्वाचा प्रांत. ‘पंजाब’ याचा अर्थ पंच नद्यांच्या दुआबाचा प्रदेश. सिंधूच्या झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या उपनद्यांनी बनलेला दुआब म्हणजेच पंजाब होय. या प्रदेशाच्या पूर्व सीमेवर यमुना व पश्चिम सीमेवर सिंधू या नद्या आहेत. पंजाब हा भारताच्या वायव्य प्रवेशद्वारावरील प्रदेश असल्याने त्याचे अनेक वेळा विभाजन व संकलन झाले आहे. कुशाण राजांच्या काळात पंजाब प्रांत हिंदुकुश पर्वताच्याही पलीकडे पसरला होता. मोगल काळात सिंधू व सतलज यांमधील प्रदेशास पंजाब म्हणत. मोगल बादशहांनी पंजाबचे लाहोर व मुलतान असे दोन सुभे केले होते.

१८५७ मध्ये ब्रिटिशांनी हरयाणा पंजाबमध्ये समाविष्ट केला. १९४७ च्या फाळणीपूर्वी हा एकच प्रांत होता व त्याचा २७° ३९’ उ. ते ३४°२’ उ. व. ६९° २३’ पू. ते ७९°२’ पू. असा विस्तार होता व क्षेत्रफळ ३,९४,८९० चौ.किमी. होते. या प्रांताच्या उत्तरेस काश्मीर, पूर्वेस उ. प्रदेश, दक्षिणेस सिंध व राजस्थान, पश्चिमेस वायव्य सरहद्द प्रांत हे प्रांत होते. एकत्रित पंजाबचे प्राकृतिक दृष्ट्या हिमालयाचा भाग, हिमालयाच्या पायथ्याचा सॉल्ट रेंजपर्यंतचा भाग, रुक्ष पठार, नैर्ऋत्य दान व पूर्वेकडील लाहोरपर्यंतचे सुपीक मैदान असे पाच विभाग पडतात. पंजाबमध्ये पाच दुआब असून त्यांची नावे अकबराने नद्यांच्या नावांची आद्याक्षरे एकत्र करून बनविली आहेत. बिआस व सतलजमध्ये ‘ बीस्त जलंदर ’, बिआस व रावीमध्ये ‘ बडी ’, रावी व चिनाबमध्ये ‘रेचना’, चिनाब व बिहत (झेलम) मध्ये ‘चिनहथ’ वा ‘चज’ आणि बिहत (झेलम) व सिंधूमध्ये ‘सिंध सागर’ हे दुआब असून या सर्व प्रदेशात उतार अत्यंत मंद म्हणजे १/३००० इतका अल्प आहे. हवामान उष्ण, कोरडे व विषम आहे.

पंजाब हे नाव मिळण्यापूर्वी ऋंग्वेद काळात या प्रदेशास सप्तसिंधू असे नाव होते. त्या वेळी नद्यांची नावेही वेगळी होती; परुष्णी म्हणजे रावी, वितस्ता म्हणजे झेलम, असिक्नी म्हणजे चिनाब इत्यादी. सिंधु-संस्कृतीच्या विकासाचे हडप्पा हे केंद्र या प्रदेशातच येते. महाभारत काळात या प्रदेशास बाल्हीक किंवा वाहीक देश म्हणत. या काळात तेथे संपूर्ण अनास्था व बेबंदशाही होती. शल्य व भृरिश्रवा हे पंजाबचेच राजे होते. या प्रांतावर इ. स. पू. ३२६ मध्ये अलेक्झांडरने व पुढे सील्यूकस, मीनांदर (मिलिंद), एक, कुशाण व श्वेत हूण यांनी आक्रमणे केली.

दहाव्या शतकात पंजाबवर मुस्लिमांचे आक्रमण झाले  आणि बाराव्या शतकात मुस्लिमसत्ता येथे स्थिरावली. १२०५ मध्ये कुत्बुद्दीन ऐबकने लाहोरला राजधानी स्थापन केली. १९४७ साली रॅडक्लिफ निवाड्याप्रमाणे देशाची फाळणी होऊन पंजाबचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग निर्माण करण्यात आले. यांपैकी पश्चिम पंजाब (क्षेत्रफळ १,६३, २३६ चौ. किमी.) पाकिस्तानमध्ये आणि पूर्व पंजाब (क्षेत्रफळ ९६, ९१२ चै. किमी) भारतात समाविष्ट करण्यात आला. भारतातील पंजाबमधूनच पुढे काही भाग हिमाचल प्रदेशास जोडण्यात आला व कालांतराने १९६६ मध्ये हरयाणा राज्य वेगळे करण्यात आले. भारतातील पंजाब राज्याचे क्षेत्रफळ ५०,३७६ चौ. किमी. व हरयाणा राज्याचे ४४,२२२ चौ. किमी. आहे.

 


पहा : पंजाब राज्य; पाकिस्तान.

लेखक - आ. रे. डिसूजा

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate