অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

त्रावणकोर संस्थान

त्रावणकोर संस्थान

त्रावणकोर संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील सध्याच्या केरळ राज्यात असलेले एक संस्थान. क्षेत्रफळ १९,५२० चौ.किमी. लोकसंख्या ६०,७०,०१८ (१९४१). उत्पन्न ९/ कोटी रुपये. उत्तरेस कोचीन संस्थान आणि पूर्वीच्या मद्रास इलाख्याचा कोईमतूरचा जिल्हा, पूर्वेस डोंगराची रांग व त्यापलीकडे कोईमतूर, मदुराई व तिनेवेल्ली जिल्हे, दक्षिणेला हिंदी महासागर व पश्चिमेस अरबी समुद्र यांनी ते सीमित झाले होते. संस्थानातील जवळजवळ निम्मा भूप्रदेश जंगले व पर्वतश्रेणी यांनी व्यापलेला होता. तिरुवांकर व तिरुवालुमकोडी या प्राचीन नावांनीही ते प्रसिद्ध होते.

प्राचीन परंपरेनुसार हा प्रदेश चेर घराण्याच्याच राज्याचा एक भाग होता. नवव्या शतकात चेरमान पेरूमाल याने आपले राज्य नातलगांत विभागले. पुढे राजा उदय मार्तंडवर्म्याने कोल्लम् कालगणना सुरू केली. हा राजवंश वेनाड, श्रीपादम्‌, श्रीवलमकोंडे, चिखाई व देसिंगनाड अशा पाच भिन्न ठिकाणी विखुरला होता. अकराव्या शतकात चोल राजांनी हा प्रदेश काबीज केला; पण स्थानिक राजांनी पुन्हा तो परत मिळविला.

तेराव्या शतकात मदुराईच्या पांड्य राजांनी त्रावणकोरच्या दक्षिणेकडील प्रदेश बळकाविला व त्रावणकोरचे सत्ताधीश काही काळ पांड्यांचे मांडलिक बनले. रविवर्मा कुलशेखरने (१२६६–१३१३) मलिक काफूरच्या आक्रमणास थोपवून धरले. एवढेच नव्हे, तर काही प्रमाणात राज्यविस्तार केला. विद्याकलांना त्याचा आश्रय होता. पंधराव्या शतकात त्रावणकोरचे छोटे राज्य व सरदार स्वतंत्र रीत्या वागू लागले. या वेळी राजधानी पद्मनाभपूरम्‌ला होती.

पुढे विजयानगरचे सम्राट अच्युतराव व सदाशिव यांनी अनुक्रमे १५३४ व १५४४ मध्ये संस्थानावर स्वाऱ्या करून काही प्रदेश जिंकला आणि त्रावणकोर आपले मांडलिक राज्य बनविले. या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन सेंट फ्रान्सिस झेव्हिअरने या प्रदेशात ख्रिस्ती धर्माचा प्रसार व प्रचार केला. १५६५ च्या तालिकोटच्या लढाईनंतर विजयानगरची सत्ता संपुष्टात आली. त्यामुळे त्यांचे त्रावणकोरवरील वर्चस्व नष्ट झाले आणि सतराव्या शतकात संस्थानावर मदुराईच्या नायक राजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

पुढे कोचीनच्या राजघराण्यातून गादीवर दत्तक घेण्यात येऊ लागले. शिवाय छोटी मांडलिक राज्ये स्वतंत्र रीत्या वागत होतीच. त्यामुळे सरदार प्रबळ झाले व राजसत्ता कमकुवत बनली. अठराव्या शतकात मार्तंडवर्मा (१७२९–५७) या पराक्रमी व धोरणी राजाने सर्व छोट्या राजांना व सरदारांना जिंकून तसेच कोचीनशी युद्ध करून आधुनिक त्रावणकोर संस्थानची स्थापना केली व कोचीनशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.

हाच त्रावणकोर संस्थानाचा शिल्पकार. त्याने आपल्या सैन्यास यूरोपीय पद्धतीचे लष्करी शिक्षण द लनॉय या एका नेदर्लंड्‌सच्या अधिकाऱ्यामार्फत दिले. त्याने शहराभोवती तटबंदी घातली. शहरात अनेक देवळे व राजवाडे बांधले आणि संस्थानाचे उत्पन्न वाढविले. सर्व राज्य पद्मनाभ या देवतेला अर्पण करून त्याने तिचा केवळ सेवक म्हणून ते चालविले. त्यास रामअय्यन दळवी या सेनापती–मंत्र्याचे या कार्यात मोठे साहाय्य झाले.

इंग्रजांनी या संस्थानात १६८४ मध्ये प्रथम प्रवेश केला. त्यांनी अंजेंगो येथे आपली वखार स्थापन केली होती. इंग्रज व त्रावणकोरचे राजे यांत प्रथम १७९५ मध्ये मैत्रीचा तह झाला. त्यामुळे इंग्रजांच्या एतद्देशीय राजांबरोबरच्या लढायांत त्रावणकोरच्या संस्थानिकांनी इंग्रजांना वेळोवेळी मदत केली.

मार्तंडवर्म्यानंतर रामवर्मा गादीवर आला. त्याने पूर्वसूरींचेच धोरण अवलंबले. त्याने उरलेल्या काही स्वतंत्र राजांना जिंकून प्रदेश विस्तार केला (१७६१) आणि त्रावणकोर लाइन्स (नेडुमकोट्ट) ही सुप्रसिद्ध तटबंदी उभारली. हैदर अलीने दोनदा संस्थान उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला (१७६६ व १७७६); पण डचांच्या मदतीमुळे तो विफल झाला. टिपूनेही पुढे हाच प्रयत्न केला (१७८९); पण इंग्रजांच्या मदतीमुळे ते त्यास शक्य झाले नाही.

तथापि तिसऱ्या इंग्रज–म्हैसूर युद्धास हे निमित्त झाले. त्रावणकोरने टिपूचा अनेक लढायांत पराभव केला. टिपूच्या जाचाला कंटाळून अनेक कुटुंबे तसेच सामुरी, कोलथिरी व कोचीनच्या राजघराण्यांतील व्यक्ती त्रावणकोरच्या आश्रयास आल्या. त्यांना रामवर्म्याने यथोचित आश्रय दिला. त्यामुळे त्यास धर्मराजा अशी उपाधीही प्राप्त झाली. टिपूच्या पराभवानंतर त्रावणकोर इंग्रजांचे मांडलिक बनले.

पुढे १८०५ च्या तहाने सु. ८ लाख रु. खंडणी ठरली. यानंतर राजा बलरामवर्मा हा रामवर्म्याचा पुतण्या गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत १८०९ मध्ये दिवाण वेळूथंपी दळवी याने इंग्रजांविरुद्ध उठाव केला आणि इंग्रज रेसिडेंट मेकॉले याचा खून करण्याचा कट रचला. बलरामवर्म्यानंतर लक्ष्मी राणी गादीवर आली (१८१०). तिने संस्थानची सर्व व्यवस्था जेम्स मन्रो या रेसिडेंटच्या हाती सोपविली. तिच्यानंतर तिची बहीण पार्वती रामवर्मा गादीवर येईपर्यंत राज्यकारभार पाहत होती (१८२९ ). रामवर्म्याच्या सतरा वर्षांच्या कारकीर्दीत अनेक सुधारणाही करण्यात आल्या.

त्याच्यानंतर मार्तंडवर्मा (१८४६–६०), रामवर्मा (१८६०–८०), त्याचा भाऊ रामवर्मा (१८८०–८५) व नंतर रामवर्मा (१८८५–१९२४) असे राजे गादीवर आले, अखेरचे राजे रामवर्मा (१९२४–४९) विलीनीकरण्याच्या वेळी गादीवर होते. १८६२ मध्ये लॉर्ड कॅनिंगने संस्थानला दत्तकाची सनद दिली. राजास २१ तोफांचा मान होता. विद्याकलांना आश्रय देण्यात त्रावणकोरचे राज्य प्रसिद्ध होते. एकोणिसाव्या शतकात पाश्चात्त्य न्यायपद्धती, सार्वजनिक बांधकामे, कालवे, वाहतूक, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत संस्थानचा विकास झाला. चहा, कॉफी, रबर, काथ्या इ. उद्योगांमुळे संस्थानचे उत्पन्न वाढले. श्रीनारायण गुरू या आळवार संताने सामाजिक पुनरुत्थानाला चालना दिली.मलयाळम् मनोरमा हे प्रसिद्ध नियतकालिक सुरू झाले (१८९०). विसाव्या शतकात संस्थानात रेल्वे आली

संस्थानची स्वतःची डाकपद्धती व टाकसाळ होती. १८८८ मध्ये स्थापन झालेल्या विधिमंडळामुळे संस्थानात जबाबदार राज्यपद्धती अंमलात होती. १९३६ मध्ये दिवाण सी. पी. रामस्वामी अय्यर यांनी मंदिरप्रवेश सर्वांना खुला करण्याचा फतवा काढला; पण संस्थानी काँग्रेसचा (१९३८) एकतंत्री राज्यकारभारास विरोध होता. काँग्रेसने युद्धबंदीचा यशस्वी सत्याग्रह केला. तिच्या युवक दलातूनच पुढे कम्युनिस्ट कार्यकर्ते निर्माण झाले. संस्थानाची राजधानी त्रिवेंद्रम येथे होती. संस्थानात नऊ शहरे व ३,८८५ खेडी होती आणि राज्यकारभारासाठी चार जिल्हे व ३१ तालुके यांमध्ये संस्थान विभागले होते. प्रत्येक जिल्ह्यावर दिवाण–पेशकार हा प्रमुख अधिकारी असे, तर तालुक्यावर तहसीलदार हा अधिकारी असे.

स्वातंत्र्योत्तर काळात दिवाण सी. पी. रामस्वामी अय्यर यांचा स्वतंत्र राहण्याचा मनसुबा होता; पण १९४९ मध्ये संस्थान अखेर त्रावणकोर–कोचीन संघात विलीन झाले आणि संस्थानचे अधिपती राजप्रमुख झाले. पुढे १९५६ मध्ये ते केरळ राज्यात समाविष्ट करण्यात आले.

त्रावणकोर संस्थानचा राजकीय वारसा मातृसत्ताक परंपरेप्रमाणे (मरुमक्कथयम प्रथेनुसार) चालत असे. राजास मुलगा नसल्यास थोरल्या बहिणीचा मुलगा गादीवर येई आणि राजाच्या बहिणीला महाराणी म्हणत.


संदर्भ : Menon, V. P. The Story of the Integration of the Indian States, New Delhi, 1961.

कुलकर्णी, ना. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate